◾थोडं मनातलं :- सल आणि लस ...
सल..... आणि.....लस
दोन अक्षरे, पण शब्द वेगळे. फक्त अक्षरांची जागा बदलली की हे दोन्ही शब्द तयार होतात. अक्षरे तीच पण मागेपुढे लिहिण्याने अर्थ बदलतो.
सल म्हणजे एखादी गोष्ट मनात साठून तीची नकोशी असणारी जाणिव मनास सतत टोचत असते. ती काढून टाकायचा प्रयत्न असतो.
आणि या उलट लस म्हणजे एखादी गोष्ट होऊनये म्हणून जाणीवपूर्वक शरीराला टोचून घेणे.
टोचणे दोघातही असते. पण एक नकोसे असते. आणि दुसरी मात्र घेतली का? घेणार का? याची चौकशी होते.
पहिल्याचे टोचणे मनाशी असते, तर दुसऱ्याचे शरीराशी. पहिल्याच्या आठवणीसाठी मन तयार नसते. किंवा आठवल्यावर दु:ख होते. तर दुसऱ्या टोचणीसाठी मन खंबीर झालेले असते. थोडक्यात पहिल्या टोचणीचे परिणाम मानसिकतेवर जास्त अवलंबून असतात. तर दुसऱ्या टोचणीचे परिणाम शरीरावर दिसतात.
पहिले कोणत्याही परिस्थितीत लपवण्याचा प्रयत्न असतो. तर दुसऱ्याचे कौतुक करतो. (आजकाल तर काही वेळा त्यांचे फोटो देखील काढले जातात.)
पहिल्याचा परिणाम मनावर आणि नंतर शरीरावर किती कालावधी पर्यंत राहिल हे सांगता येत नाही. पण तो लवकर संपावा याचा प्रयत्न असतो. बऱ्याचदा काळ हाच त्यावर उपाय असतो.
दर दुसऱ्याचा परिणाम जास्तीत जास्त काळ टिकावा हि इच्छा असते. त्याला काळाचे बंधन नसावे असे वाटते.
पहिल्या टोचणीचे कोणतेही निशाण दिसत नाही. पण बऱ्याचदा ते वागण्यावरून, किंवा चेहऱ्यावर जाणवते. या उलट दुसऱ्या टोचणीचे टोचून घेतल्याच्या काही खुणा जरी शरिरावर राहिल्या तरी त्यात काहीही गैर वाटत नाही.
पहिल्या टोचणीने मनावर, शरीरावर काय? केव्हा? कसे? कुठे? परिणाम होतील यांचे भाकीत करता येत नाही. काही प्रमाणात त्या व्यक्तीला ते परिणाम अगोदर किंवा नंतर जाणवत असावेत.
पण दुसऱ्या टोचणीचे परिणाम काय होऊ शकतात. आणि तसे झाल्यास काय करावे हे बऱ्याच प्रमाणात सांगता येऊ शकते.
सल सगळ्यांच्या मनात असेलच असे नाही. तसेच लहान वयात ती असणे कठीणच (नसतेच, किंवा नकोच). आणि असली तरी तीची वेगवेगळी कारणे असू शकतात.
लसीचे मात्र तसे नसते. ती एकाच हेतूने सगळ्यांना तेवढ्याच निर्वीकारपणे टोचली जाते. यावेळी वयाचे बंधन असू शकते. किंवा सगळ्यांसाठी गरजेची असते.
पहिल्या बाबतीत हि टोचणी काही घटना घडल्यानंतर सुरू होते. दुसऱ्या बाबतीत मात्र घटना घडू नये म्हणून सावधानता बाळगण्यासाठी मिळेल त्या ठिकाणी जाऊन, प्रसंगी वाट पाहून, पैसे देऊन टोचून घेतली जाते.
सल जी आपल्या मनात आपल्यासाठी असते. तर लस घ्यायला मात्र बऱ्याचदा जनजागृती, जाहिरात करावी लागते. सल आत्मकेंद्रित असते. तर लस देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी केंद्रे उघडली जातात.
अक्षरे दोनच. पण त्यांची जागा बदलली की शब्दाचा अर्थ बदलतो............
स्वास्थ्यासाठी पहिल्या टोचणीचे जाणे, तर दुसरीचे टोचून घेणे गरजेचे असते.......!!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा