◾अभंग :- पंढरीची वारी जयाचिये कुळीं |
🌻आनंदी पहाट🌻
मनाचिये वारी पंढरीची
सुलभ भक्ती सोपानाची
🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹
उघडली दृष्टी इंद्रिया सकट ।
वैकुंठीची वाट पंढरी जाणा ॥
दृष्टीभरी पाहे विठ्ठल दैवत ।
पूर्ण मनोरथ विठ्ठल देवे ॥
.....संत सोपानदेव
सासवड पुण्यालगतचे गाव. सोपानदेवांच्या वास्तव्यामुळे पुनीत अशी ही भूमी. सोपान अर्थातच भक्ती मार्गाचा डोंगर पार करण्यासाठी सुलभ शिकवण देणारे असे सोपानदेव. हे सोपानदेव भाग्यवान. त्यांना घरीच गुरु लाभले ते ज्ञानीयाच्या राजाचेही असे गुरु निवृत्तीनाथ.
सोपानदेव बालपणापासून भाऊबहिण.. संत नामदेवासह पंढरी वारी करायचे. त्यांच्या उक्ती आणि कृतीने त्यांनी भक्ती मार्ग सुलभ केलाय. यंदाही मानाच्या दहा पालखीमध्ये ज्ञानोबा, तुकोबांच्या समवेत सोपानदेव आहेतच.
भौतिक जगात सदैव सुखाची तळमळ असते. जीवन सुखी.. सुरक्षित.. आनंदी व्हावे म्हणून सतत नवनवीन शोध लागतात. पण तरीही मनुष्य जीवनातील चिंता कमीच होतच नाहीत. मनःशांती लाभतच नाही. सुरक्षितता वाटतच नाही.
मग जीवनात सदैव असलेल्या शाश्वत सुखासाठी आमचे संत वाट दाखवतात ते भक्ती मार्गाच्या पंढरीची. वारीत टाळ.. मृदुंगासह पताका घेऊन अखंड नामस्मरणात हरिभजनात दंग या भक्तांची भौतिक जगातील घटनांपासून सुटका होते. आपल्या इंद्रिय इच्छांना वेसण घालण्याची.. जीवन सत्य समजण्याची दृष्टी लाभते. वैकुंठात परमेश्वर सानिध्यात मिळणारे सुख.. समाधान.. आनंद या भक्तीपूर्ण मनाचिये वारीत लाभतो.
ही भक्तीची पंढरी वारी म्हणजे महाराष्ट्राचा आदर्श सांस्कृतिक ठेवा. कित्येक शतके लाखो कुटुंबात पिढ्यानपिढ्या ही वारी परंपरा वारसाहक्काने सुरु आहे. ही कुटुंब अत्यंत सुखात, प्रेमभावाने.. शांततेत जगतात, त्यांना कशाची हाव नसते. त्यांच्या मनात कुणाविषयी भेदभाव नसतो. निर्मळ अंतःकरण लाभलेल्या अशा सहृदयी भक्तांची समाजात किंमत होते.
संत नामदेव अशा वारी करणाऱ्या कुळांना नमन करतात. त्यांची पायधूळ लागावी अशी प्रार्थना करतात. या भक्तांना पुरुषार्थ सिद्ध करण्याची गरज नसते. त्यांना मोक्ष लाभतोच. विठ्ठल आणि या भक्तांचे जिव्हाळ्याचे नाते असते. नामदेव महाराज म्हणतात की जो माझा जीव.. सोयरा विठ्ठल आहे तो सुद्धा या वारकरी भक्तांच्या हृदयात राहतो.
तेव्हा सुखी संसारासाठी आपल्या कुळातही पंढरी वारी घडो ही प्रार्थना करु या. मानस पूजेत पांडुरंगाचे दर्शन घेत जन्म सार्थकी लावूया..
🌹⚜🌸🔆🛕🔆🌸⚜🌹
*_पंढरीची वारी जयाचिये कुळीं_*
*_त्याची पायधुळी लागो मज ॥१॥_*
*_तेणें त्रिभुवनीं होईन सरता_*
*_नलगे पुरुषार्था मुक्ति चारी ॥२॥_*
*_नामाची आवडी प्रेमाचा जिव्हाळा_*
*_क्षण जीववेगळा न करीं त्यांसी ॥३॥_*
*_नामा म्हणे माझा सोयरा-जिवलग_*
*_सदा पांडुरंग तया जवळीं ॥४॥_*
🌻🌸🛕🔆🙏🔆🛕🌸🌻
रचना : संत नामदेव ✍️
संगीत : बाळ पळसुले 🎹
स्वर : पं. भीमसेन जोशी 🎤
चित्रपट : पंढरीची वारी (१९८८)
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा