◾बोधकथा :- मासा आणि हंस
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला. त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.
तात्पर्य- मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.
_____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा