विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले
_"विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले-"_
_लेखक- अनामिक._
अमृता, एक कॉलेज कन्यका, शिकायला गाव सोडून शहरात आलेली ! घरून आलेले महिन्याच्या खर्चाचे पैसे काढण्यासाठी ती एकदा भरदुपारी एटीएम मशीन बॉक्स जवळ गेलेली !
आत जाऊन कार्ड काढून मशीनमध्ये सरकवणार, इतक्यात तिथे नोटा बाहेर येण्याच्या ड्रॉवरकडे तिचे लक्ष गेले. दोन दोन हजाराच्या पाच नोटा तिला दिसल्या. तीने पटकन आजूबाजूला, इकडे तिकडे पाहिले. जवळपास तर कोणीच दिसत नव्हते.
'आता काय करावे ? हे पैसे कुणाचे असतील ? कोण विसरून गेले असेल ?' या विचारात ती पडली !
अमृता ने त्या नोटा मशीनमधून काढून शांतपणे हातात घेतल्या आणि नंतर स्वतःला हवे असलेले महिन्याचे पैसे आपले कार्ड टाकून काढून घेतले.
सहज नजर फिरवताना तिला समोर तिथे त्या एटीएम मशीन ज्या बँकेचे असते त्या बँकेचा फोन नंबर दिसला. स्वतःच्या मोबाईलवरून तीने नंबर फिरवून बँक मॅनेजरशी संपर्क साधून म्हणाली कि, "इथे आता कुणीतरी माझ्या आधी १० हजार रुपये काढले होते, मात्र ती व्यक्ती पैसे विसरून गेलीय !"
त्या बँकेची शाखा जवळच होती म्हणून मॅनेजरने तिला बँकेत येण्यास सांगितले. अमृता तिथे गेली आणि ते १० हजार त्यांना देऊन म्हणाली कि, "माझ्या आधी ज्या कुणा व्यक्तीने पैसे काढले असतील त्या कार्ड नंबरवरून शोध घेऊन तुम्ही त्यांना हे पैसे परत द्यावेत, अशी माझी इच्छा आहे !"
मॅनेजर तिच्या प्रामाणिकपणा बद्दल चकित झाले, त्याचवेळी तिला धन्यवाद देत तिचे नाव, पत्ता व फोन नंबर घेऊन म्हणाले कि, "मॅडम, त्या व्यक्तीचा शोध लागला कि आम्ही तुम्हाला नक्की कळवू."
अमृता एक चांगले काम केल्याच्या आनंदात घरी आली. थोड्या वेळाने त्या बँक मॅनेजरचा फोन आला. त्यांनी सांगितले कि, "ते दहा हजार रुपये श्रीमती राधाबाई यांच्या अकाउंट मधील आहेत. त्या ८० वर्षाच्या वृद्ध आहेत. एकट्याच असतात. महिन्याचे घरभाडे (आठ हजार) व इतर खर्चासाठी (दोन हजार) असे त्यांनी दहा हजार काढले होते. आम्ही ते त्यांना परत देत आहोत. थँक्स !" असे म्हणून फोन बंद झाला.
इकडे अमृता नकळत विचार करू लागली कि, 'एकटीच वृद्ध बाई राहतेय, आणि आता फक्त २ हजारात महिन्यात भागवते, हेही किती अवघड आहे. मी स्टुडंट असून मला एकटीला दहा - पंधरा हजार लागतात आणि हि आज्जी २ हजारात कसे जगत असेल ?'
शेवटी न राहवून अमृता ने त्या बँक मॅनेजरला पुन्हा फोन करून विचारले कि, "माझेही खाते तुमच्याच बँकेत आहे. मोबाईल परमिटेड खाते आहे. तर मी विनंती करते कि माझ्या त्या अकाउंट मधून कृपया त्या आज्जीच्या अकाऊंटला एक हजार ट्रान्सफर कराल का ?"
मॅनेजर पुन्हा चकित झाले आणि आनंदाने त्यांनी तसे केले ! मात्र एक तासाने पुन्हा बँकेतून फोन आला.
मॅनेजर म्हणाले कि, "मॅडम, तुम्ही विना ओळखीच्या असून सहजपणे १ हजार रुपये त्या आज्जीला देऊ केलेत. आणि आम्ही तर गेली अनेक वर्षे त्या आज्जीला ओळखतो. आमची पण काहीतरी जबाबदारी ची जाणीव तुम्ही जागी केलीत ! त्यामुळे आमच्या सर्व स्टाफने प्रत्येकी ५०० रुपये असे मिळून १० हजार रुपये त्या आज्जीच्या अकाउंटला आताच ट्रांसफर केले आहेत, आणि त्या आज्जीला तुम्ही त्याच्यासाठी केलेले सर्व सांगून तुमचाही नंबर त्यांना दिला आहे."
पंधरा मिनिटांनी परत फोनची बेल वाजली, "हॅलो, अमृता चा नंबर आहे का हा ?"
"होय, मी अमृता बोलतेय. आपण कोण?"
----
----
"हॅलो, कोण बोलतंय ? हॅल्लो ????"
"बेटी, गळा दाटून आल्याने बोलता येत नाहीय गं. मी राधा जोशी. तू जिच्या खात्यात एक हजार भरलेत तीच मी. वृद्धापकाळ असल्याने विस्मरण होतेय गं.
मी मशिनमधून रिसीट घेतली पण बाहेर आलेले पैसे काढून घ्यायला विसरले ! घरी आल्यावर लक्षात आले. पण मग विचार केला कि 'आता नंतर कितीतरी लोक तिथे येऊन गेले असतील, कोण कशाला ठेवतेय तिथे पैसे?' पण तू देवाची मुलगी बनून आलीस आणि माझा महिना वाचवलास गं पोरी."
बास्स !! दोन मिनिट दोघी दोन्हीकडे निशब्द ! नकळत एकेक थेंब डोळ्यातून ओघळलेला ! आनंदाचा, कृतार्थतेचा !! काय नव्हतं त्या अश्रू मध्ये "विश्वाचे आर्त, माझ्या मनी प्रकटले" हि ज्ञानोबा माऊलींची साद प्रत्यक्षात तिथे अवतरलेली !
दिल्याने वाढतो त्याला आनंद म्हणतात आणि घेतल्याने कमी होते, त्याला दुःख म्हणतात. आपण आपल्याला जमेल तेव्हा जमेल तिथे आणि जमेल तितके इतरांचे असे दुःख घेतले आणि जमेल तेव्हा आनंदाचे चांदणे उधळून दिले तर त्यातुंन आपल्यालाही आनंदच मिळतो. कारण आपल्याला जे हवे ते आधी आपण दुसऱ्याला द्यायला शिकले पाहिजे.
मस्त जगण्याचे हे बेसिक तत्व आहे. तेच आपण सारे मिळून जमेल तिथे पाळूया ! आणि प्रामाणिकपणा हा कोणता खास असा गुण नसून तो जगण्याचाच एक भाग म्हणून जगूया! मग पहा अनेक राधा आज्जी सुखी होतील!
_लेखक- अनामिक.
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा