कर्ण भाग - 4
🚩 *राधेय/४* 🚩
कर्ण-प्रासादात एकच गडबड उडाली होती. दुर्योधनाच्या सेवेसाठी सारे गुंतले होते. राजप्रासादासमोर दुर्योधनाचा गजध्वजांकित सुवर्णरथ उभा होता. दुर्योधनाचे रक्षकदळ प्रासादासमोरच्या विस्तीर्ण उद्यानात विखुरले होते.
सूर्योदयानंतर कर्ण दुर्योधनभेटीसाठी दुर्योधनाच्या महाली गेला. कर्णाने नम्र भावाने दुर्योधनाला वंदन केले; पण ते पुरे होण्या आधीच कर्णाला जवळ घेत दुर्योधन म्हणाला, ‘हा औपचारिकपणा सोडून दे. तू अंगराज आहेस. माझा मित्र आहेस.’
‘त्या दोन्हीही आपल्याच कृपा.’
‘केव्हा आलास?’
‘निरोप मिळताच निघालो. रात्री आलो, तेव्हा आपण निद्राधीन झाला होता. आपण अचानक आलात, त्यामुळं आपल्या स्वागताला...’
‘काही कमतरता पडली नाही. घर मला परकं का आहे?’
दोनप्रहरी भोजन झाल्यानंतर कर्णमहालात कर्ण, दुर्योधन, वृषाली एकत्र बसली असता दुर्योधनाने विषय काढला.
‘कर्णा, फक्त तुझ्या भेटीस्तव मी इथवर आलो नाही. मी तुला नेण्यासाठी आलोय्.’
‘जशी आज्ञा!’
‘कुठं, म्हणून विचारलं नाहीस?’
‘तो माझा अधिकार नाही.’
‘तुझा पराक्रम दाखवण्याची एक संधी आपल्या पावलानं चालून आलीय्.’
‘पराक्रम?’
‘हो! मी तुला स्वयंवराला नेण्यासाठी आलोय्.’
‘द्रुपद राजकन्येच्या?’
‘बरोबर! तुला आमंत्रण आलं असेलच ना!’
‘होय! कृष्णानंही सांगितलं होतं.’
‘कृष्ण!’
‘सांगायचं राहूनच गेलं. आठ दिवसांपूर्वी द्वारकाधीश कृष्ण इथं आले होते.’
‘इथं आले होते? कशासाठी?’
‘यांना भेटायला.’ वृषाली म्हणाली, ‘ते दोन दिवस फार चांगले गेले.’
‘अस्सं?’ दुर्योधन विचारात गुंतला.
‘का? मित्रा, कसला विचार करतोस?’ कर्णाने’ विचारले.
‘कृष्णाचं काही काम होतं?’
‘मुळीच नाही! ते कामरूपदेशी तपश्चर्येला गेले होते. परतताना अचानक त्यांनी इथं वास्तव्य केलं.’
दुर्योधन हसला. आपल्या मांडीवर थाप मारीत तो म्हणाला, ‘या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा-पुढचा काही संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं. मी सांगतो, कृष्ण का आला होता, ते.’
‘का?’
‘कारण एकच! जरासंधाची भीती. कामरूप, अंगदेश यांवर सत्ता त्याची. तो कृष्णाचा वैरी. त्या जरासंधाचा पराभव करून सख्य जोडणारा फक्त तू एकटाच आहेस. तुझी मैत्री सहज घडली, तर कृष्णाला हवी होती, म्हणून त्यानं वाकडी वाट केली.’
कर्ण त्यावर काही बोलला नाही.
दुर्योधनाने मूळ विषयाला हात घातला. ‘कर्णा, मग स्वयंवराला येणार ना?’
‘नाही.’
‘का? पण अवघड आहे, म्हणून?’
‘कसला पण?’
‘महादुर्घट पण आहे. द्रूपदानं मत्स्ययंत्र उभारलंय्, ते भेदण्याचं सामर्थ्य फक्त तुझंच आहे.’
‘युवराज, हा हट्ट सोडा! तुमच्या कृपेमुळं मला सत्ता, ऐश्वर्य प्राप्त झालंय्. दासदासींनी संपन्न असलेल्या या प्रासादात वृषालीसारख्या सहधर्मिणीसह मी तृप्त आहे. या प्रासादात आणखी एका राज्यकन्येची आवश्यकता नाही.’
‘आपल्या दुबळेपणाला झाकण्यासाठी केवढं सुंदर कारण सांगितलंस! व्वा! मित्रा, मी प्रसन्न आहे.’
‘दुबळेपणा झाकण्यासाठी?’
‘नाहीतर काय? त्या मत्स्ययंत्राचं नाव ऐकताच कौरव सभेतल्या एकेका वीरांनी अनेक कारणं सांगून माघार घेतली. पण एवढं सुरेख कारण मी ऐकलं नव्हतं.’
‘मी त्या मत्स्ययंत्राला भ्यालो नाही.’
‘तेच!’
‘असले अनेक मत्स्यभेद करण्याचं सामर्थ्य माझं आहे.’
‘तेच!’
‘मित्रा, मी नुसती द्रोणाचार्यांकडूनच दुरून संथा घेतली नाही. भगवान परशुरामांकडं मी शस्त्रविद्या शिकलोय्.’
‘बस्स कर, कर्णा!’ दुर्योधनाचा आवाज चढला, ‘ऐन वेळी ज्या गुणांचा वापर करता येत नाही, त्या गुणांची कुळकथा कशाला सांगावी! माहीत आहे, त्या द्रुपदानं मला काय निरोप पाठवलाय्, तो? तुमच्या राजसभेत कोणी वीर असेल, तर मत्स्यभेदाचं आह्वान स्वीकारायला त्या वीरासह या. तसं झालं नाही, तर निदान माझं आतिथ्य स्वीकारायला या. ठीक आहे. घरी उपास घडतो, म्हणून अन्नसेवनासाठी द्रुपदाच्या घरी कौरवयुवराजानं जायला काहीच हरकत नाही.’
‘मित्रा!’
‘कर्णा, मित्र या शब्दाची लाज बाळगण्याची वेळ आली आहे. कौरव राजसभेचा तेजोभंग होण्याची वेळ आली असता, कसली कारणं सांगतोस?’
‘मित्रा, तू कष्टी होऊ नकोस. मी येईन. मत्स्यभेद करीन. स्वयंवर जिंकीन. मी आहे, तोवर तुला अपमानित होण्याचा प्रसंग येणार नाही.’
दुर्योधनाच्या चेहऱ्यावर आनंद विलसला. त्यानं उठून कर्णाच्या पाठीवर थाप मारली. वृषालीकडे पाहत तो म्हणाला, ‘वहिनी, तुमची हरकत नाही ना?’
‘मुळीच नाही! राजकन्येचं या घरी स्वागत करण्यात मला आनंदच वाटेल.’
प्रयाणाच्या दिवशी कर्ण आपल्या महालातून बाहेर पडत असता वृषालीने आठवण दिली, ‘मग स्वयंवराला नक्की जाणार ना?’
आपली दृष्टी रोखीत कर्ण म्हणाला,‘निश्चित!’
‘स्वयंवरात भाग घेणार?’
‘निश्चित! वृषाली, मी जेव्हा स्वयंवराला जातो, तेव्हा ते जिंकण्यासाठीच! तिथं अपयश नसतं. माघारी येईन, ते राजकन्या घेऊनच.’
‘मी वाट पाहते. तुम्हां दोघांचं स्वागत करण्यात मला आनंदच वाटेल.’
‘जरूर वाट बघ.’
वृषालीला आपल्या मिठीत घेत कर्ण गुदमरलेल्या आवाजात म्हणाला.
✍️ *क्रमश:* ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा