आठवणींचा श्रावण
योगिनी श्रीनिवास पाळंदे
पुणे
आठवणींचा श्रावण
काही काही व्यक्ती जगातून निघून गेल्या तरी त्यांचं अस्तित्व राहातंच नं? शक्तीचं रूप कन्व्हर्ट होतं फक्त. आणि त्याची जाणीव ठायी ठायी होत राहाते.
*ती* माझ्या आयुष्यात अशाच कुठल्यातरी शक्तीरूपाने भिनून गेली आहे.
तसा भिंतीवर आहे तिचा एक निर्जीव फोटो.
पण तिच्या फोटोत ती नसतेच कधी. सारखी-सारखी फोटोबाहेर येते.
दूध निगुतीने तापवताना, रिकाम्या दुधाचं पातेलं निपटून खाताना,भांडी एकातएक रचून ठेवताना,चहात आलं घालताना,वाणसामानाची यादी टाकताना,वाण्याने पाठवलेलं सामान डोळ्यात तेल घालून बघताना.
तिच्यासारख तेल डोळ्यात कुठून आणू,हा प्रश्न आहेच म्हणा.
आमचा वाणी आणि ती ह्यांच्यातलं नातं भन्नाट होतं.
त्याला दुर्बुद्धी झाली की तो, हिने न मागितलेली वस्तू पाठवायचा.
ते लक्षात आल्यावर ही काय गप्प बसेल??
डोळे बारीक करून त्याचा फोन नंबर पाहून त्याला फोन करायची
*तुला सकसचं पीठ पाठवायला सांगितलेलं होतं ना रे? मग तू दुसरं कुठलंतरी माझ्या गळ्यात का मारतोस? पाठव त्या मुलाला पीठ परत न्यायला.आणि हो, ते परत केलेल्या पिठाचे पैसे वजा करायला विसरु नको*
वाणी मुकाट्याने तिला हवा तो ब्रँड पाठवायचा.
तिचं अगम्य अक्षर तोच *डिकोड* करू जाणे.
पतंजली हे नाव तिच्या लक्षात नाही राहायचं.यादीत लिहायची
*रामदेवबाबा साबण* !!!!!!!
वाणी मुकाट्याने पतंजलीचा साबण पाठवायचा.
माझ्या ऑफिसातून मिळालेली सोडेक्सोची मिल-कुपन वाण्याला द्यायला तिला खूप आवडायचं.
लहान मूल कसं हातात नोटा दिल्यावर रुबाब करतं ना तस्सा रुबाब करायची
आणि ऐटीत सोडेक्सोने पेमेंट करायची.
कालांतराने सोडेक्सो कार्ड आलं,तेव्हा ती कित्ती हिरमुसली होती आणि कार्ड मला देऊन टाकलं होतंन.
कर्मकांडावर तिचं अतिरेकी प्रेम.
माझ्या माहेरी कर्मकांडाच्याविरुद्ध वातावरण असल्यामुळे मला काहीच प्रथा माहिती नव्हत्या.त्याचा तिच्या स्टाईलने योग्य तो समाचार तिने घेतलाच होता.
त्यावेळी वाईट वाटायचं,माफक त्रासही व्हायचा.
साबुदाणा खिचडी करताना
खरकट मीठ आणि उपासाचं मीठ.
खरकट तूप आणि उपासाचं तूप,
ह्यावरुन ती जितकं बोलली आहे तितकंच,खरकटी गावी दुधाच्या पातेल्याला लावल्यावर आणि गंध दाट न उगाळण्यावरूनही बोलली आहे.
तिचा परखडपणा थोडा थोडा काटेरीही व्हायचा.
पण सुरवातीच्या वर्षांत टोचलेले काटे नंतर इतके बोथट झाले की टोचण्या ऐवजी ते गुदगुदल्या करायला लागले होते.
शनिवारी तेल आणायचं नाही,
सोमवारी नाहायचं नाही,इथपासून सुरू होणारि प्रथांची मालिका अन्न उरवू नको नाहीतर घरात कुणीतरी आजारी पडतं,इथे येऊन थांबायची.
आपण जर विरोध केला तर
*आपल्या माणसांनी सगळं सोडलंय* हे एक आवडतं वाक्य सुनावलं जायचं.
आता ह्यातलं *आपलं माणूस* कोण हे तीच जाणे.
सणावाराला मात्र तिच्या अंगात यायचं.
वटपौर्णिमेच्या आधीच बँकेत जाऊन लॉकरमधले दागिने काढणे.त्यातली काळी पडलेली चांदीची भांडी सोनाराला शिव्या देत देत घासणे
अशी पूजेच्या तयारीची सुरुवात होई.
"काही गुरुजींना बोलवायला नको,मी सांगेन तशी करू आपली पूजा " असं अफाट कॉन्फिडन्सने म्हणत सगळी तयारी करून ठेवे. स्वतः अगदी नथ बिथ घालून तयार व्हायची,मी नटायचा आळस केला की "तुला मुळी कसली हौसच नाही"असला आहेर मिळायचा.
'हा चला अपोष्णी घ्या.' अशी मारे झोकात सुरवात करून पुढे काहीतरी पुटपुटायची *इथे ते गुरुजी काहीतरी मंत्र म्हणतात ते मला नाही येत*
ह्या वाक्यावर मी आणि माझी नणंद हसू दाबायचो.
हसू दाबणे की कला तिच्यामुळे माझ्या अंगात विकसित झाली हे नक्की.
*देवळापासून ते दहाव्यापर्यंत* तिच्या स्पेशल कॉमेंट्समुळे मला विविध प्रसंगात हसू दाबावे लागले आहे.
श्रावणात ती एकेक करून सगळ्या उंची,सिल्क साड्या काढायची.
सोमवारी मात्र पांढरी शुभ्र लखनवी साडी नेसायची.
लघुरुद्राला खायला काय करायचं ह्या विषयावर आमच्या वादाची पहिली फैर झडे
*पेढा आणि वेफर्स बस झाले की,अजून काही कशाला हवंय? आमच्यावेळी असली खायची थेरं नव्हती*
"अहो काहीतरीच काय काहीतरी खायला करूया ना.पण गुरुजी साबुदाणा खिचडीला नको म्हणतायत.मग वरीतांदूळ दाण्याची
आमटी करूया का?"
माझा केविलवाणा प्रयत्न.
*आम्ही श्रावण सोमवारी-वरी नाही खात, त्यातून तुम्हाला काय हवं ते करा*
असं म्हणून *इशय कट* व्हायचा
ही तर फक्त नांदी असायची.
श्रावणी सोमवारी एक कढई गॅसवर चढवलेलीच असायची
*आम्ही श्रावण सोमवारी भाजक खातो*
नेहेमीप्रमाणे *आम्ही*!!!!
मग काय सकाळच्या कणकेपासून ते डाळ तांदुळापर्यंत सर्वांना भाजणे.
गोरी कणिक तांबूस व्हायची आणि पोळ्या कॅडबरी कलरच्या पण खमंग लागायच्या.तांदूळ डाळ भाजल्यामुळे खिचडी खमंग व्हायचीच पण खरा खमंगपणा तिच्या कॉमेंटरीमुळे लघुरुद्रात यायचा.
अलीकडे गुरूजींची टीम, लघुरुद्र करतानाही मोबाईलवर चॅटिंग करते.एकमेकांना खाणाखुणा करून हसणं चालतं.
ते पाहिल्यावर हिची
*सो कॉल्ड कुजबूज* सुरू!!!!!
*बघतेयस ना ह्यांच काय चाललंय ते!पूर्वी असं नव्हतं. हा कसला लघुरुद्र!!पुढच्या वर्षी ह्यांना मुळीच बोलवायचं नाही.*
ह्या वाक्याचा *व्हॉल्युम* ऐकून मी मेल्याहून मेल्यासारखी!!!!!
"अहो हळू बोला,ऐकायला जाईल."
*मी हळूच बोलतेय.आणि गेलं ऐकायला तर गेलं.*
मी पुनःश्च धरणी मातेच्या पोटात गुडूप.
नागपंचमीच्या दोन तीन दिवस आधीच तांदूळ धुवून वाळवून त्याचा रवा काढून ,त्याची गूळ आणि नारळ घालून खांडवी करायची.
ऑफिसला जाताना *घेऊन जा भरपूर,नाहीतरी आपल्याला कुठे एवढ्या संपणारेत* असले डायलॉग.
शुक्रवारी जिवतीची पूजा ती अगदी।मनापासून करायची.
पण पुरण करताना आमची दोघींची झकाझकी.
मला पुरण नुसतं खायलाही खूप आवडतं त्यामुळे खूप जास्त शिजवायची सवय,आणि हिला सदैव *उरलं तर घरातलं कुणीतरी आजारी पडेल* ही चिंता!!!
त्यामुळे श्रावणी शुक्रवारी,शिजवलेलं पुरण संपेपर्यंत माझ्या मागे-पुढे करून *जास्ती केलायस ना आता संपव* असा लकडा लावायची.
मला विचारायची,"मला शिवलिलामृत वाचायचंय,तुझी तारीख कधी आहे ते सांग,नाहीतर तुमच्या त्या गाऊनांचे *फलकारे* लागून शिवाशिव झालेली मला नाही चालायची"
मग दोघींच्या चर्चेच्या फेऱ्या व्हायच्या आणि शिवलीलामृतवाचनाची तारीख ठरायची.
ते वाचन करताना तिचं अष्टावधान मात्र चुकायचं नाही. एकीकडे पोथी वाचताना, केर लाद्या करणाऱ्या बाईकडे डोळे बारीक करून वॉच ठेवणे हे सुद्धा चाले.
*काल तिथला कोपरा नीट पुसून नाही घेतलास* हे वाक्य ऐकल्यावर शिवलीलामृताची पोथी वाचताना शंकरासारखा तिसरा डोळा उघडून ही कामवाल्या बाईकडे बघत होती ह्याचा पर्दाफाश व्हायचा.
ती कडवी धार्मिक होती पण नंतरच्या आयुष्यात प्रॅक्टीकलसुद्धा व्हायला लागली होती.
श्रावणात कांदा लसूण खायची परवानगी शेवटी शेवटी आम्हाला मिळाली होती.
"तुम्ही घाला तुमच्या भाज्यांमध्ये,मला भाजी केली नाहीस तरी चालेल.मी खाईन तूप गूळ पोळी."
गोकुळाष्टमीचे दही पोहे ह्यावर मात्र आम्हा दोघींची *युती* असे.
भरपूर दही,दूध,ताक,कोथिंबीर, वाटलेली मिरची,भिजवलेले शेंगदाणे आणि मजबूत साखर घालून केलेले दहिपोहे म्हणजे आम्हा सासू सुनांना खाद्यपर्वणी वाटायची.
विदर्भातल्या काही मैत्रिणींनी मला त्यात लोणचं,सांडगी मिरची, खारातली मिरची,डाळिंब,सफरचंद घालायला शिकवलं होतं, तो विषय निघाला की
*मुंबईत नाही असली फळ घालायची पद्धत.तू सुद्धा कुणा कुणाचं ऐकून प्रयोग करत असतेस.आम्ही नाही हो दही पोह्यात सांडगी मिरची वगैरे घातली.*
असा समारोप व्हायचा आणि आमच्या युतीला दणका बसायचा.
तिची पूजा आणि मोठ्या आवाजात टाळ्या वाजवत गायलेली आरती मुलांना इतकी आवडायची की अमेरिकेला गेलेल्या माझ्या लेकीला होम सिक वाटल्यावर मी आजीच्या आरतीचं लाईव्ह शूटिंग तिला दाखवलं होतं.त्यानंतरच माझ्या लेकीची मिटलेली कळी खुलली होती.
तिच्या व्यक्तिमत्वात इतकं जबरदस्त चैतन्य होतं की मरगळलेल्या मनाची झाडाझडती व्हायची.
ती कधी जाईल असं वाटलंच नव्हतं.
कमीत कमी शंभरी गाठेल असं वाटतं असतानाच ती गेली.
ती तिच्या मस्तीत गेली.कुणाकडूनही सेवा न घेता गेली.
*तुमच्या त्या ऍलोपथीची मला मुळीच गरज नाही* असं डॉक्टरांच्या तोंडावर सांगून गेली.
माझं रिकाम झालेलं घरट जास्तच रिकाम करून गेली.
दीड वर्ष होऊनही तिच्या नसण्याची अजून सवय होत नाही.
खूप उदास वाटायला लागलेलं असतं.
मग अचानक काळाची पान फडफडवत श्रावण येतो.तो येताना तिचं अस्तित्व घेऊनच आलेला असतो.
*श्रावण म्हणजेच चैतन्य म्हणजेच ती* इतकं सोपं असतं सगळं!!!
तिच्यासोबतच्या सगळ्या आठवणी श्रावणफेर धरतात आणि तो घननीळ माझ्या डोळ्यात बरसू लागतो.
माझ्याच नकळत मी श्रावणी सोमवारी गॅसवर कढई चढवते आणि कणिक भाजताना मीसुद्धा तिचा डायलॉग म्हणायला लागते *आम्ही बाई श्रावणात सोमवारी भाजक खातो*
@योगिनी श्रीनिवास पाळंदे पुणे
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा