Disclaimer
वाचन संस्कृतीची गरज ,...
‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे. हे आपण सर्वच जाणतो; परंतु आजच्या तरुण पिढीला याचं महत्त्व कळण्यासाठी हा लेखप्रपंच. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल.
आजच्या मनुष्याच्या ठिकाणी असणारे ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. या शक्तीच्या सहाय्याने तो सुबुद्ध आणि प्रगल्भ तर होतोच; परंतु त्याच्या कार्यसंस्कृतीवर सुद्धा त्याचा प्रभाव पडतो. मागल्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच थरातून वाढते आहे. वाचन संस्कृती टिकवून धरण्यासाठी आणि प्रत्येक माणसाचे मन सुविचार संपन्न होण्यासाठी वाचनाची आवड मुळातूनच निर्माण होणे आवश्यक आहे.
तरुणांमध्ये वाचन वेड उत्पन्न व्हायचे असेल तर तशी परिस्थिती त्यांच्याभवती निर्माण होणं गरजेचं आहे. वाचनाने माणूस मोठा होत असतो. पुस्तकांचे वाचन कराल तेवढेच ज्ञान वाढत जाईल. ग्रंथ हे गुरू आहेत. अलीकडच्या काळात आपल्या मोबाईल फोनवरसुद्धा विशिष्ट नंबर फिरविल्याबरोबर आजच्या घडीला जगातील कानाकोप-यात घडणा-या घटकांची अद्ययावत माहिती प्राप्त होते. जुन्या पिढीपाशी ही अद्ययावत साधने नसल्यामुळे जास्तीत जास्त वाचनातून ते आपली ज्ञान-लालसा भागवत असत.
मात्र आज वाचनासाठी अनेक उत्तम साधने हातात उपलब्ध असूनही तरुण पिढी वाचनापासून दूर जात आहे. ती मोबाईलच्या आहारी जाऊन आणि इंटरनेटवर वेळ घालवत असल्याचे आजचे चित्र आहे. त्यांना वाचनासाठी वेळ उपलब्ध नसतो. असं कारण सांगितलं जातं. नव्या माध्यमांच्या आगमनानं वाचन संस्कृती लोपते आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लोकमान्यांनी ‘तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व घडवायचे असेल तर वाचन करा’ असा संदेश दिला. धावत्या युगाच्या बरोबरीने धावायचे असेल तर वाचन करा, असा उपदेशही त्यांनी दिला. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या दुनियेत गुंतल्यामुळे त्यांच्या उपदेशाकडे नव्या पिढीचे लक्ष नाही. सखोल विचारातूनच एकरूप समाज निर्मित होत असतो आणि सखोल विचार करण्याची सवय चांगल्या वाचनातूनच तयार होते.
वाचन म्हणजे जीवनाला उन्नत करणारी बाब असून यामुळे बुद्धीची मशागत होते. माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्त्वाचा वाटा असतो. यामुळे वाचनाचा छंद जोपासून आपले जीवन समृद्ध करा. त्याचप्रमाणे जगण्याच्या परिपूर्णतेसाठी वाचन हे आवश्यक आहे. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहानांपासून मोठय़ांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय असे. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली आहे.
ऑनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे. तरुणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात.
पुस्तकांमधील समृद्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जातो. पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढवण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षाचे क्षितीज निर्माण करणारे साधन आहे. पुस्तके आपल्याला सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करतात. पुस्तकांचं महत्त्व तरुणांना पटलं पाहिजे.
वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. त्यामुळे निराशेच्या गत्रेत अडकलेला माणूस आत्महत्या, हत्या असे प्रकार करण्यापासून परावृत्त होतो. आजकालच्या तरुणांना खूप ताण असतो. त्या अनुषंगाने वाचन त्यांना मदत करू शकते.
वाचन संस्कृती जपण्याशिवाय पर्याय नाही. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो. नियमित वाचन केले तरच भावी पिढी सक्षम व सुजाण होईल. तरुण पिढीने पुस्तक वाचन हा छंद जोपासला पाहिजे. साक्षर तरुणांपैकी ६१ टक्के जण, त्यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत समाधानी आहेत. मात्र, वाचनाचा छंद असलेल्या तरुणांमध्ये समाधानाचे प्रमाण ७० टक्के, तर कमी वाचन करणाऱ्यांमध्ये हेच प्रमाण ५८ टक्के आहे.
वाचन समृद्ध असले म्हणजे लेखनाचीही प्रवृत्ती प्रबल होते, कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, दुस-याच्या दु:खाची जाणीव, ती समजून घेण्यासाठी आवश्यक असणारे संवेदनशील मन यांस खतपाणी मिळते. इतरांबाबत, समाजाबाबत, आपली काही कर्तव्ये आहेत याचे भान प्राप्त होते.
मन संकुचित, क्षुद्र गोष्टीत अडकत नाही. वाचनामुळे माणसाला माणूस म्हणून असलेल्या अस्तित्वाचे मोल किती अनमोल आहे याचे भान प्राप्त झाल्याशिवाय राहात नाही. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत आपण वाचन संस्कृतीची जनजागृती केली. पुस्तकांविषयी ही कायमची ओढ तरुणांच्याही मनात निर्माण होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा