◾बोधकथा :- गोरा ढग आणि काळा ढग
जो इतरांसाठी जगतो त्यालाच जीवनाचा अर्थ समजतो- वाचा ही सुंदर मराठी बोधकथा
एकदा आभाळात दोन ढगांची भेट झाली . काळा ढग पाण्याने जड झाला होता . तो हळूहळू जमिनीकडे उतरत येत होता . गोरा ढग अगदी हलका होता . तो उंच आभाळात चढत होता . भेट झाल्यावर गोऱ्या ढगाने काळ्याला विचारले , “ कुठे चाललास ? " काळा ढग म्हणाला , " जमिनीकडे . मी तिथे जाऊन पाऊस पाडणार आहे . माझ्याजवळ जेवढे पाणी आहे ते सगळे धरणी मातेला देऊन टाकणार आहे .
जमीन उन्हाने तापली आहे . नद्या , तलाव , विहिरी कोरड्या पडल्या आहेत . झाडेपण सुकून गेली आहेत . शेतकरी आतुरतेने माझी वाट पहात आहेत . मला जरा घाईने गेले पाहिजे . " गोरा ढग त्याला हसला . त्याला म्हणाला , " वेडाच आहेस . आपली संपत्ती कधी अशी कोणी जगावर उधळून देतो का ? तुझ्यातले पाणी संपले कि तुझे आयुष्यच संपले की ! मी चाललोय स्वर्गात . देव बाप्पाच्या घरी एक जागा रिकामी झालीय . ती मला मिळेल . "
गोऱ्या ढगाला खूप घाई होती . तो धावतच पुढे निघाला , काळा ढग हळूहळू जमिनीपर्यंत आला . मुसळधार पाऊस झाला . काळा ढग अदृष्यच झाला . नद्या , नाले दुथडी भरून वाहू लागले तलाव विहिरी काठोकाठ भरले . सारे रान हिरवेगार झाले . शेतकरी सुखावले .
गोरा ढग वर जाताना ते पहात होता . काळ्या ढगाच्या वेडेपणाला तो हसला . पाहता पाहता स्वर्गाचा दरवाजा आला . गोऱ्या ढगाने दार ठोठावले . एका देवदूताने ते उघडले . त्याने गोऱ्या ढगाला विचारले , " तुझे देवबाप्पाकडे काय काम आहे ? " गोरा ढग आपल्याच तोन्यात होता . तो म्हणाला , " मी इथे रहायलाच आलोय , स्वर्गात १ जागा रिकामी झालीय . ती मलाच मिळणार ! उघड दरवाजा . " दार उघडायच्या ऐवजी देवदूताने ते लावूनच घेतले . लावता लावता तो म्हणाला , " ती रिकामी जागा आता भरलीय . देवबाप्पा स्वतः विमान घेऊन गेले होते व त्या काळ्या ढगाला स्वर्गात घेऊन आले . ज्याने आपले सर्वस्व देऊन पृथ्वीवर आनंदी आनंद निर्माण केला , त्याच्यापेक्षा आणखी चांगली व्यक्ती कोण असणार ? "
तात्पर्य : समाजासाठी सर्वस्व समर्पण करणे हाच मोक्ष आहे . आपल्या आजूबाजूच्या सर्वांना सुखी करणे , त्यांना काही न काही मदत करणे यातूनच माणूस सुखी समाधानी होऊ शकतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा