◾विशेष लेख :- इच्छा तिथं मार्ग...
मनाचा निश्चय केला की, व्यक्ती आपले ध्येय निश्चितपणे गाठू शकते. फक्त गरज असते ती प्रबळ इच्छाशक्तीची! जगात कोठेही असलात तरी एकदा तुमच्या मनाने ठरवले, तर तुम्ही तुमचा हेतू सहज साध्य करू शकता.
यश प्राप्त करण्यासाठी यशाची तीव्र ओढ असावी लागते. हृदयापासून काही करायचे ठरवले आणि ते पूर्ण करण्याची ज्वलंत इच्छा असली, तर ठरविलेले कार्य निश्चित पूर्ण होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्तीमुळे आत्मविश्वास बळावतो, निर्णयक्षमता वाढते, उत्साह निर्माण होतो; तसेच ध्येय गाठण्यासाठी गतिशीलता आणि कृतिशीलता दोन्हींमध्ये आवश्यक असणारा समन्वयही निर्माण होतो.
एकदा एका तरुणाने महान विचारवंत सॉक्रेटिस यांना विचारले,
‘‘सर, आपण आयुष्यात इतके यशस्वी झाला आहात म्हणून मी आपल्याकडे यशाचे रहस्य जाणून घेण्यासाठी आलो आहे.’’
तरुणाची जिज्ञासा पाहून त्यांनी त्याला दुसऱ्या दिवशी गावातील नदीकाठी भेटायला बोलविले. अगोदर ठरल्याप्रमाणे ते दोघे नदीच्या काठावर भेटले. सॉक्रेटिस यांनी तरुणाला आपल्याबरोबर नदीकडे चालायला सांगितले. असे करीत करीत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. खांद्यापर्यंत पाण्यात गेल्यावर सॉक्रेटिसनी अचानक त्या तरुणाचे डोके घट्ट पकडून पाण्याखाली दाबले. तरुणाने डोके वर काढण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु सॉक्रेटिसची पकड मजबूत होती. त्याच्यापुढे तरुणाचे काही चालेना. त्या तरुणाचा श्वास गुदमरून जाईपर्यंत सॉक्रेटिसनी त्याचं डोकं पाण्याखालीच दाबून धरलं. तरुणाचं डोकं जेव्हा सॉक्रेटिसनी बाहेर काढलं तेव्हा त्या तरुणाने धापा टाकीत दीर्घ श्वास घेतला. काय होत आहे हे त्याला कळतच नव्हतं. सॉक्रेटिसनी मात्र शांतपणे तरुणाला विचारलं, ‘‘तू पाण्याखाली असताना तुला सर्वांत जास्त गरज कशाची होती? तरुणाने उत्तर दिलं, ‘‘हवेची.’’ त्यावर सॉक्रेटिस म्हणाले, ‘‘हेच तर यशाचं रहस्य आहे. तुला पाण्यात असताना जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज भासत होती तेवढ्याच तीव्रतेने यशाची ओढ लागेल, तेव्हाच तुला यश मिळेल.
काहीतरी भव्यदिव्य साध्य करायचं आहे ना? मग तुझ्या मनात ज्वलंत इच्छा उत्पन्न व्हायला हवी.’’ ज्वलंत इच्छा असली म्हणजे माणूस काय करू शकतो त्याचा प्रत्यय आपल्याला पुढील गोष्टीतून येईलच.
नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावी एक वृद्ध शेतकरी राहत होता. शेतकऱ्याला आपलं शेत नांगरून भुईमुगाचं पीक घेण्याची खूप इच्छा होती; परंतु शेत नांगरून त्यात लागवड करणं हे त्याच्या वयाचा विचार करता त्याच्यासाठी खूप अवघड काम होतं. त्याच्या एकुलत्या एक मुलाने त्याला मदत केली असती; परंतु दुर्दैवानं तो तुरुंगात होता. एके दिवशी तो वृद्ध शेतकरी आपल्या मुलाला पत्र लिहून सर्व परिस्थिती कथन करतो.
‘‘मला खूप वाईट वाटत आहे की, मी या मोसमात आपल्या शेतात काहीही पिकावू शकणार नाही. यामुळे तुझ्या आईच्या आत्म्यास किती वाईट वाटेल. तिला पेरणीचा मोसम खूपच आवडत असे. ती गेल्यावर पहिल्याच मोसमात ही वेळ माझ्यावर आली यामुळे मला अधिकच वेदना होताहेत. माझ्या वयामुळे आता मला शेतीचे कष्ट सहन होणार नाहीत. तू घरी असतास तर माझा हा सर्व त्रास दूर झाला असता. तू तुरुंगात गेला नसतास तर तू ही शेती नक्कीच केली असती याची मला खात्री आहे; कारण आईवर तर तुझे खूपच प्रेम होते. तिची इच्छा तू अपुरी ठेवली नसतीस.’’
काही दिवसांतच शेतकऱ्याला पोस्टातून एक तार येते. ‘‘बाबा, देवाची शपथ आहे, आपण शेत खणण्याचे कष्ट अजिबात करू नका; कारण शेतात मी काही बंदुका पुरून ठेवल्या आहेत.’’
दुसऱ्या दिवशी पोलिसांची एक मोठी फौज त्याच्या शेतावर दाखल होते आणि ते सगळं शेत खणून काढतात; परंतु त्यांना कोठेही पुरलेल्या बंदुका मिळत नाहीत. म्हातारा शेतकरी जरा बुचकळ्यात पडतो आणि मुलाला दुसरं पत्र पाठवतो. त्यात लिहितो, ‘‘पोलिसांनी आपलं शेत खणून बंदुकींचा शोध घेतला; पण त्यांना त्यात काहीच सापडलं नाही.’’ त्या पत्राला मुलाचं उत्तर येतं, ‘‘बाबा, आता तुम्हाला शेतात भुईमूग पेरायचा होता तो लगेच पेरून टाका. माझ्या अशा परिस्थितीत यापेक्षा चांगली मदत मी तुम्हाला येथून काय करू शकणार..होतो?’’
आपण जगात कोठेही असला, तरी हृदयापासून आपण काही करायचं ठरवलं आणि ते करण्याची आपली ज्वलंत इच्छा असली, तर आपण ते शक्य करू शकता. त्यासाठी तीव्र ओढ आणि प्रबळ इच्छाशक्ती असायला हवी इतकेच.
➖➖➖➖◾➖➖➖➖◾➖➖➖➖
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा