मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा...
मित्र आणि मैत्रिणी या बद्दल एक छान फॉरवर्डेड लेख . मित्र नावाचा नातलग...ना जवळचा ना लांबचा...पण हाकेच्या अंतरावरचा.. (लेखन...डॉ.महेंद्र वंटे...) १९६५ चा जून महिना ...चार साडेचार वर्षांची बालकं .. धाकदपटशा करून बालवाडी नामक एका कौलारू खोलीत पालकांनी ढकललेल्या रडारडीच्या गलक्यात मी पण ढकलला गेलो.... कुणी हमसून हमसून तर कुणी भोकाड पसरून..पण सगळेच रडके.. ...या समूह रुदनाकडे मख्ख पणे पाहणाऱ्या जोशी बाई.. प्रत्येकाच्या डोळ्यात एकमेकाविषयी सहानुभूती ..एक दोन दिवस रडण्यात गेले... मग चेहऱ्यावर निर्विकार भाव..मग हासरी आपुलकी... दोन दिवस गाळलेल्या आसवांच्या थेंबात मैत्रीची बीजं ओलावली.... अंकुरली... ...पालवली.. फुलली... आणि फूलतच राहीली.... भावनिक मुळं एकमेकात जी अडकली तो गुंता अजूनही शाबूत आहे. अ..अननसाचा...ब..बदकाचा .. पेक्षा...म... मित्राच्या ओढीने शाळेकडे पावलं खेचू लागली...कुणी चालत तर कुणी बापाच्या सायकलवर तर एखादा फटफटीवर... कुणी डॉक्टरचा, कुणी सायबाचा, कुणी शिक्षकाचा पण बरीच मोठी पिलावळ कामगारांच्या बिऱ्हाडातील......... सवर्ण,अवर्ण,गौरवर्ण,कृष्णवर्ण, गरीब,श्रीमंत. सामाजिक भेदाभेदीची