◾बोधकथा :- देव श्रेष्ठ की असुर
देव आणि राक्षस यांचे वडील प्रजापती, एक दिवस देव आणि राक्षस मिळून प्रजापतीकडे गेले आणि त्यांना विचारले, आमच्यात मोठे कोण ? प्रजापतीने सांगितले कि तुम्ही सारे आज माझ्याकडे जेवायला थांबा. जेवण झाले कि... तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो.
देव ३३ कोटी... राक्षसही कितीतरी कोटी ! त्यामुळे प्रजापतीने सुचवले कि आपण दोन पंगती करू... या राक्षसांना प्रत्येक गोष्टीची घाई... ते म्हणाले, " पहिल्या पंगतीला आम्ही येणार " प्रजापतीने सगळी तयारी केली. पाने मांडली,वाढून तयार झाली.
राक्षस घाईघाईने आले. प्रजापती दुरून पहात होते. राक्षसांनी जेवायला येण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुतले नाहीत. सगळे राक्षस पंगतीत बसेपर्यंतही आधी आले त्यांना दम नव्हता. त्यांनी लगेच जेवायला सुरवातही केली.
तेव्हा प्रजापतीने एक मंत्र म्हटला त्याबरोबर राक्षसांचे हात कोपरात ताठ होऊन गेले. पानातला घास तर उचलला... पण कोपरात हात वाकेना... त्यामुळे घास तोंडात जाईना. तासभर प्रयत्न केला तरी राक्षस उपाशीच राहिले. पंगत संपली.
प्रजापतीने लगोलग दुसऱ्या पंगतीची तयारी केली. देव स्वच्छ हातपाय धुवून आले. गोंधळ न करता शिस्तीत पानांवर बसले. त्यांनी सामूहिक भोजनमंत्र म्हटला. जेवायला सुरवात करणार तेवढ्यात प्रजापतीने पुन्हा त्याच मंत्राचा प्रयोग केला. देवांचेही हात कोपरात ताठ झाले... घास तोंडात घालताच येईना... देवांनी इकडे तिकडे पाहिले... सर्वांचीच तशी अडचण होती.
तेव्हा देवांनी एक युक्ती केली. प्रत्येकाने आपल्या शेजारच्या देवाला भरवालयास सुरवात केली. स्वतःच्या तोंडात हात पोचत नव्हता तरी तो शेजारच्याच्या तोंडापर्यंत जात होता. काहीच सांडलवंड झाली नाही.सर्वांचे जेवण अगदी व्यवस्थित झाले.
सगळे जण नंतर प्रजापतीकडे आले व म्हणाले, “आमच्यात मोठे कोण ?"
प्रजापतीने सांगितले कि, "मोठेपण हे दिसण्यावरून ठरत नाही तर कृतीरून ठरते. जेवताना जे काही घडले त्यावरून आपले आपणच सिध्द झाले आहे कि श्रेष्ठ कोण ? "
🔅तात्पर्य :~
जो फक्त स्वतःचे पोट भरण्याचा विचार करतो, तो स्वतःही उपाशीच राहतो व दुसऱ्याच्याही कामी येत नाही. हेच राक्षसांच्या बाबतीत घडले. देवांनी एकमेकांची काळजी घेतली. त्यामुळे सगळेच संतुष्ट झाले. फक्त आपल्या स्वार्थाचा विचार करणाऱ्यांपेक्षा संपूर्ण समाजाच्या हिताचा जे विचार करतात तेच श्रेष्ठ !
_______________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा