कविता - वाट पाहणारं दार
"वाट पाहणारं दार"🚪
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं
खरच सांगतो त्या
दाराच नाव आई बाबा असतं
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं
प्रत्येक घराला एक
*वाट पाहणार दार असतं🚪*
वाट पाहणाऱ्या या दाराला
आस्थेच महिरपी तोरण असतं
घराच्या आदरातिथ्याच
ते एक परिमाण असतं
नीतिमत्तेच्या उंबरठ्याआड
मर्यादेचं त्याला भान असतं
प्रत्येक घराला एक
*वाट पाहणार दार असतं🚪*
दारिद्र्याच्या दशावतारात
हे दार कधीच मोडत नसतं
कोत्या विचारांच्या वाळवीनं
ते कधी सडत नसतं
ऐश्वर्याच्या उन्मादात
ते कधी फुगत नसतं
प्रत्येक घराला एक
*वाट पाहणार दार असतं🚪*
सुना नातवंडांच्या आगमनाला ते
तुकडा पाणी घेऊन सज्ज असतं
लेकीची पाठवणी करताना
अश्रूंना वाट करून देतं
व्यसनात अडखळणाऱ्या पावलांना
ते जरबेनं ताळ्यावर आणतं
प्रत्येक घराला एक
*वाट पाहणार दार असतं🚪*
मित्रांनो,
उभ्या आयुष्यात फक्त
एकच गोष्ट जपा
उपहासाची करवत
या दारावर कधी चालवू नका
मानापमानाचे छिन्नी हातोडे
या दारावर कधी मारू नका
स्वार्थी अपेक्षांचे खिळे
या दारावर कधी ठोकू नका
घराचं रक्षण करणाऱ्या या दाराला
कधीच मोडकळीला आणू नका
कारण,
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं🚪
खरच सांगतो त्या
दाराचं नाव आई बाबा असतं
उबदार विसाव्याचं ते
एकमेव स्थान असतं
प्रत्येक घराला एक
वाट पाहणार दार असतं🚪
__________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा