महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

🚩 राधेय/१ 🚩

लेखक - रणजित देसाई

माथ्यावरचा सूर्य थोडा कलला होता. त्या सूर्यदाहात सारी भूमी होरपळत होती. पण त्या सूर्यकिरणांची तमा न बाळगता कर्ण अपराह्ण काळी आपली सूर्योपासना पुरी करीत होता. गंगेच्या पाण्यात उभा राहुन, दोन्ही हात उंचावून तो पूजामंत्र म्हणत होता. पैलतीरावर त्याची दृष्टी स्थिरावली होती. पूजारंभी आलेले सूर्यकिरण माथ्यावरून पाठीमागे परतले, तरी त्याचे भान कर्णाला नव्हते. तेजस्वी गौर वर्णाचा, सुदृढ बांध्याचा कर्ण एकाग्रपणे आपली नित्य सूर्योपासना पुरी करीत होता. रूपसंपन्न कर्णाच्या रूपाने साक्षात सूर्याची प्रतिमा गंगाजलावर प्रकटल्याचा भास होत होता.

कर्णाने आपली सूर्योपासना पुरी केली. नित्य सरावाप्रमाणे गंगेची ओंजळ हाती घेतली आणि त्याची घनगंभीर हाक उठली,

‘कोणी याचक आहे?’

तीन वेळा कर्णाने हाक दिली. पण पाठीमागून साद आला नाही.

कर्णाने हाती घेतलेले जल गंगेत सोडले. गंगाजल नेत्रांना लावून तो वळला. नदीकाठावर ठेवलेली आपली वस्त्रे परिधान केली, पादत्राणे घातली आणि उत्तरीय सावरून तो चालू लागला.

अचानक त्याची पावले थांबली. गंगेच्या किनाऱ्यावर भर उन्हात तळपणाऱ्या सुवर्णरथाकडे कर्णाचे लक्ष वेधले.

आपल्या सूर्योपासनेसाठी येताना कर्ण आपला रथ नेहमी नदीपासून दूर अंतरावर वृक्षराईत उभा करीत असे. दान मागण्यासाठी येणाऱ्या कोणाही याचकाला कसलाही संकोच नसावा, याची तो दक्षता घेत असे, एवढेच नव्हे, तर सूर्योपासना झाल्यावर दानासाठी उभा राहत असताही नदीतटाकडे पाठ करून तो उभा राही. याचकाने दान मागितले आणि कर्णाने ते मान्य केले की, कर्ण याचकाचे दर्शन घेत असे. शत्रू जरी याचक म्हणून आला, तरी दान देत असता खेद वाटू नये, यासाठी नेहमी तो सावधागिरी बाळगत असे. त्यामुळे नदीतीरावर उभा असलेला तो सुवर्णरथ पाहून कर्णाचे कुतूहल वाढले. अशा भर उन्हाच्या वेळी कोण आले असावे, याचा विचार करीत कर्ण त्या रथाकडे जात होता. दुर्योधनाच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. युवराज दुर्योधनाची भेट होऊन फार दिवस झाले होते.मित्रभेटीचा आनंद कर्णाच्या मुखावर प्रकटला.

कर्णाने आपली पावले उचलली, तो रथाच्या दिशेने जात होता. कर्णाची दृष्टी रथावर स्थिरावली होती.

रथाचे छत व्याघ्रचर्माने मढवले होते, रथ प्रशस्त व देखणा होता.

कर्णाचे लक्ष रथाच्या ध्वजाकडे गेले.

रथावर भगवा ध्वज गरुड-चिह्नासह तिरप्या सूर्यकिरणांत झळकत होता.

दुर्योधनाचे रथाचिह्न रत्नजडित गज होते. गरुड-चिह्न पाहून कर्णाची उत्सुकता वाढली.

कर्ण रथाजवळ येत आहे, हे पाहताच रथसेवक सामोरा आला. कर्णाला प्रणाम करून त्याने सांगितले,
‘द्वारकाधीश कृष्ण महाराज आपली वाट पाहत आहेत.’

कृष्णाबद्दल कर्णाने खूप ऐकले होते. सम्राट कंसाचे कंदन यानेच केले होते, रुक्मिणीहरण करणारा, द्वारकानगरी वसवणारा कृष्ण आपणहून कर्णभेटीसाठी येतो, यावर कर्णाचा विश्वास बसत नव्हता. त्याचे सावळे रूप, त्याचा पराक्रम, त्याच्या ठायी वसणारा दैवी गुणसंपन्नभाव यांची वर्णने कर्णाने ऐकली होती.

कृष्णभेटीच्या कल्पनेने कर्णाचे मन मोहरून उठले. काय करावे, कृष्णाला कसे सामोरे जावे, हे त्याला सुचेना. त्याचे पाय जागच्या जागी खिळून राहिले. अधीर डोळे रथाच्या सावलीत स्थिरावलेले कृष्णरूप शोधण्यात गुंतले होते.

कर्णाला फार काळ वाट पाहावी लागली नाही.

रथातून कृष्ण उतरला.

कृष्णाच्या मस्तकी रत्नखचित सुवर्णकिरीट शोभत होता. पीतांबर धारण केलेल्या कृष्णाच्या खांद्यावर हिरवे रेशमी उत्तरीय होते. त्या मेघ-सावळ्या रूपात एक वेगळेच देखणेपण लपले होते. काळ्याभोर विशाल नेत्रांत मोहकता होती.

मुखकमलावर विलसणारे स्मित अपरिचितालाही विश्वास देत होते.

कर्ण ते कृष्णरूप निरखीत होता. नरवेष धारण करून साक्षात परमेश्वरच पृथ्वीतलावर अवतरलल्याचा भास कर्णाला झाला.

कर्णाकडे पाहत कृष्ण जवळ येत होता.

कर्ण तालवृक्षासारखा उंच होता. सिंहासारखी त्याची शरीराकृती बळकट होती.

कृष्णाची दृष्टी कर्णाच्या कवच-कुंडलांवर स्थिरावली होती. गौर कांतीवर सुवर्ण-तेज प्रकाशित व्हावे, तसे ते भासत होते. अंगावरचे उत्तरीय भर उन्हाच्या घामामुळे भिजून शरीराला चिकटले होते; पण त्यामुळे कवचाचे अस्तित्व लपत नव्हते. कवच धारण करणाऱ्या कर्णाचे रूप सहज कुंडलांनी अधिकच सुशोभित झाले होते.

कृष्ण जवळ येताच कर्णाने नम्रतेने प्रणाम केला.

आपले बाहू पसरून कर्णाला आपल्या मिठीत घेऊन कृष्ण म्हणाला, ‘अंगराज, कदाचित आपणच माझ्यापेक्षा वयानं मोठे असाल. समवयस्काबरोबर मैत्री करावी. औपचारिकपणा तिथं नसावा. तुम्ही मला अभिवादन करण्याची मुळीच गरज नव्हती.’

कृष्णाच्या मिठीत कर्णाचे उरलेसुरले भान हरपले.

या कृष्णावर गोपी भाळल्या, त्यात नवल ते काय?

बासरीचा आवाजही फिका पडावा, अशी शब्दांची माधुरी...

कर्ण त्या मिठीतून बाजूला होत म्हणाला,

‘आपल्या दर्शनानं मी धन्य झालो. वयानं कदाचित मोठा असेन; पण बालवयातच कालियामर्दन केलं, असा आपला पराक्रम. मानवाचं मोठेपण वयानं सिद्ध होत नसतं. ते त्याच्या कर्तृत्वानं सिद्ध होतं. आपलं यश, कीर्ती, सामर्थ्य यांचं गुणगान मी वीरांच्या, नृपांच्या तोंडूनच नव्हे, तर साधुसंतांच्या मुखांतून ऐकलंय्. द्वारकाधीशापुढं नतमस्तक होण्यास मला धन्यता वाटते.’ कर्णाने थोडी उसंत घेतली आणि संकोचाने तो म्हणाला, ‘माझ्या भेटीसाठी आपण आलात, हे मी माझं भाग्य समजतो. पण त्यासाठी आपल्याला या उन्हात तिष्ठावं लागलं, हा दाह सहन करावा लागला, याचा खेद होतो. आपण मला निरोप. ...’

‘खेद वाटण्याचं काहीच कारण नाही, अंगराज. प्रथम मी तुमच्या प्रासादात गेलो, तिथं माझा यथोचित सत्कार झाला. तिथं कळलं की, तू सूर्योपासनेसाठी नदीतटाकी गेला आहेस. ते कळताच मोह अनावर झाला अन् म्हणूनच तुझं रूप पाहण्यासाठी मी इथवर आलो.’

‘माझं रूप?’

‘हो! तुझ्या रूपाची कीर्ती मी ऐकली होती. त्यापेक्षा तुझ्या जन्मजात कवच-कुंडलांची. ती पाहण्यासाठी मी आतुर होतो. तुझी कुंडलं केव्हाही दृष्टीस पडली असती. पण तुझं कवचधारी रूप पाहायला हीच वेळ गाठायला हवी होती. तुला भेटत असता, त्या दिव्य कवचाचा जाणवलेला स्पर्श, त्यामुळं तुझ्या अभेद्य मनाची पटलेली साक्ष मी कधीही विसरणार नाही.’

कर्णाच्या मुखावर एक व्यथा तरळून गेली. खिन्नपणे हसून तो म्हणाला,

‘कवचकुंडलं! जन्मजात लाभलेली ही सहज कवचकुंडलं. पण याची साक्ष जन्मदात्या मातेला सहन झाली नाही- जन्माला येताच कोणत्या अपराधास्तव त्या अज्ञात मातेनं मला जलप्रवाहात सोडून दिलं, ती कोण होती? तिनं तसं का केलं? त्या मातेचा शोध माझं मन सदैव घेतं. दर्पणामध्ये रूप न्याहाळत असता, ही कवचकुंडलं पाहत असता, माझ्या डोळ्यांसमोर एक वेगळीच आकृती उभी राहते, रूपसंपन्न तेजस्वी माता! पण तिचं रूप दिसत नाही. धुक्याच्या अवगुंठनाखाली ते सदैव झाकलेलं असतं. ज्याला आईनं टाकलं, त्याला कवचकुंडलांचं बळ काय लाभणार? कृष्णा, ती कवचकुंडलं शापित आहेत. प्रवाहावर तरंगत राहणं एवढंच माझ्या दैवी लिहिलं आहे.’

कृष्णाने आपला उजवा हात कर्णाच्या खांद्यावर ठेवला.

कर्णाने पाहिले, अंतःकरणाचा ठाव घेणाऱ्या त्या डोळ्यांत कारुण्य प्रगटले होते.

‘कर्णा, ते दुःख मीही जाणतो. त्याची व्यथा मलाही माहीत आहे. कुणाला नदीप्रवाहावर सोडून दिल जातं, कुणाला नदी ओलांडून पैलतीर गाठावा लागतो. कुणी गवळ्याचं पोर म्हणून नंदाघरी वाढतं, तर कुणाला सूतकुलात आश्रय लाभतो. मातृवियोग दोघांच्याही भाळी सारखाच लिहिलेला. सुटल्या किनाऱ्याची ओढ धरून जीवनाचा प्रवास कधी होत नसतो, अंगराज!’

‘कृष्णा, आपल्या जीवनात ते एक स्वप्न आलं होतं, आलं, तसंच ते विरूनही गेलं. आपलं जन्मरहस्य कधीही रहस्य राहिलं नाही, पण मी... मी कोण? मला का टाकलं गेलं? माझ्या मनातून हा विचार कधीच सुटत नाही. पोरकेपणाची व्यथा भारी तीव्र असते.’

कृष्ण काही बोलला नाही. कृष्णाने आपल्या उत्तरीयाने घाम टिपला आणि सूर्याकडे पाहत तो म्हणाला,

‘अंगराज, सूर्यदाह सहन करण्याची साधना तुला प्राप्त झाली आहे. ती तुझी तपश्चर्या आहे. माझं तसं नाही. गाई चारण्यासाठी मी रानावनांतून भटकलो, तरी वृक्षसावलीतच मी वाढलो. आपण प्रासादाकडंच जावं, हे बरं, असं वाटत नाही का?’

‘क्षमा!’ कर्ण गडबडीने म्हणाला, ‘माझ्या ध्यानी ते आलं नाही. चलावं.’

कृष्ण व कर्ण दोघे कृष्णरथाच्या जवळ आले. कर्ण म्हणाला,

‘आपण पुढं व्हावं. माझा रथ वृक्षराईत ठेवला आहे. तो घेऊन मी आपल्या मागोमाग येईन.’

‘तुझा रथ माझा दारुक घेऊन येईल. आपण मिळूनच जाऊ.’

कृष्णाने दारुकाला आज्ञा केली.

कृष्णसारथी दारुक आज्ञापालनासाठी वृक्षराईकडे जाऊ लागला.

कृष्णाने कर्णाला रथारूढ होण्याचा संकेत केला.

कर्ण हसला. तो म्हणाला,

‘आपण सारथ्य करणार अन् मी रथात बसणार? ते योग्य होणार नाही. ज्याच्या दैवी ते लिहिलं असेल, तो धन्य होय. आपली कृपा असेल, तर सारथ्य करण्याची अनुज्ञा व्हावी.’

स्मितवदनाने कृष्ण रथामध्ये घातलेल्या शुभ्र आसनावर विराजमान झाला. कर्णाने अश्ववेग हाती घेतले. रथ संत गतीने चालू लागला. रथाला वेग आला. रथाला लावलेल्या घुंगुरमाळांचा आवाज टापांच्या आवाजात मिसळत होता. कृष्णरथाचे जातिवंद उमदे घोडे एका चालीने धावत होते.

चंपानगरीत प्रवेश होताच कृष्णाची दृष्टी चंपानगरीचे सौंदर्य पाहण्यात गुंतली होती.

ती नगरी विस्तीर्ण खंदकाने आणि भव्य तटाने सुरक्षित केली होती. अनेक गोपुरांनी सजलेली भवने दृष्टिपथात येत होती.

रुंद मार्गावर रथ जात असता, चंपानगरीचे प्रजाजन अत्यंत नम्र भावाने व आनंदित मुद्रेने कृष्ण-कर्णांना अभिवादन करीत होते.

कर्णप्रासादाच्या विस्तीर्ण आवारात दोन्ही रथांनी प्रवेश केला. सेवकांची धावपळ उडाली. प्रासादासमोर रथ येताच सेवकांनी अश्वांच्या ओठाळ्या पकडल्या. कृष्णापाठोपाठ कर्ण उतरला.

कृष्ण कौतुकाने म्हणाला,

‘कर्णा, तुझं सारथ्य खरोखरच अप्रतिम आहे. या रथाचे घोडे शैब्य आणि सुग्रीव जातीचे आहेत. सूक्ष्म संकेतही त्यांना कळतो. ते शिक्षण त्यांना दिलं आहे. तुझ्या हातांच्या ओढीत थोडा जरी नवखेपणा जाणवला असता, तरी ते या अश्वांनी ओळखलं असतं. रथ आवरला गेला नसता.’

‘त्यात माझं कसलं कौतुक!’ कर्णाने हसून साथ दिली. ‘आपलं अलौकिक सारथ्य ही आपण आत्मसात केलेली कला आहे. मी तर सूतकुलात वाढलेला. सारथ्य आणि रथपरीक्षा हे दोन्ही आमचे सहजस्वभावच बनलेले असतात.’

‘तेही भाग्य मोठंच! कर्णा, वासनांचे अश्व जीवनाच्या रथाला जुंपले असता, तो रथ सदैव कह्यात ठेवणं ही सामान्य गोष्ट नव्हे.’

कृष्णाची दृष्टी प्रासादाच्या पायऱ्यांकडे गेली.

त्या पायऱ्यांवर रौप्यकलश घेऊन दासी उभ्या होत्या. त्यांच्या मागे पूजेचे तबक घेऊन वृषाली उभी होती.

कृष्ण पायऱ्यांनजीक जाताच दासींनी कृष्णाच्या पायांवर पाणी ओतले. वृषालीने कृष्णाला कुंकुमतिलक लावला.

कर्णपत्नी वृषालीला आशीर्वाद देत कृष्ण म्हणाला,

‘या उपचारांची काही गरज नव्हती.’

वृषाली स्मितवदनाने म्हणाली,

‘आपण अचानक आलात, त्या वेळी आपलं स्वागत मनाजोगं घडलं नाही. ते मनाला लागून राहिलं होतं.’

‘परकेपणा मनात असता, तर आमंत्रित नसता, पूर्वपरिचय नसता आलोच नसतो.’

कर्णासह कृष्ण पायऱ्या चढत असता, पायऱ्यांवर एक चार वर्षांचा कुमार उभा होता. कर्णाने पाहताच त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि तो कर्णाकडे धावला.
कर्ण म्हणाला, ‘वसू, महाराजांना वंदन कर.’
लहान वृषसेनाने एक वेळ कृष्णाकडे पाहिले आणि धीटपणे पुढे होऊन त्याने आपले मस्तक कृष्णचरणांवर ठेवले.

प्रेमभराने वृषसेनाला उचलून घेत कृष्ण म्हणाला,

‘अंगराज, ही तर आपली प्रतिमा दिसते! नाव काय?’

‘वृषसेन!’ उचललेल्या वृषसेनाकडे कौतुकाने पाहत कृष्णाचे शब्द उमटले, ‘अंगराज! हा तुमच्या वळणावर गेला, तरी एक उणीव आहे. तुमच्यासारखी कवचकुंडलं याला नाहीत.’

कर्णाने हसून उत्तर दिले,

‘ज्याला मातापित्यांचं छत्र नसतं, त्याला कवचकुंडलं रक्षणार्थ मिळतात.’

‘खरं आहे! आपल्यासारख्या पराक्रमी वीरपित्याचं छत्र लाभलं असता, तो कवचकुंडलं मागेल कशाला? अंगराज, आपली पुत्रसंपदा?’

‘दोघे हस्तिनापुरात असतात.’

‘हस्तिनापूर?’

‘हो! ज्यांनी माझं संगोपन केलं, मला वाढवलं, ते अधिरथ-राधाई हस्तिनापुरात राहतात. ते पुत्रहीन होते. त्यांना मी गंगेच्या प्रवाहावरून वाहत जाताना सापडलो. मी सापडल्यानंतर राधाईला पुत्रप्राप्ती झाली, अधिरथ-धृतराष्ट्र महाराजांचा जुना स्नेह आहे. हस्तिनापुराच्या रथशाळेची जबाबदारी तेच पेलतात.’

‘तुम्ही मला तुमच्या मुलाबद्दल सांगत होतात.’

‘तेच सांगत आहे. माझ्या प्रथम पत्नी ऊर्मिलेला दोन पुत्र. शत्रुंजय आणि वृषकेतु. पण वृषकेतु लहान असतानाच ऊर्मिलेनं या जगाचा निरोप घेतला. माझा वृषालीशी विवाह झाला. त्यानंतर मी या नगरीच्या रक्षणार्थ इकडं आलो. पण वृषकेतु राधाईनं ठेवून घेतला. माझी आठवण, म्हणून.’

‘आणि शत्रुंजय?’

‘तो युवराज दुर्योधनपुत्रांच्या सहवासात वाढत आहे.’

बोलत-बोलत कर्णासह कृष्णाने कर्णप्रासादात प्रवेश केला. अनेक दासदासींनी गजबजलेला तो प्रासाद नानाविध उपचारसंभाराने सज्ज होता. कृष्णाला कर्णाच्या सहवासात प्रसन्नता लाभत होती. क्षेमकुशल चालले असता कर्णाने विचारले,

‘द्वारकेपासून एवढया दूरवर आपण फक्त माझ्यासाठी...’

‘नाही, अंगराज, तसं मुळीच नाही. तपश्चर्येसाठी मी कामरूप देशी गेलो होतो. त्याच भूमीचा हा भाग. या अंगदेशाला पूर्वी कामाश्रय असं नाव होतं. शिवाच्या क्रोधानं भस्मीभूत होऊ, या भीतीनं पळणाऱ्या मदनानं जिथं आपलं अंग टाकलं, तो हा अंगदेश. सोळा महाजनपदांपैकी अंग हे एक महाजनपद आहे. या उपेक्षित, पण पुण्यभूमीला तुझ्यामुळं परत समृद्धता लाभली.’

‘द्वारका मी पाहिली नसेल, पण तिचं वैभव मी ऐकलं आहे. चंपानगरी त्यापुढं सामान्यच.’

‘वैभवानं नगरीला शोभा येत नसते, कर्णा! गुणसंपन्न माणसांच्या वास्तव्यानं भूमी पुनीत होते. तुझी कीर्ती भूमीच्या साऱ्या परिसरात पसरली आहे. ज्या भूमीत याचकांची दुर्लभता आहे, तो खरा समृद्ध प्रदेश. तुझ्यामुळं वैद्यनाथपासून भुवनेश्वरापर्यंत पसरलेला हा अंगदेश यात्रेचा प्रदेश बनला आहे.’
कर्णाच्या मुखावर एक वेगळेच स्मित प्रगटले. त्याने विचारले, ‘माझ्यासारख्या सूतकुलात वाढलेल्यानं पुण्यसंचयासाठी तपश्चर्या करावी. पण आपण तर जन्मजात देवगुणसंपन्न. आपण तपश्चर्या करण्याचं कारण?’

‘राधेया, तपश्चर्या टळलीय् कुणाला? या पृथ्वीतलावर जन्माला येणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राचा उद्धार होतो, तो तपश्चर्येमुळंच. धनुर्विद्या शिकावी, तर द्रोणाचार्यांकडं. रथ सज्ज करावा, तर अधिरथांनी. मल्लविद्या पाहावी, तर जरासंधाकडं. ही कीर्ती कशामुळं लाभली? त्या विद्येची अखंड कास हेच कारण नाही का? तपश्चर्या म्हणजे तरी दुसरं काय? पराक्रम, कीर्ती, यश यांचं बळ तपश्चर्येतच लपलेलं असतं. महान तपस्वी रावणाचं बळ तपश्चर्येतच दडलेलं होतं, सूर्यचंद्रांसह अंतरीक्षातील ग्रह अंकित करूनही त्याची नित्योपासना कधी ढळली नाही.’

‘एखादा ग्रह अंकित झाल्यावर नित्योपासनेची गरज काय?’

‘हाच प्रश्न एका ऋषिवरांनी रावणाला विचारला होता. एके दिवशी संध्यासमयी एक ऋषिवर रावणाला भेटावयास गेले. त्या वेळी अस्ताचलाला जाणाऱ्या सूर्याला रावण वंदन करीत होत. ते पाहून त्या ऋषिवरांना आश्चर्य वाटलं व त्यांनी हाच प्रश्न रावणाला विचारला. रावण म्हणाला,

‘महामुनी, या तपश्चर्येत जेव्हा खंड पडेल, तेव्हा रावणाचं यशही संपेल. सुरुवातीला माझी तपश्चर्या चालू होती. तिचा लौकिक हळूहळू त्रिभुवनात पसरत होता. माझी लंका सुवर्णमय झाली. प्रजाजन तृप्त झाले, तरी तपश्चर्या अखंड चालूच राहिली. एकदा मी पाताळावर स्वारी वेळी व पाताळ जिंकलं, ती वार्ता स्वर्गात पोहोचली. स्वर्गीय देव म्हणाले, ‘रावण तपस्वी आहे. पाताळावर राज्य करणं त्याचा अधिकार आहे. त्याच्या सत्तेखाली पाताळ सुरक्षित आहे.’

माझी तपश्चर्या तशीच चालू होती. काही वर्षांनी मी पृथ्वी जिंकली. स्वर्गीच्या देवांनी त्यालाही मान्यता दिली. ते म्हणाले, ‘रावण महातपस्वी आहे. पृथ्वीवर राज्य करण्याचा त्याचा अधिकार आहे.’

‘माझ्या तपश्चर्येत खंड नव्हता; अन् एके दिवशी स्वर्गीचे देव कारण नसता भयभीत झाले. मी स्वर्गावर स्वारी करणार, अशी वदंता उठली होती. अमृतपानात मग्न असलेले देव खडबडून जागे झाले. युद्धाची तयारी चालू झाली; पण मी स्वर्गावर चढाई केली नाही. देवांनी नि:श्वास सोडला. असं दोन-तीनदा घडलं अन् एकदा अचानक हाती होतं, ते सैन्य घेऊन मी स्वर्गावर चाल केली. स्वर्गीचे देव त्या वार्तेनं पुरे घाबरले. स्वर्गात लढाई करण्याचा प्रसंगच उद्‌भवला नाही. लपलेल्या देवांना शोधून काढणं एवढंच मला करावं लागलं.’

‘ती रावण-पराक्रमकथा ऐकून ऋषिवरांना शंका उद्‌भवली. त्यांनी विचारले, ‘वीर रावणा, याचा अर्थ तुझा पराजय केव्हाच होणार नाही का?’

‘रावणाला त्या प्रश्नाचं कौतुक वाटलं. तो क्षणभर विचारात पडला. निश्चयी स्वरात त्यानं उत्तर दिलं,

‘महाराज, या पृथ्वीतलावर जन्मलेले सारेच नाशवंत. त्यांच्या पराजयाचा एक दिवस निश्चित झालेला असतो. माझा पराजय जरूर होईल; पण तो देवांच्या हातून नव्हे. ज्यांनी धार्ष्ट्य गमावलं आहे, त्यांना परत उभं राहायचं बळं कुठलं? माझा पराजय हे देव करणार नाहीत. केव्हा तरी कोणा सामान्य माणसालाच माझं मोठेपण असह्य होईल. स्वतःचा विश्वास धरून तो रावणाला आह्वान देईल. त्या वेळी साध्या माकडांच्या मदतीनंही तो वीर या रावणाचा सहज पराभव करील.’

कृष्णाने रावणकथा संपवली व तो म्हणाला,

‘अन् घडलंही तसंच. एका क्षुद्र मोहापोटी महान तपस्वी रावणाचा तोल गेला. त्यामुळंच रावणाचा वध घडला. तोही देवांच्या हातून नव्हे. त्यासाठी देवालासुद्धा सामान्य मानवरूपच धारण करावं लागलं अन् वानरांच्या साहाय्यानंच ते अघटित घडलं. तपश्चर्येचा प्रभाव एवढा बलाढ्य असतो.’

कृष्णाच्या बोलण्याने मुग्ध झालेल्यांना वेळकाळाचे भान राहत नव्हते. कृष्णसहवास हे परमेश्वरी वरदान वाटत होते.

चंपानगरीत नवचैतन्य प्रगटले होते. कृष्णाबरोबर आलेल्या रक्षकदळाच्या आतिथ्यात सारी चंपानगरी गुंतली होती. भोजनासाठी नाना तऱ्हेची मृगया राजप्रासादात नित्य येत होती. नृत्यगायनाने कृष्णाचे मनोरंजन केले जात होते. वृषसेन तर कृष्णामागून छायेसारखा वावरत होता.

भल्या पहाटे कर्णाला जाग आली. एक मंत्रमुग्ध करणारा नाद त्या वातावरणात भरून राहिला होता. कर्णाने कानोसा घेतला. सारे मन आनंदाने मोहरून उठले. कर्णाने पाहिले, शेजारी वृषाली शांतपणे झोपी गेली होती. कर्णाने हळुवार हाताने तिच्या गालांना स्पर्श केला. वृषालीला जाग आली. मंदस्मित करीत तिने कर्णाचा हात पकडला आणि आपल्या गालावर ठेवून घेतला. तृप्ततेने तिने नेत्र घेतले.

कर्णाने हाक मारली,

‘वसू ऽ ऽ’

‘अं!’

‘जागी हो, वसू. जेव्हा भाग्य दाराशी येतं, तेव्हा माणसानं झोपू नये.’

त्या शब्दांनी वृषाली खडबडून जागी झाली. उठत तिने विचारले,

‘कसलं भाग्य?’

‘ऐक!’

दोघेही ऐकत होते. त्या नादाने दोघांची मने भरून गेली होती. पहाटेचा प्रकाश फैलावू लागला होता. महालातील समईचा उजेड मंदावत होता. वृषालीने विचारले,

‘वृषसेन कुठं आहे?’

वृषसेनाची जागा रिकामी होती.

कर्ण हसला. आपले उत्तरीय घेत तो म्हणाला, ‘चलऽ ऽ’

कर्णापाठोपाठ वृषाली जात होती. कृष्णमहालानजीक जात असता तो आवाज स्पष्ट होत होता. कृष्णमहालाच्या दाराशी उभे असलेले सेवक अदबीने बाजूला झाले. कर्ण-वृषालीची पावले द्वाराशीच खिळली.

महालात शय्येवर कृष्ण बसला होता. डोळे मिटून तो बासरी वाजवीत होता. त्याच्यासमोर वृषसेन एकाग्रपणे ऐकत होता. अमृतधारा वर्षाव्यात, तसे ते सूर झरत होते.

बासरीचा सूर थांबताच कर्ण भानावर आला.

कृष्णाचे शब्द कानांवर पडले, ‘अंगराज, दाराशी उभे का? या. आत याऽ ऽ. माझ्या बासरीनं तुम्हांला जागं केलं, वाटतं!’

‘नादमुग्ध जरूर केलं. जागं केलं, की नाही, ते माहीत नाही.’

कृष्णाने वृषसेनाला जवळ ओढले. त्याला जवळ घेत त्याच्या कुंतलांवरून हात फिरवीत तो म्हणाला, ‘हा वृषसेन मोठा गोड आहे. आज बासरी वाजवली, ती त्याच्यामुळंच. काल वस्त्रं काढण्यासाठी संदूक उघडली. त्यातली बासरी यानं पाहिली. ती वाजवण्याचा हट्ट धरला. कोणी जागे नसता मी वाजवीन, असं वचन दिलं. पण याचा ध्यास मोठा. भल्या पहाटे यानं जागं केलं.’

‘आपल्याला त्रास दिला नं?’ वृषाली म्हणाली.

‘त्रास नाही. आनंद दिला. लहानपणी गाई राखीत रानावनांतून फिरत असे, तेव्हा ते एकाकीपण घालवण्यासाठी ही बासरी हाती घेतली. अजाणता सूर लाभले. निरागस मनांना आनंद देता आला. आता बासरी हाती घ्यायला उसंतच राहिली नाही. घेतली, तरी आता निरागस श्रोता लाभत नाही.’

‘भान हरपावं, असा निरागस गोडवा त्या बासरीत भरलेला आहे.’

‘नाही, अंगराज!’ बासरी उंचावत कृष्ण म्हणाला, ‘या बासरीत काही नाही. ही एक शुष्क वेळूची पोकळ नळी. छिद्रांकित. कुणीतरी सावधपणे फुंकर मारावी लागते. छिद्रांना जपणाऱ्या हळुवार बोटांनी पेलावी लागते. तेव्हाच मनातले सूर उमटतात. या बासरीत काही नसतं.’

कृष्णाच्या चेहऱ्यावर एक स्वप्न तरळून गेलं. ‘कर्णा, मानवी जीवन तरी काय असतं? या देहाच्या बासरीत हळुवार मनाची नाजूक फुंकर घातली, की हृदयांतरीच्या व्यथादेखील नादमुग्ध बनून जातात.’

वृषसेन कृष्णाजवळ गेला. त्याच्याकडे कृष्णाची दृष्टी वळताच तो म्हणाला, ‘महाराज, मला बासरी वाजवता येईल?’

कृष्णाने वृषसेनला जवळ घेतले. त्याच्या केसांवर हात फिरवीत कृष्ण म्हणाला, ‘नको. वृषसेन, या बासरीचा हट्ट धरू नकोस. या बासरीत फुंकलेल्या फुंकरीनं श्वास अधुरा बनतो आणि उमटलेल्या सुरांना वेगळीच व्यथा लाभते.’

कृष्णाच्या बदललेल्या भावाने सारेच चकित झाले.

कृष्णाचे लक्ष महालात आलेल्या सूर्यकिरणांकडे गेले. वृषसेनाला दूर करीत तो उद्‌गारला,

‘सूर्यवंदन राहिलं!’

-आणि एवढं बोलून सूर्यवंदनासाठी तो सज्जाकडे जाऊ लागला.

५.भाग पाचवा
६.भाग सहावा
७.भाग सातवा
८.भाग आठवा
९.भाग नऊवा



_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- 
 सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट