◾विशेष लेख :- एनर्जी एक्स्चेंज ... | energy exchange
टाईम मॅनेजमेंट म्हणजे फक्त वेळेचं नियोजन नसतं तर एनर्जी मॅनेजमेंट असतं,आपण दिवसभर ऊर्जा खर्च करत असतो,वेळ भरपूर असेल पण ऊर्जाच नसेल तर उपयोग काय?याउलट ऊर्जा भरपूर असेल तर कमी वेळेतसुध्दा कामं पुर्ण करता येतात.ऊर्जेचं नियोजन हे एक कौशल्य आहे जे वेळेच्या नियोजनात आपण शिकत असतो.
ऊर्जेचा नियम आपण जाणतो ऊर्जा कधी नष्ट होत नाही ती फक्त रुपांतर पावते,ऊर्जेची देवाणघेवाण सतत होत असते,दृश्य अदृश्य स्वरुपात ऊर्जेची देवाण घेवाण होत असते.
आजपर्यंत तू माझ्यासाठी काय केलंस? हा प्रश्न नात्यांमधे विचारला गेला की साधारणपणे पैसा,संकटात मदत किंवा सपोर्ट करणं,बाजू घेणं या स्वरुपाच्या ठळक आठवणींचा हिशोब केला जातो,मला खात्री आहे की आजची पोस्ट वाचल्यावर अनेक नात्यांची एक वेगळी बाजू समोर येईल आणि मन कृतज्ञतेनं भरुन जाईल.
आपल्याकडे असणारी ऊर्जा आपण किती ठिकाणी खर्च करतो याचा कधी विचार केला आहे का ? स्वतःची ऊर्जा वाया घालवत त्याची नासधूस करत आपण आयुष्य उधळत जगत असतो आणि शेवटी पश्चातापही करतो.विचारपूर्वक आपण ऊर्जेचा विचार केला तर तिचा ईतरांसाठी सद्उपयोग होईलच पण स्वतःलाही शांती आणि समाधान मिळेल.
आपली ऊर्जा कोणत्या मार्गांनी बाहेर जाऊन वापरली जाते ते पाहू.हिशोब करुयात.
*#वेळ = वेळ देणं म्हणजे एनर्जी देणं,यापुढे कोणीही कोणत्याही कारणासाठी तुम्हाला आपला वेळ देत असेल तर कृतज्ञता बाळगा कारण कदाचित त्यालाही माहीत नाहीये की तो तुम्हाला त्याची एनर्जी देतोय.
*#पैसा= पैसा दिसतो त्यामुळे ब-यापैकी जाणिव असते,पण पैसा देणा-याने ऊर्जा दिलेली आहे याबद्दल आभार माना.
*#प्रेमआणिजिव्हाळा= आपुलकीने बोललेले शब्द,दिलेला आधार,सहानुभूती,सकारात्मक संदेश विचार ...माणुसकीने ओतप्रोत असं काहीही मिळालं तर ती ऊर्जा आहे आणि त्यासाठी प्रत्येकानं कृतज्ञ असायला हवं.
*#कौतुक= कौतुक ही माणसाची फार मोठी गरज आहे,योग्य वेळी केलेलं नेमकं कौतुक माणसाचं जग बदलून टाकतं तर कौतुकाच्या वेळी वाट्याला आलेलं मौन नैराश्याच्या खाईत लोटतं.भरभरुन कोणी कौतुक केलं तर अक्षरशः मनापासून आभार माना कारण कौतुक करणारा ऊर्जा देतोय,दिसत नसलं तरी देतोय आणि आपल्यामधे ते जमा होतंय.
*#कष्ट बळ= कोणी आपल्यासाठी शारीरिक कष्ट करत असेल तरी ते एनर्जी देणंच आहे.पैश्यात मोजता येणार नाही किंवा त्या हिशोबात बसणार नाही असं काही आपल्याला सतत मिळत असतं त्याबद्दल प्रत्यक्ष व्यक्ती समोर नसली तरी निसर्गाचे किंवा देवाचे आभार माना.अनेक कष्ट असे असतात ज्याचा कितीही मोबदला आपल्याला कुणी दिला तरी आपण ते करु शकणार नाही त्यामुळे तिथे कृतज्ञतेशिवाय दुसरा मार्ग नाही.उदा.कचरा वेचणारे मदतनीस!
*#मैत्री= मित्र आणि मैत्री सोबत असताना आणि नसताना काय वाटतं याचा फक्त अनुभव घ्यावा वेगळं काय लिहायचं? मैत्री हे एक बळ आहे,मैत्री ऊर्जा आहे.
*#स्पर्श= रेकी सारख्या विद्या या ऊर्जेविषयी अधिक माहिती देतील पण सकारात्मक स्पर्श ऊर्जा देतो,मायेचा आधार,हातावर दिलेली टाळी,पाठीवर लढ म्हणत दिलेली थाप किंवा पाठीवर दिलेली शाबासकी ...स्पर्श देणारा ऊर्जा देत असतो त्यामुळे कृतज्ञता हवी.
*#प्रतिभा कौशल्य = समाजात आपल्या प्रतिभा आणि कौशल्याने अनेक माणसं मदत करत असतात ही त्यांनी दिलेली ऊर्जा असते,म्हणून त्याची फी घेताना अनेक ठिकाणी आता प्रवेशमुल्य किंवा फी असा शब्दप्रयोग न करता एनर्जी एक्सचेंज असा शब्दप्रयोग केला जातो.अनेकदा फी न घेता अनेक माणसं आपल्याला चालता चालता मदत करत असतात त्यांनी ऊर्जा दिली आहे याची जाणिव आपण ठेवायला हवी.
थोडक्यात यापुढे तू माझ्यासाठी काय केलंस? हे कोणालाही म्हणताना एकदा पुनर्विचार व्हावा आणि आपणही जगताना आपण आपली ऊर्जा चुकीच्या दिशेला नको तिथे वाया घालवत नाही ना याचाही विचार व्हावा.आपली असो वा दुस-याची ऊर्जा मौल्यवान आहे,ती जपली तर आयुष्याची फुलबाग बहरुन जाईल.
टिप :- वरिल लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा
आवडला असेल तर गरजवंताला नक्की शेअर करा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा