बोधकथा - तपश्चर्या कशासाठी ?
🌀🌀🌀🌀🌀🏵🌀🌀🌀🌀🌀
🔸तपश्चर्या कशासाठी ?🔸
शिकार तर मिळालीच नाही ! त्यात जंगलात कुठे पोचलो हेही कळेना. त्यातच तहान-भुकेने सारे हैराण झालेले. राजा आणि त्याच्या बरोबरचे १२/१५ जण पार वैतागून गेले होते. ‘अरे, किमान पाणी कुठे मिळेल का हे तरी बघा !’ राजाने चिडूनच आज्ञा केली.
शोधाशोध केल्यावर एक कुटी दिसली. तिथे काही सोय होईल म्हणून सारे तिकडे गेले. हाय ! एकादशीच्या घरी महाशिवरात्र ! मातीची चार भांडीकुंडी, दगडाची चूल आणि लंगोटीवरचा एक कृश माणूस ! ही जागा शोधणाऱ्या सैनिकावर राजा भडकला. ‘हाच मरु लागला आहे, आपल्याला काय मिळणार ?’ राजाने दरडावून विचारले.
राजाच्या बोलण्याने ती कृश व्यक्ती भानावर आली. डोळे उघडून ती म्हणाली, ‘ कोण आहात आपण ? काय पाहिजे आपल्याला ?’
एक सैनिक म्हणाला, ‘ हे राजे आहेत. आम्ही जंगलात भरकटलो. तहान-भुकेने हैराण झालो आहोत.’
ती व्यक्ती म्हणाली, ‘चिंता का करता ? समोर जी चार झाडे आहेत त्याखाली बसा. डोळे मिटून काय काय पाहिजे ते सांगा. सारे मिळेल’
राजाला अधिकच संताप आला. पण ‘मरता क्या न करता’ म्हणत तो आणि सारेच झाडाखाली बसले. डोळे मिटून हवे ते मागितले. आणि काय आश्चर्य ! सारे काही त्यांच्या समोर अवतरले.
तृप्त झाल्यावर राजा त्या व्यक्तीला म्हणाला, ‘हे कसे काय झाले?’
*ती व्यक्ती म्हणाली, ‘तपाचे हे फळ आहे ! माझ्या साधनेने ही झाडे माणसाची इच्छापूर्ती करु शकतात.’*
*राजाला खूप आश्चर्य वाटले. तो म्हणाला, ‘मग तुम्ही स्वत: असे दैन्यात का राहाता?’*
*तो तपस्वी म्हणाला, ‘राजा, हे दैन्य नाही. हा संयम आहे. तपश्चर्या स्वत:च्या सुखासाठी करायची नसते. ‘ जो जे वांछिल तो ते लाभो ‘ हे साधावे म्हणून मी तप करतो. गेली ९४ वर्षे मी ही साधना करतो आहे. हा कंटकाकीर्ण मार्ग मी स्वयंस्विकृत केला आहे !’*
*राजाचे डोळे भरुन आले. त्याने वाकून तपस्व्याला प्रणाम केला. दाटल्या कंठाने राजा म्हणाला, ‘खरे राजे तर आपण आहात. माझ्याकडे सगळे असून मीच खरा दैन्यात जगतो आहे. आपणाकडे काहीच नसून आपण खरे ऐश्वर्यवान आहात ! परं साधना हेच वीरव्रत आहे हे मला पटले. आपण वीरही आहात. मला काही उपदेश करा !’*
*तपस्वी म्हणाला, ’राजा, श्रेष्ठ सिंहासनांची सैन्य, संपत्ती, वैभव ही शक्ती असतेच पण खरी शक्ती असते देशातल्या निरपेक्ष तपस्व्यांच्या तपाचीच ! सत्ता नव्हे सेवा महत्वाची हे तू कधी विसरु नको !’*
*वृक्षांखालच्या उपभोगाने जी तृप्ती मिळाली त्यापेक्षा या उपदेशाने आपण कायमचे तृप्त झालोत या जाणीवेने राजा खरा ऐश्वर्यवान झाला होता.*
🌷जय जय राम कृष्ण हरी🌷
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा