जादूगार पाऊस ...
जादूगार पाऊस ...
रसिक वाचकहो, गेल्या काही दिवसांपासून मी तुमच्याशी निसर्ग आणि त्या संबंधात बोलतो आहे. मी मागे एका लेखात म्हटलं होतं की निसर्ग हा माझा वीक पॉईंट आहे. पण त्यापेक्षाही पाऊस हा माझा आणखी जिव्हाळ्याचा विषय. मी निसर्गावर बोलतोय. मग पावसावर बोलल्याशिवाय कसा राहीन बरं ? त्यांचं आणि माझं नातं खूप जुनं . जेव्हा कळायला लागलं तेव्हापासूनच. त्याची सगळी रूपं मी अनुभवलेली. त्याचं कधी रौद्र भयानक रूप, छातीत धडकी भरवणारं . सगळ्यांची दैना करणारं . तर त्याचा उदार रूप. सृष्टीला नवसंजीवनी देणारं रूप. ते तर मला अति प्रिय. श्रीकृष्णांनी गीतेत मला वसंत ऋतू आणि मार्गशिर्ष मास प्रिय असे म्हटले आहे. पण मला वाटतं की तोच सावळा कृष्ण सावळ्या मेघांचं रूप घेऊन पावसाळ्यातही आपल्याला दर्शन देतो. पाऊस देणाऱ्या इंद्रदेवाची पूजा त्यानं बंद करवली. आणि पावसापासून गोकुळाचं रक्षण करण्यासाठी त्यानं गोवर्धन आपल्या करंगळीवर उचलला.
मला वाटतं तोच कान्हा युगानुयुगे या पावसाच्या रूपाने सृष्टीचा गोवर्धन पर्वत उचलून नवसंजीवनी देत असावा. हा त्याने उचललेला गोवर्धन असतो, दुःख, दैन्य, दारिद्र्याचा, दुष्काळाचा. त्यापासून आपलं रक्षण करण्यासाठी तो आनंदघन पाऊस येतो. तो गीतेत जे म्हणतो ना, ' संभवामी युगेयुगे..' मला तर वाटतं या पावसाच्या रूपानं खरंच तो युगानुयुगेआपल्यात येत असतो. तो आला की सोबत उज्वल भविष्य घेऊन येतो. जमिनीतून उगवणारे हिरवे कोंब त्याचा सांगावा घेऊन येतात. ते आपल्याला भविष्याविषयी आश्वस्त करतात. अशा वेळी मला आठवते मंगेश पाडगावकरांची एक सुंदर आशयघन रचना. ' श्रावणात घननीळा बरसला..' आज मी तुमच्याशी या गीताबद्दलच बोलतो. कारण पाडगावकरांनी या गीतात आपल्या सगळ्यांच्या मनातले भाव व्यक्त केले आहेत असं मला वाटतं.
ही रचना मी कितीही वेळा ऐकली तरी माझं समाधान होत नाही. या गाण्यात ना एक सुंदर असा त्रिवेणी संगम झालेला आहे. आणि जेथे त्रिवेणी संगम असतो, त्या ठिकाणचे पावित्र्य, सौंदर्य मी आपल्याला काय सांगावे ? ती अनुभवण्याची गोष्ट आहे. पेढा किती गोड आहे हे सांगण्यापेक्षा त्याचा एखादा तुकडा जरी तोंडात टाकला, तरी बाकी काही सांगावे लागत नाही. या गाण्यात शब्द पाडगावकरांसारख्या सिद्धहस्त कवीचे. त्याला संगीतसाज चढवलाय ज्यांनी आपल्याला अनेक मधुर गाणी दिली अशा श्रीनिवासजी खळे यांनी. आणि हे गीत गायिलं आहे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी. श्रीनिवासजी यांचं मधुर संगीत, त्यात त्या गाण्याला शोभून गाण्याचं सौंदर्य खुलवणारी बासरीची साथ, लतादीदींचा जणू मधात न्हायलेला शब्द कान तृप्त करतो. आणि पाडगावकरांचे शब्द हृदयापर्यंत पोहोचवण्याचे काम दीदी आणि श्रीनिवासजी सहज करून टाकतात.
एखादी काव्यरचना ही इतकी सामर्थ्यवान असते की ती केवळ शब्दांच्या माध्यमातून रंग, रूप,ध्वनी आणि गंध यांचा प्रत्यय आपल्याला आणून देते. पाडगावकर आणि बालकवी यांच्या सारख्या सिद्धहस्त कवींच्या शब्दात ते सामर्थ्य आहे. बालकवींची ' श्रावणमासी हर्ष मानसी..' ही कविता कोणाला आवडत नाही ? किंवा भा रा तांबे यांची ' पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर..' ही कविता सुद्धा आपल्याला शब्दांच्या आश्रयाने दृश्याची, रंगरूपाची अनुभूती देते. आशा भोसलेंनी गायिलेले ' ऋतू हिरवा ..' हेही शांता शेळके यांचं असंच सुंदर गीत.
श्रावणात घननीळा या कवितेची सुरुवात बघा. ' जागून ज्याची वाट पाहिली, ते सुख आले दारी.. ' पाऊस म्हणजे सुख. त्याची वर्षभर जणू आपण चातकासारखी वाट पाहत असतो. म्हणून पावसाच्या रूपाने ते सुख दारी आले. या कवितेत तर जणू काव्य आणि अध्यात्म यांचा सुरेख संगम झाला आहे असे मला वाटते. कारण पुढच्याच ओळीत पाडगावकर म्हणतात ' जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी ...' त्या सावळ्या मेघांच्या रूपाने तो आता राधेला जणू काही सर्वत्र भेटतो. म्हणूनच कवी म्हणतो, ' माझ्याही ओठावर आले, नाम तुझेच उदारा .' आता तो सर्वव्यापी झाल्याने त्याचं नाव ओठांवर आपोआपच आलं आहे. आणि त्याला पाडगावकरांनी ' उदारा' हे विशेषण वापरलं आहे. कारण खरोखरंच पाऊस किंवा मेघ हे त्याचं उदार रूप आहे. त्याचं देणं आहे. त्याची आभाळमाया आहे. म्हणून तो उदार.
पुढचं कडवं किती सुंदर आहे बघा. 'रंगाच्या रानात हरवले ते स्वप्नांचे पक्षी, निळ्या रेशमी पाण्यावरती थेंबबावरी नक्षी. ' पावसानं सगळं रान हिरवंगार झालं आहे. पाचूच्या रंगानं सृष्टी नटली आहे. माझी स्वप्नं जणू त्याच्याशी एकरूप झाली आहेत. पावसाचे थेंब जणू निळ्या रेशमी पाण्यावर नक्षी काढताहेत. पुढची ओळ तर खूप सुंदर. ' गतजन्मीची ओळख सांगत आला गंधित वारा ...' पावसाबरोबर जो आपला गंध घेऊन आला आहे तो आपल्यासोबत अनेक आठवणी घेऊन आला आहे. पुढच्या कडव्यातील शब्द रंग आपल्यासोबत कसे घेऊन आले आहेत ते बघा.
पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले
माझ्या भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले
मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा..
झाडांची हिरवी पाने म्हणजे जणू पाचूच . ऊन हळदीचे आले .. किती सुंदर शब्द ! कपाळावर पडलेल्या पावसाच्या थेंबांचे आनंदाने जणू फुलपाखरू झाले. आणि सगळीकडे ओल्या मातीचा गंध भरून राहिला आहे. आता शेवटच्या कडव्यातील सौंदर्य आपल्यापुढे ठेवून हा लेख संपवतो.
पानोपानी शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतीचा नाद अनाहत, शब्दावाचून भाषा
अंतर्यामी सूर गवसला, नाही आज किनारा...
आपल्या हातांवर जशा भाग्यरेषा असतात, तशाच पानोपानी उमटल्या आहेत. या रेषा शुभशकुनाच्या आहे. येणारा भविष्यकाळ हा चांगला आहे, हेच जणू त्या सांगताहेत. ही निसर्ग, झाडे, सृष्टी आणि पावसाची प्रेमाची भाषा शब्दातीत आहे. शब्दांची गरज नाही. अशा वातावरणात जो आनंदाचा सूर अंतर्यामी गवसला आहे, त्याला सीमा नाही. असे हे पाऊसगाणे . आनंदाचे गाणे. बहुप्रतिक्षेनंतर तो आपल्या दाराशी येऊन उभा आहे. त्याचे हर्षोल्लासात स्वागत करू या. त्याच्या आगमनाबरोबर तो शीतलता, समृद्धी आणि शुभशकुनांच्या कोमल ओल्या रेषा घेऊन येवो हीच त्याला प्रार्थना. आणि आपणही म्हणू या ' येरे घना , येरे घना न्हाऊ घाल माझ्या मना...'
विश्वास देशपांडे
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा