◾विशेष लेख :- अनुभूती !
नेहमीप्रमाणे परातीत पोळ्यांची कणिक घेऊन भिजवत होते. पाणी ओतत असताना नेमका हात हलला आणि थोडस पाणी जास्तच पडलं. थोडं थोडं करता करता चांगली 3 पोळ्यांची कणिक जास्त भिजवली गेली. खरंतर असं कधी होत नाही पण आज झालं ! म्हटलं असू दे, पोळी न करता कणिक तशीच ठेवेन आणि उद्या वापरेन.
स्वामींचा तारक मंत्र एकीकडे ऐकत पोळ्या करताना लक्षातच राहिलं नाही. आणि नेहमीप्रमाणे सगळ्या कणकेच्या पोळ्या करून झाल्या. मग म्हटलं असू दे जास्तीच्या पोळीची सकाळी फोडणीची पोळी करता येईल. खरं तर शीळं खायला लागू नये असेच मोजून मापून करायचा प्रयत्न असतो. पण होतं असं कधीतरी, मग फोडणीचे पोळी ठरलेली.
शेवटची पोळी झाल्यावर हात धुतच होते तेवढ्यात दारावरची बेल वाजली. नंदीबैल घेऊन रस्त्यावर एक नवरा बायको आणि छोटी मुलगी आली होती. खरंतर वरच्या मजल्यावर कोणी येत नाही, पण त्यांची ती छोटी मुलगी आज घरापर्यंत आली आणि दार वाजवून दारात उभी. काहीतरी खायला द्या किंवा पैसे द्या असे मागू लागली. नेहमीप्रमाणे शाळेत जातेस का, कुठल्या शाळेत आहेस, कुठे राहतेस, काय आवडतं अशा गप्पा मी तिच्याशी मारल्याच. सकाळपासून काय खाल्लस ही चौकशी केली. छान तिसरीत जाणारी चुणचुणीत मुलगी होती. लॉकडाऊन पासून शाळा बंद होती आणि घरी खायचे वांदे होते. सकाळपासून काही न खाता-पिता सगळीकडे हिंडत होती. लोक धान्य पैसे देत होते खरे. पण ते सर्व तिला घरी गेल्यावर स्वयंपाक झाल्यावर खायला मिळणार होते ! तिची नजर दारातूनच घरभर हिंडत होती, नाकाने वास घेणे चालू होते आणि डोळ्यात आतुरता होती. काय बरं द्यावे तिला विचार करतच होते तर तिनेच विचारले गरम पोळी करत होतीस का ग मावशी. छान वास येतोय घरातून !
पटकन तीन पोळ्या, थोडी भाजी आणि चटणी पोळीच्या आत मध्ये घालून तिला दिल्या. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून गेला. छान उड्या मारत पोरगी खाली गेली. टेरेस मधून खाली बघितले तर पोरगी, आई बाप खूपच खुश झालेले दिसले.
देवघरापुढे जाऊन उभी राहिले. स्वामींना म्हटलं "तूच कर्ता आणि तूच करविता" याचा छान प्रत्यय मिळाला. आज कणिक जास्त भीजवली जाणे, पोळी लाटली जाणे आणि ती देण्याची सुबुद्धी होणे हे सर्व काही तुम्ही योजिले होते. तुमच्या त्या भक्तासाठी आज माझी निवड केलीत याचा खूप आनंद झाला. अशीच सेवा वेळोवेळी या हातून होत रहावी ! या सारखे दुसरे समाधान नाही हेच खरे !
धन्यवाद
©️सौ रश्मी साठे उन्हाळे
ही पोस्ट आवडल्यास नक्की लाईक आणि शेयर करा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा