कर्ण भाग - 2

🚩 राधेय/2 🚩


दोन प्रहर टळत असता कृष्णाला जाग आली. दासींनी दिलेल्या जलाने मुखप्रक्षालन करून कृष्ण माघारी वळला. उद्यानाच्या बाजूने हसण्याचा आवाज कानांवर आला. त्या आवाजाच्या रोखाने कृष्ण सज्जाकडे गेला. सज्जावर उभा राहून कृष्णाने पाहिले. प्रासादाच्या जवळच उद्यानामध्ये एका जागी त्याची दृष्टी स्थिरावली.


उद्यानात एका मोकळ्या जागी एक वेताचा मोर उभा होता. त्याच्यापासून थोड्या अंतरावर वृषसेन आपले लहान धनुष्य घेऊन आकर्ण प्रत्यंचा खेचीत होता. त्याच्या मागे महाबाहू कर्ण उभा होता.


बाण सुटला आणि वेताच्या मोराच्या मानेतून आरपार गेला.


वृषसेनाच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य पसरले. त्याने आनंदाने कर्णाकडे पाहिले.


त्याच वेळी सज्जातून कृष्णाचा आनंदोद्‌गार उमटला, ‘धन्य धन्यऽ ऽ’


कर्ण-वृषसेनांनी एकाच वेळी वर पाहिले, कृष्णाला पाहताच कर्ण माघारी वळला. ते पाहुन कृष्णाने सज्जावरून हाक दिली, ‘अंगराज, थांबा! मीच खाली येतो.’


कृष्ण उद्यानात आला, तेव्हा कर्ण त्याला सामोरा गेला.


कर्ण म्हणाला, ‘क्षमा असावी. आपली निद्रा झाल्याचं ध्यानी आलं नाही.’


‘क्षमेची काहीच गरज नाही. उलट, वृषसेनाला देत असलेलं शिक्षण पाहून कौतुक वाटलं. हा जरा मोठा झाला की, आश्रमात जाऊ लागेल. तोवर शस्त्रविद्येत काही शिकण्याजोगं राहणार नाही.’


‘वृषसेनाला त्याची विद्या त्यालाच मिळवावी लागेल. त्याला हवी ती विद्या त्याला कधीच शिकवली जाणार नाही.’ कर्ण तुटकपणे म्हणाला.


‘का? द्रोणाचार्यांच्या हाती तुम्ही विद्या मिळवली. तशीच हा कुणातरी श्रेष्ठ गुरुच्या हातून मिळवील.’


‘ते मी अनुभवलंय. अधिरथ धृतराष्ट्र महाराजांचे स्नेही. त्यांच्या कृपेमुळं राजपुत्रांसह आश्रमात जाण्याचं भाग्य मला लाभलं. एकदा पोपटाचं लक्ष्य समोर ठेवलं होतं. गुरुदेवांनी डोळा टिपण्याची आज्ञा दिली. एका रेषेत उभ्या असलेल्या आम्हां मुलांवर गुरुदेवांची दृष्टी फिरली. मी माझं धनुष्य सरसावून उभा होतो. गुरुदेव मला मागे होण्याची आज्ञा करीत म्हणाले,


‘राधेया, मागं हो! सूतपुत्रांना एकाग्रता लाभत नाही. युवराजांचा लक्ष्यभेद नीट बघ. त्यांचं अनुकरण कर. त्यातच कल्याण आहे.”


कर्णाच्या चेहऱ्यावर त्या आठवणीने संताप प्रगटला होता. त्याने आपले धनुष्य हाती घेतले. वेताच्या मोराकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, ‘तो डोळा पाहा.’


कर्णाने आपले धनुष्य पेलले. बाण लावून प्रत्यंचा खेचली. कर्णाच्या दंडावरच्या रत्नजडित केयूरावर हेलावणारा मोत्याचा गोफ स्थिर झाला. ‘सप’ असा आवाज करीत बाण घोंगावला आणि मोराच्या डोळ्याचा छेद घेऊन आरपार गेला. कर्ण समाधानाने मोराकडे जात होता.


कृष्णाचे कुतूहल जागृत झाले. दोघे मोराजवळ गेले. मोराच्या दोन्ही डोळ्यांचा बरोबर छेद बाणाने घेतला होता. 


त्या डोळ्यांकडे बोट दाखवीत कर्ण म्हणाला, ‘या डोळ्यानं खूप शिकवलं. या पृथ्वीतलावर ज्ञान फक्त तपश्चर्येच्याच द्वारा मिळतं. गुरुकृपा आम्हांला अवगत नाही. सूतपुत्रांना गुरुकृपा कधी लाभत नाही. गुरुजनांची विद्या फक्त राजपुत्रांनाच दिली जाते. रावणकथा सांगितलीत ना! तीच खरी. सूतपुत्रांना तपश्चर्येच्या द्वारे ज्ञानाची कवाडं उघडली जातात. द्रोणाचार्यांनी ब्रह्मास्त्र शिकविण्याचं नाकारलं, म्हणून मी गुरुदेव परशुरामांकडं गेलो. ज्ञानासाठी असत्याची कास धरली. भ़ृगुकुलोत्पन्न ब्राह्मणपुत्र म्हणून त्यांनी माझा स्वीकार केला. ब्रह्मास्त्र मिळालं; पण त्याचबरोबर गुरुसेवेसाठी पाळलेल्या संयमातून दोन उग्र शाप नशिबी आले. एकलव्याला विद्या मिळालीच नाही, पण मानलेल्या गुरुभक्तीमुळं त्याला आपल्या अंगठ्याला मुकावं लागलं. नाही, महाराज, या वृषसेनाला विद्या मिळवायचीच असेल, तर स्वत:च्याच बाहुबळावर ती प्राप्त करून घ्यावी लागेल.’


थोडी उसंत घेऊन आपल्या बोलांनी चकित झालेल्या कृष्णाकडे खिन्नपणे पाहत कर्ण म्हणाला,


‘कोरड्या विहिरीत पडलेली राजपुत्रांची विटी बाणानं बाहेर काढून देऊन द्रोणाचार्यांनी कौरव-राजसभेत मानाचं स्थान मिळवलं असेल; पण ज्याच्या जीवनाची विहीर जातीच्या, स्नेहाच्या ओलाव्याअभावी कोरडी असेल, त्याच्या मनाची विटी बाहेर काढायला समर्थ असा गुरु या धरणीवर मिळत नाही, ते कष्ट त्यानंच घ्यायला हवेत.’


‘अंगराज, द्रोणाचार्यांनी शिकवलं नसेल, म्हणून तुझं ज्ञानार्जन थोडंच थांबलं? गुरुचा जिव्हाळा मिळाला नसेल; पण अजोड मित्रप्रेम लाभलं ना? त्याच मित्रप्रेमापोटी आज तू हे अंगराज्य भोगतोय्स ना? तिथं तर तुझं सूतकुल आडवं आलं नाही?’


कृष्णाच्या शब्दांनी कर्णाचा सारा अहंकार जागा झाला. आपले नेत्र कृष्णावर स्थिरावीत तो म्हणाला, ‘दुर्योधनाच्या मैत्रीचा मला अभिमान वाटतो... अन् का न वाटावा? शस्त्रस्पर्धेच्या वेळी सारे युवराज स्पर्धेमध्ये भाग घेत होते. त्यांचं वारेमाप कौतुक होत होतं अन् मी ते सारं पाहत मागं उभा होतो. वीरत्वाची उणीव होती, म्हणून नव्हे, ते वीरांचं रिंगण होतं; अशी माझी समजूत होती अन् म्हणूनच मी अर्जुनाला आह्वान दिलं. अर्जुनाच्या साहाय्याला त्या अन्नाचे मिंधे असलेले कृपाचार्य धावले आणि सर्वांदेखत त्यांनी मला माझ्या कुलाचा उच्चार करावयास सांगितला. मला माझ्या कुलाची लाज वाटली नाही. पण कृपाचार्यांनी केलेल्या वर्तनाचा मला संताप आला होता. ज्या अधिरथांच्या कुलात मी वाढत होतो, ते कुल साऱ्या हस्तिनापुराला माहीत होतं. आश्रमात प्रवेश करतानाच युवराजांनाच नव्हे, तर आश्रितांनाही कुलोच्चार करावा लागतो. एका युवराजाच्या प्रतिष्ठेसाठी शिष्याची अप्रतिष्ठा करू पाहणारे गुरु कसले? ज्या वेळी सारे माझा तेजोभंग आनंदानं पाहत होते, तेव्हा दुर्योधन धावला अन् त्या क्षणी त्यानं अंगदेशाचा अभिषेक करून मला राज्य दिलं.’


‘ते मित्रप्रेम मीही जाणतो. कुणीही तृप्त व्हावं, असंच हे प्रेम आहे.’


‘नाही. या कर्णानं आजवर कुणाचंच दान घेतलं नाही. अंगराज्य प्राप्त होऊनही मी ते पद कधी स्वीकारलं नाही. दुर्योधनासह मी चित्रांगदेच्या स्वयंवराला गेलो असता माझ्या संकेतानं दुर्योधनानं राजकन्येचं हरण केलं. तेव्हा तिथं जमलेल्या नरशार्दूलांच्या विरोधाला मी एकटा सामोरा गेलो. जरासंधाचं मल्लद्वंद्वाचं आह्वानही मी स्वीकारलं. मी विजयी झालो, तेव्हा जरासंधानं आपली मालिनी नगरी मला अर्पण केली. तीच ही चंपानगरी. स्वपराक्रमानं जेव्हा मिळवलं, तेव्हाच मी अंगदेशाचं आधिपत्य स्वीकारलं.’


‘तोही पराक्रम मी ऐकलाय्.’ कृष्ण म्हणाला, ‘ज्या जरासंधाच्या आक्रमणाच्या भीतीनं मी यादवांसह मथुरा सोडली अन् द्वारका वसवली, त्याच जरासंधाशी द्वंद्वातून सख्य मिळवणं हा सामान्य पराक्रम नव्हे.’


कृष्णस्तुतीने कर्णाचे उद्विग्न मन थोडे शांत झाले. त्याचे मन संकोचले. गडबडीने विषय बदलीत तो म्हणाला, ‘एक विनंती आहे...’


‘बोला.’


‘आपल्या मनात माझ्याबद्दल स्नेहभाव असेल, तर कृपा करून मला बहुमानार्थी संबोधू नये.’


‘ठीक.’


‘अन् माझ्याबरोबर चंपानगरीच्या फेरीला आपण यावं.’


‘फेरी?’


‘हो! आपण नगरीत आल्याचं साऱ्यांना कळलंय्! नगरवासी आपल्या दर्शनाला उत्सुक आहेत. त्याचबरोबर रथशाला, गोधनही आपल्याला पाहता येईल.’


‘आनंदानं येईन! राजासह प्रजा पाहण्याचा आनंद कोण सोडील?’


कर्णरथ सज्ज झाला होता. मागे-पुढे रक्षक अश्वदल दौडत होते, कर्ण रथाचे सारथ्य करीत होता. कृष्णदर्शनासाठी राजरस्ते माणसांनी फुलून गेले होते.


कृष्णाने कर्णासह चंपानगरीचे दर्शन घेतले. रथशाला, गोधन पाहिले.


माघारी येत असता कर्णाचा रथ एका जुन्या वास्तूसमोर थांबला. त्या वास्तूच्या दाराशी रक्षक उभे होते. कर्णापाठोपाठ कृष्ण उतरला. रक्षकांनी तत्परतेने द्वार उघडले. आत जाताच भव्य चौक दृष्टीस पडला. त्या चौकात मध्यभागी पारिजात फुलला होता. वृक्ष जुनाट वाटत होता. चौकाच्या समोर घोटीव खांबांनी साकारलेला प्रशस्त सोपा होता. कर्ण पायऱ्या चढून सोप्यावर गेला. सायंकाळच्या वातावरणात सारा परिसर गूढ वाटत होता. कृष्णाचे लक्ष त्या सोप्यावर ठेवलेल्या सुबक, पण आकाराने लहान अशा रथावर खिळले होते. त्या रथाच्या आरीपासून मेघडंबरीपर्यंत प्रत्येक भाग नक्षीने कोरला होता.


कृष्णाला राहवले नाही. त्याने विचारले, ‘कर्णा, ही वास्तू कुणाची?’

आपल्याच तंद्रीत गुंग असलेला आणि कृष्णाचे अस्तित्वही विसरलेला कर्ण त्या प्रश्नाने भानावर आला. मागे वळून तो उद्‌गारला, ‘अं?’


‘ही वास्तू कुणाची?’


‘आमची! कृष्णा, याच जागेत माझं बालपण गेलं. सूतांची नगरी म्हणून या चंपानगरीचा लौकिक. नदीप्रवाहावर मी वाहत आलो असेन; पण राधाईच्या प्रेमामुळं मला केव्हाच पोरकेपण जाणवलं नाही. माता-पित्यांचं प्रेमसुद्धा त्यापेक्षा काही मोठं असेल, असं मला वाटत नाही. मी सापडल्यानंतर राधाईला मुलं झाली, पण या जिव्हाळ्यात उणेपणा पडला नाही.’


हे सांगत असता कर्ण त्या रथावरून हात फिरवीत होता. कर्ण भरल्या आवाजात म्हणाला, ‘मी लहान असताना तातांनी हा रथ माझ्यासाठी घडवला होता. केव्हा माहीत आहे? मी शिक्षणासाठी आश्रमात गेलो. माझा वियोग तातांना, राधाईला सहन होईना. भरला संसार असूनही ते माझ्याविना एकाकी बनले. ते मन गुंतवण्यासाठी तातांनी उत्कृष्ट कारागीर बोलावले. तातांच्या देखरेखीखाली रथाचं काम सुरू झालं, रथ तयार झाला; पण एक फार मोठी चूक झाली.’


‘कोणती?’


कर्ण हसला. ‘बालवयाच्या कर्णाचं रूप डोळ्यांसमोर ठेवून त्याच्या करता केलेला रथ. मी आश्रमातून आलो, तो मोठा होऊन. आमच्यांतला हा नेहमीचाच थट्टेचा भाग होऊन राहिलाय्.’


कर्ण बोलता-बोलता परत गंभीर झाला. त्याचे हास्य विरले. नेत्र पाणावले. ‘पण हा रथ इथं असाच राहिला. तातांनी स्वत:च्या मुलांनाही तो वापरू दिला नाही. तातांची, राधाईची आठवण झाली की, मी इथं येतो. ही वास्तू होती, तशी जतन करण्यासाठी मी जपतो.’


ती रथाची कथा ऐकून कृष्णही अस्वस्थ झाला. कर्णाच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला,


‘कर्णा, या जीवनात साऱ्या इच्छा-आकांक्षा यांचं हेच होतं. त्यांची स्वप्नं उराशी बाळगून असेच सुबक देव्हारे आपण मनात तयार करीत राहतो; पण त्या इच्छा-आकांक्षा साकार होतात, तेव्हा त्यांनी वेगळाच आकार धारण केलेला असतो. त्यांच्यासाठी मनात कोरलेले देव्हारे पार अपुरे ठरतात. त्या देव्हाऱ्यांना शेवटी अडगळीचंच स्वरूप येतं.’


कर्णाने कृष्णाकडे पाहिले आणि तो म्हणाला, ‘सत्य असलं, तरी पचवणं भारी कठीण जातं. अंधार पडू लागला. जाऊ आपण.’


दिवेलागणीच्या वेळी कृष्णासह कर्ण प्रासादावर आला. रात्री भोजन झाल्यावर कृष्णाने दुसऱ्या दिवशी प्रयाणाचा बेत सांगितला. कर्ण-वृषाली ते ऐकून चकित झाली.


कर्ण म्हणाला, ‘आपल्या आदरातिथ्यात काही उणीव पडली असली, तर क्षमा करावी, पण आपला सहवास अधिक लाभावा, असं वाटतं.’


‘कर्णा, राजैश्वर्यानं युक्त असलेल्या तुझ्या प्रासादात उणीव कसली? तुमचा सहवास मला प्रियच आहे. पण द्रुपदानं आपल्या कन्येचं स्वयंवर मांडलंय. द्रुपद माझा स्नेही. त्या स्नेहभावासाठी मला तिकडं जाणं आवश्यक आहे. स्वयंवराचं आमंत्रण तुलाही असेल ना?’


‘हो!’


‘मग तू येणार नाहीस?’


‘नाही.’


‘कारण?’


‘द्रुपदाचा माझा स्नेह नाही... अन् वीरांनी स्वयंवराला जावं, ते जिंकण्यासाठी.’ वृषालीकडे पाहत कर्ण म्हणाला, ‘त्यासाठी आता स्वयंवर धुंडण्याची मला गरज नाही. मी माझ्या जीवनात तृप्त आहे.’


कृष्ण प्रसन्नपणे हसला.


वृषाली लाजली.


कर्णाने विचारले, ‘पण उद्याच...’


‘हो! मी स्वयंवरासाठी जात नाही. स्वयंवराच्या तयारीसाठी मला आधी जावं लागेल.’


‘द्रुपद राजकन्या सुंदर आहे?’


‘सुंदर हा शब्द फार अपुरा! ती कन्या द्रुपदाची नव्हे. द्रुपदानं केलेल्या यज्ञातून उद्‌भवलेली ती तेजस्वी कन्या आहे.’ वृषालीकडे पाहत स्मित करीत कृष्ण म्हणाला, ‘वृषाली, यानं बेत बदलला, तरी याला स्वयंवराला पाठवू नकोस. ती याज्ञसेनी कदाचित याच्या रूपावर, कवच-कुंडलांवर भाळून जाईल. कर्णा, मी जातो, म्हणून वाईट वाटून घेऊ नकोस. भेट, किती कालाची घडली, यापेक्षा, ती कोणत्या भावनेनं घडली, याला महत्त्व असतं. तुमचा हा जिव्हाळा माझ्या मनातून कधीच सरणार नाही.’


दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी प्रासादसौधावर कृष्ण, कर्ण, वृषसेन, वृषाली उभे होते. प्रासादासमोर कृष्णदळ सुसज्ज उभे होते. पूर्वक्षितिजावर रुपेरी कड दिसू लागली.


कृष्ण म्हणाला, ‘कर्णा, आता निरोप दे.’


‘आपल्याबरोबर मी थोडं अंतर येतो ना!’


‘नको! निरोप कधीही मंद गतीनं घेऊ नये. त्यानं दु:ख वाढतं. निरोप शक्य तेवढ्या लौकरच संपवावा. तुम्ही प्रासादाच्या द्वारीही येऊ नका. इथंच उभे राहा. तुझा निरोप घेत असता बराच काल तुम्हांला पाहता येईल. मग मी येऊ?’


कृष्णाच्या त्या बोलण्याने कर्णाचा कंठ दाटून आला. दोन दिवसांचा अल्प सहवास, पण अनेकानेक वर्षांच्या दाट मैत्रीसारखा तो भासत होता.


कर्ण म्हणाला, ‘कृष्णा, मी काय सांगणार? राहा, म्हटलं, तर अधिकार गाजवल्या सारखं होतं; जा, म्हटलं, तर उपेक्षा भासते; मनाला येईल, तसं कर, म्हटलं, तर उदासीनता दिसते. एवढंच सांगावंसं वाटतं की, आपण कुठंही असलो, तरी जेव्हा केव्हा आपल्याला एकमेकांची आठवण येईल, तेव्हा ती चांगल्या भावनेनं यावी. त्या आठवणीनं भेटीचा आनंद वाढावा.’


कृष्णाने कर्णाला एकदम मिठीत बद्ध केले. त्याच्या पाठीवरून हात फिरवीत तो म्हणाला, ‘तसंच होईल. तसंच घडेल.’


मिठीतून दूर होताच वृषालीने वंदन केले. कृष्णाचा हात उंचावला गेला; पण शब्द उमटले नाहीत. वृषसेन पुढे झाला. त्याने कृष्णचरणांवर मस्तक ठेवले.

कृष्णाने त्याला उचलून घेतले. त्याला आपल्या छातीशी लपेटत तो म्हणाला, ‘मित्रा, याला जप.’


वृषसेनाला खाली ठेवून कृष्णाने हातावरचा शेला सावरला. सुवर्णधाग्यांनी चित्रांकित झालेला निळा रेशमी शेला कृष्णाने हाती घेतला. तो कर्णाच्या हाती देत कृष्ण म्हणाला, ‘हा शेला एका श्रेष्ठ कलाकारानं विणला आहे. माझी आठवण म्हणून हा राहू दे. मी येतो.’


कृष्ण वळला आणि चालू लागला.


त्याच्या पाठमोऱ्या रूपाकडे कर्ण-वृषाली पाहत होते. काही बोलण्याचे भान कर्णाला नव्हते.


थोड्या वेळाने गंभीर शंखनाद त्या परिसरात उठला. पाठोपाठ टापांच्या आवाजासह उठलेला रथांच्या चाकांचा घरघराट ऐकू आला. कर्णाने पाहिले, तो आपल्या दळासह कृष्णाचा सुवर्णरथ राज-प्रासादाबाहेर जात होता. नकळत कर्णाचे हात जोडले गेले. उगवत्या सूर्याच्या किरणांत कृष्णाचा रथ दिसेनासा झाला.


एक दीर्घ नि:श्वास सोडून कर्ण वळला आणि मूर्तिमंत भीती त्याच्या मुखावर उमटली. कर्णाची दृष्टी जेथे स्थिरावली, तिकडे वृषालीचे लक्ष गेले. क्षणभर तीही जागच्या जागी खिळून उभी राहिली. वृषालीने कर्णाला हाताने इशारा केला आणि तिने हाक मारली, ‘वसूऽ’


वृषसेनाने वळून पाहिले.


त्याच्या चेहऱ्यावर हसू होते. वाऱ्याने कुंतल हेलावत होते. वृषालीच्या दृष्टीला त्याची दृष्टी भिडली होती. वृषाली आपली दृष्टी न हलवता सरळ वृषसेनाकडे गेली आणि त्याला हाताला धरून घेऊन माघारी आली.


कर्णाने नि:श्वास सोडला. त्याने विचारले, ‘भीती नाही वाटली?’


‘कसली? तो माझ्याकडं पाहीपर्यंतच भीती होती, नंतर वाटली नाही. तो हलणार नाही, याची खात्री होती.’


‘या डोळ्यांची एवढी ग्वाही?’


‘तो धाक डोळ्यांत नसेल, तर आई होता येत नाही.’ वृषाली म्हणाली.


कर्ण मिस्किलपणे हसून म्हणाला, ‘नाही. तसा तो धाक आम्हांलाही परिचयाचा आहे. त्याला तर आम्ही नेहमी भितो.’


वृषालीने कृत्रिम कोपाने कर्णाकडे पाहिले.


कर्ण मोठ्याने हसला. त्याने वृषसेनाला उचलून घेतले.


कर्णाचे लक्ष बाहेर गेले. दूरवर धुळीचे लोट उठताना दिसत होते.


कृष्णाच्या आठवणीने परत तो गंभीर बनला.


‘वृषाली, कृष्णभेटीचा आनंद एवढा असेल, हे मला स्वप्नातही जाणवलं नव्हतं. त्याच्या रूपानं या सूर्यासारखंच सारं जीवन उजळून गेल्याचा भास होतो....’ 


✍️ *क्रमश...* ✍️

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट

फक्त व्यक्त व्हायला शिका...

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾विशेष लेख :- प्रारब्धवशात जे आहे तेच होते...उदाहरणासकट