◾ललित लेख :- शहाण्या माणसांचा क्लास...

शहाण्या माणसांचा क्लास’

“अरे, पण गरज काय आहे याची?” 
हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात.

ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं असतात. त्यांना *‘मजेत जगावं कसं?’* हे समजायला पुस्तक वाचावं लागत नाही, ते मजेतच जगत असतात. किंबहुना, जगण्याचा आस्वाद घेण्याची कला त्यांना जन्मजात अवगत झालेली असते. 

आपलं मूल अनवाणी शाळेत जाणार नाही याची काळजी त्यांना असते. ती काळजी वूडलँड, क्राॅक्स, ली कूपर, बाटा यांनी शांत करण्याचा उद्योग ते करत बसत नाहीत. लखानी किंवा पॅरागाॅन ते आनंदानं निवडतात, आनंदानं वापरतात, गरजा पूर्ण करतात आणि मस्त राहतात. 

स्वत:ची वाहनं ते स्वत: धुतात, पुसतात. सायकलला स्वत:च आॅईलिंग करतात. घरातल्या पंपानं सायकलच्या टायरमध्ये हवा भरतात. सुटी फुलं आणतील, देवाच्या पूजेचे हार स्वत: तयार करतील. बुटांना पाॅलिश स्वत:च करतील. ते रोज जमणार नसेल तर बाहेरून आल्यावर बूट काढले की, मोज्यानंच ते बूट स्वच्छ पुसतील, आत ठेवतील आणि मग मोज्यांचा जोड धुवायला टाकतील. हे काटकसरीचं जगणं नसतं, हे योग्य जगणं असतं. 

ज्या खोलीत कुणी नसेल तिथले लाईट्स आणि पंखे बंद ठेवतात. गरज नसताना घरभर दिवे आणि पंखे विनाकारण चालू ठेवण्याचा शौक त्यांना नसतो. रात्री खिडक्या उघड्या ठेवून झोपतात, एसीची गरज पडत नाही. गरज नसताना बाय वन गेट वन फ्री’ च्या शंभर जाहिराती पाहिल्या तरीही त्यांना काहीही फरक पडत नाही. पण गरज असेल तेव्हा रेमण्ड, सियाराम, अरविंद मिल्स, विमल असंच कापड घेतील. रेडिमेड घेण्यापेक्षा शिवून घेतील. मस्तपैकी चार-पाच वर्षं तरी सहज वापरतील. 

घरी कुणी आलं की, पोह्याचा चिवडा, भडंग, खोबऱ्याची वडी किंवा शेंगादाण्याचा-रव्याचा-बेसनाचा लाडू मनापासून देतील आणि नंतर आलं घातलेला कपभर चहा.. (हे सगळे पदार्थ घरीच स्वहस्ते केलेले असतात आणि चहापत्ती घाऊक मार्केटमधून आणलेली असली तर आलं, गवतीचहा, चिमूटभर सुंठ घालून तिला फक्कड रंगत कशी आणायची, हे तंत्र बरोब्बर समजलेलं असतं.) आल्यागेल्याचा, पै-पाहुण्यांचा पाहुणचार मस्त करतात, रिटर्न गिफ्ट म्हणून उगाचच महागड्या गोष्टी देऊन इंप्रेशन मारायला जात नाहीत. 

सणावाराला घरी गोड पदार्थ तर होणारच. घरच्या तुपातला शिरा, खीर, चक्का आणून घरी केलेलं श्रीखंड (अनेकदा चक्कासुद्धा घरीच करतात) हे पदार्थ पेटंट असतात. अचानकच गोड खाण्याची हुक्की आलीच तर केळ्याचं शिकरण दोन मिनिटांत तयार..! 
घरात कुणी नसेल आणि एकटाच मुलगा किंवा पुरूष जरी असेल तरी स्वत:च्या वेळेपुरती मुगाची खिचडी त्याला करून खाता येते. दुपारच्या उरलेल्या पोळ्यांची वरणफळं त्याला बरोबर जमतात. कालचा उरलेला भात फोडणी देऊन सकाळी खाता येतो. किंवा वेळप्रसंगी दहीपोहे करूनही उदरभरणाची सोय करता येते. त्यासाठी हाॅटेलची पायरी चढण्याची गरजच पडत नाही. ह्या जगण्याला लो प्रोफाईल, मिडलक्लास किंवा चिक्कूपणा म्हणणारी माणसं बिनडोक असतात. कारण, 
हे परफेक्ट आत्मनिर्भर जगणं आहे.

यांच्या घरातले पुरूष दळणं आणतात, वाणसामान आणतात, भाजी आणतात, इस्त्रीचे कपडे लाॅन्ड्रीत नेऊन देतात आणि घेऊनही येतात. रद्दीवाल्याकडे स्वत:च रद्दी घेऊन जातात. स्वत: पानं घेणं आणि जेवण झाल्यानंतर स्वत:चं ताट स्वत: घासणं, फरशी पुसणं यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ ते रिटायर होईपर्यंत छान वापरतात. पाच-सात वर्षं चष्म्याची फ्रेम बदलत्या नंबरनुसार काचा बदलून वापरतात. याच्यात त्यांना कसलाही कमीपणा वाटत नाही. 

मुलाचा पहिला वाढदिवस, पाचवा वाढदिवस खाजगी हाॅल किंवा पार्टी हाॅल घेऊन साजरा-बिजरा करत नाहीत. असल्या कृत्रिम आनंदाची त्यांना गरज नसते. पण मुलांच्या शिक्षणाविषयी मात्र अजिबात तडजोड नसते. अगदी निगुतीनं मुलांना शिकवतात. महागड्या ब्रॅन्डेड गोष्टी चांगल्या असतातच असं नाही, यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्यामुळं, चांगली शाळा ते बरोबर निवडतात आणि मुलांना शिक्षण देतात. मुलांना खाऊनही माजू देत नाहीत आणि टाकूनही माजू देत नाहीत. सापशिडीतल्या ९८ आकड्यावरच्या सापाला घाबरायचं नाही, हे आपल्या मुलांना शिकवायला त्यांना कुठल्याही मोटिव्हेशनल ट्रेनरची गरज भासत नाही, ते स्वत:च खंबीर असतात. आवश्यक तेवढी यथाशक्ती बचत करून, साधी सरळ भरवशाची गुंतवणूक आणि साधा जीवनविमा एवढ्यावर त्यांना सुरक्षित वाटतं. गडगंज श्रीमंत होण्याचा हव्यास ते धरत नाहीत. अनैतिक मार्गानं काहीही कमावण्याचा विचारही करत नाहीत. “जोडोनियां धन उत्तम व्यवहारें, उदास विचारें वेच करीं”
या तुकोबारायांनी सांगितलेल्या पक्क्या धारणेनं जगतात. म्हणून त्यांची वखवख होत नाही, त्यांना भस्म्या होत नाही. षड्रिपूंचा त्रास तर अजिबात नाही.. 
हेच तर खऱ्या अर्थानं निरामय आयुष्य आहे ना..!

घरात महागडं इंटिरिअर नसलं तरी, घरी कामाला येणाऱ्या बाईंच्या मुलांच्या वह्यापुस्तकांसाठी मात्र बरोबर पैसे दिले जातात, अगदी न चुकता. सकाळी दारी आलेल्या वासुदेवाला किंवा समर्थ संप्रदायातल्या माधुकरी मागणाऱ्यांना तांदळाचं माप मिळतंच. दरवर्षी दिवाळीला पोस्टमनला शंभराची नोट मिळते. सगळ्या रेषा कशा अगदी समांतर.. 
कशाचंही तंगडं कशातही अडकत नाही, कसला गुंता नाही, वैचारिक गोंधळ नाही. बेष्ट आयुष्य..! 
समंजस आयुष्य..! 
विनाशर्त विनातक्रार संपूर्ण स्वीकारलेलं आयुष्य..! 

‘क्रेझ’ या गोष्टीशी यांचा लांबून-लांबून संबंध नसतो. म्हणून यांचे व्याप मर्यादित असतात. आयुष्याकडून फार अपेक्षा नसतात, हट्ट-दुराग्रह तर अजिबातच नाहीत. वर्षाकाठी दिवाळीसारख्या एखाद्-दुसऱ्या प्रसंगी कापड खरेदी वगैरे होते, जमल्यास गुरूपुष्यामृताच्या दिवशी एक ग्रॅम सोनं घरी येतं आणि देवघरात देवासमोर ठेवलं जातं. अट्टाहास कुठलाच नाही. ह्या जगण्याला ते 
‘हा माझा मार्ग एकला’
असं म्हणू शकतात, पण 
मैं जिंदगी का साथ निभाता चला गया’
हे म्हणणं त्यांना साधलेलं असतं. ह्या जगण्याला काय म्हणाल? मिडलक्लास? नाही. 
हा तर खरा वरचा क्लास.. विषमभुज त्रिकोणाला सुद्धा समभुज करण्याची अफाट विलक्षण शक्ती ज्यांच्या दृष्टीकोनात ठासून भरली आहे असा क्लास...! 

 कुणी त्याला मिडलक्लास म्हणो किंवा मध्यमवर्गीय.. 
पण हा आहे खऱ्या शहाण्या माणसांचा क्लास...!

टिप्पण्या

या आठवड्यात सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

कविता : महात्मा गांधी

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾यशाचा मंञ :- स्वत:ची क्षमता ओळखून तर बघा, आयुष्यात जे जे हवंय ते ते मिळेलच..

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

◾सुविचार :- १२5 अतिशय सुंदर विचार आणि सुविचार

◾कविता :- तुझं अस्तित्व ... | मराठीचे शिलेदार समूह ©

◾ललित लेख :- कोरोनाने आम्हाला काय शिकवले...

◾विशेष लेख :- बिल गेटचे भारतीय लोकांविषयी मत जरूर वाचा

अब्दुल कलाम यांची जीवन कहाणी ऑडिओ ब्लॉग मध्ये | hindi audio book biography in audio dr. A. P. J. Abdul Kalam sir

महाभारत :- महाभारतातील सर्वात दुखी पात्र कर्ण

◾विशेष लेख :- वपुंची २१ विचारपुष्पे

◾व्यवसाय :- एक सर्वोत्कृष्ट लीडर होण्यासाठी हे गुण तुमच्यात असणे गरजेचे...

◾कविता :- घेतला जन्म तुझ्या उदरी

◾बोधकथा :- उपकार कुणावर करावे...