◾ललित लेख :- आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हे जरूरी नाही

आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत हे जरूरी नाही ......
ज्याचा त्याचा झोका......

लहानपणी आमच्या वाडीत एका घरात मोठ्ठा लाकडी झोपाळा होता. अगदी तसाच एक झोपाळा बाजूच्याच गावात राहणाऱ्या मामाच्या घरात पण होता. चांगले दणकट शिसवी लाकडाचे , छपराच्या नाहीतर माडीच्या तुळयांना पितळी कड्यांनी अडकवलेले ते झोपाळे .... 

त्याच्यावर ऐसपैस उशी टाकून झोपता पण यायचं. घराच्याबाहेर हिरवीकच्चं आमराई , बाहेर सुरू असलेल्या पाटाच्या पाण्याचा झुळझुळ आवाज , हातात चांदोबा नाहीतर किशोर घेऊन त्या झोपाळ्यावर बसलं की तंद्री लागायची . गंमत म्हणजे त्या झोपाळ्याला  झोका द्यायला लागायचा नाही , कसा काय माहीत नाही पण तो आपला संथ हलत राहायचा .. 

आमच्या वाडीतल्या मुलांना काही त्या झोपाळ्यावर यायला  आवडायचं नाही " मुलींचा झोका आहे तो , जरा जोराने रट्टा दिला तर कड्या निघून येतात , तुम्हीच खेळा  त्याच्यावर" म्हणत ती निघून जायची . 

आमच्यात एक टाॅम्बॉयीश मुलगी होती , तिला फार आवडायचं उंच उंच झोके घ्यायला . मग ती मुलांबरोबर बागेतल्या झोपाळ्यावर खेळायला जायची. खोखो आणि कबड्डी ए-वन खेळायची,जेव्हा बघावं तेव्हा तिचे गुढगे नाहीतर ढोपरं फुटलेली.तिची आई नेहेमी ओरडायची .."वाडीतल्या झोपळ्यावर खेळायला काय होतं ग तुला ! नुसती हौस मोठे झोके घ्यायची !" 

त्या मुलीचं जरा लवकरच लग्न झालं .खूप वर्षांनी कुठून तरी कानावर आलं..लग्नाच्या दुसऱ्याच वर्षी स्टोव्हच्या भडक्याने भाजून ती गेली..जाताना पदरात एक तान्ही लेक होती.

त्या झोपाळ्यावर बाहुला बाहुलीची लग्न वगरै लावणाऱ्या आमच्या घोळक्यात एक मुलगी होती . गोरीपान सुंदर , घाऱ्या डोळ्यांची . लांब केसांची तीपेडी वेणी घालून ती दोनदा वळवून लाल रिबिनीने तो शेपटा बांधायची . "तुला मोठं होऊन काय बनायचं गं ?" असं कोणी विचारलं तर स्वप्नाळू डोळ्यांनी म्हणायची...
"मला नं , लग्न करायचंय ,मला गोरी गोरी मुलं होणार ,मग मी सगळ्यांसाठी जेवण बनवेन ". 

ऐकणारे जोरात हसायचे . तिचे वडील डॉक्टर होते . पुढे त्यांनी तिला डॉक्टरच बनवलं . मेरिटवर अॅडमिशन मिळेना म्हणून बाहेरगावच्या खाजगी कॉलेजात टाकलं . नंतर परदेशीही पाठवलं . बरेच वर्षानंतर एकदा आमची गाठ पडली . वडिलांचाच दवाखाना ती सध्या चालवतेय. 

स्वप्नाळू नजर कधीच हरवलीय .कोणीतरी तिच्या झुल्याला उंच झोका दिला आणि तिच्या झोपाळ्याची लयच बिघडली . लग्नाचा काही योगच आला नाही . आता वय ही वाढलंय . स्थळ सांगून येणही हळूहळू बंद झालं. निघताना न राहवून तिने मला विचारलं, "तुला वाडीतली झोपळ्यावरची आपली भातुकली आठवते का गं ?" 

माझ्या घश्यात आवंढा दाटून आला .

प्रत्येकाचा झोका वेगळा ... त्याची उंची किती हवी हा ज्याचा त्याचा प्रश्न , तो दुसऱ्यांनी का ठरवावा आणि आपणही तो दुसऱ्यांना का ठरवू द्यावा !

व्यवसायाच्या निमित्ताने माझा अनेक कलाकारांशी परिचय होत असतो.असच मधे एकदा अत्यंत सुरेल आणि गोड गळा असणाऱ्या एका गायकाला भेटण्याचा योग आला . भल्या भल्या प्रस्थापितांच्या तोंडात मारेल अशी अप्रतिम गायकी पण तरीही कुठल्याही झगमगाटी दुनियेत हे नावं मी फारसं कधी
ऐकलं नव्हतं . एकदा सविस्तर बोलणं झालं , "असं का ? तुम्ही थोडा प्रयत्न केला असता तर आज कुठल्या कुठे असता , कोणी अडवलं होतं तुम्हाला ?"
 
"मला कोणासारखं तरी बनायचं आणि गायचंही नाही आहे, मला मानसन्मान नकोत. मी फक्त स्वान्तसुखाय गातो . माझ्यासाठी गाणं ही देवाची पूजा आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल पण माझ्या इतका आनंदी माणूस तुम्हाला खरचं सापडणार नाही." ते शांत हसत म्हणाले. 

त्यावेळी लक्ष गेलं ,योगायोगाने त्यांच्या घरात तोच लाकडी झोपाळा  होता. देवासमोर निरांजन तेवत होतं, कुठुन तरी मोगर्याचा हलका सुवास पसरला होता .. शांत , पवित्र वातावरण ... कसलीही, कुठे पोहोचायची घाई नाही, चढाओढ नाही , तिथे फक्त आणि फक्त संथ चाललेली संगीतसाधना होती.

आमच्या ओळखीच्या एक काकू आहेत .सदैव आनंदी प्रसन्न चेहरा. त्यांचं घर अगदीच छोटं आहे.आणि  त्या छोट्याश्या खोलीतही अगदी खिडकीला लागून असा वेताचा एक छोटा झोपाळा लावला आहे.  "खूप गर्दी झाल्यासारखी नाही वाटत का त्या झोपाळ्यामुळे ?" एकदा मी काकांना विचारलं . 

तर ते म्हणाले.. "अगं , तुझ्या काकूच माहेर खूप तालेवार आणि गडगंज . तिला आवडायचं म्हणून तिच्या वडिलांनी अंगणातच मोठ्ठा झोपाळा बांधला होता . ती रोज रात्री त्याच्यावर बसून आकाशातल्या चांदण्या मोजायची. आमचा प्रेमविवाह झाला आणि तिचं माहेर संपलं .ती खूप बुद्धीमान आहे, तिच्या आयुष्याकडून नक्कीच खूप अपेक्षा असणार .त्या सगळ्या काही मी पुऱ्या करू शकलो नाही. आमच्या ओढग्रस्तीच्या संसारात तिच्या डोक्यावरच विस्तीर्ण आकाश माझ्या घराच्या छोटयाशा खिडकीत एकटवलं .. माझ्या प्रेमाखातर तिने तिचा झुला माझ्या छताखाली आणलाय.आता कमीतकमी मी तिच्या चांदण्यातरी हिरावणार नाही गं.." 

मला माझी आई आठवली  . आयुष्यभर निगुतीने , अपार मायेने , अत्यंत कठीण  आर्थिक परिस्थितीतही हसतमुखाने जिने संसार केला अशी माझी आई. ती अत्यंत सुंदर पेंटींग  करायची . पांढऱ्या स्वच्छ नाजूक रुमालावर एका कोपऱ्यात तिने रंगवलेली ती इतकी सुंदर फुलं . ओळखीची मंडळी ते रुमाल मागून मागून घेऊन जायची. सगळ्या कामाच्या धबडग्यात कसाबसा वेळ काढून ती ते रंग भरायची .. तो तिचा झुला होता. तो कुठेही उंच उडाला नाही . तो उंच उडववावा असं तिला कधी वाटलंच नसणार का ?.. 

मला माहित नाही. पण ती नेहमीच समई सारखी शांत आणि तृप्त वाटत आली . 

आयुष्यातले सगळेच झोके उंचच जायला हवेत असा अट्टाहास कशाला ! म्हणजे उंच झोके घेऊ नयेत असं काही नाही हं..घ्यावेत की, त्याचीही एक आपली गंमत असतेच . पण तेव्हा हे सुद्धा लक्षात ठेवावं की उंच गेलेला झोका हा कधीतरी खालीही येतोच..तो निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे त्या उतरण्याचंही तितक्याच प्रेमाने स्वागत करण्याची मनाची तयारी असायला हवी आणि मगच घ्यावे उंच झोके.

बऱ्याचदा, उंचावरच  राहण्याचा अट्टाहास आयुष्यात खूप काहीतरी गमवायलाही कारणीभूत ठरू शकतो. 

आणि खर सांगू का... 

संथ हलणाऱ्या झुल्यांनाही त्यांची स्वतःची एक उंची असतेच की.. ती आपण ओळखली पाहिजे, त्याचंही कौतुक असलं पाहिजे..मन आपसूकच  शांत आणि तृप्त होतं. ती शांतता आणि तृप्तता अनुभवली की आपोआपच आपण प्रेमाने म्हणतो....

" संथ माझा झुला गं!"

लेखक अज्ञात
फॉरवर्डेड आहे.

टिप्पण्या

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट