टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया
टागोरांचे भावविश्व संपन्न करणाऱ्या दोन स्त्रिया
रवींद्रनाथ टागोर म्हटले की समोर येते ती पांढरी शुभ्र दाढी असलेली भव्य चेहऱ्याची व्यक्ती. त्यांनी लिहिलेले ' जनगणमन 'आठवते. टागोर म्हटले की त्यांच्या ' गीतांजलीला ' मिळालेला नोबेल पुरस्कार आठवतो. टागोर म्हटले की त्यांचे शांतिनिकेतन आठवते.टागोर हे महान गीतकार आणि संगीतकार. त्यांनी इंग्रज सरकारला'सर 'ही पदवी परत केल्याचे आठवते. आणि आठवतात अशाच साऱ्या अनेक गोष्टी. बंगाली माणसाच्या घराघरात आणि मनात मानाचे स्थान असलेले हे व्यक्तिमत्व. पण त्यांच्या तरुणपणातील एक अधुरी प्रेमकहाणी आपल्याला फारशी माहिती नसते. आणि तिचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आणि मराठी मुलीशी आहे.
आत्माराम पांडुरंग तर्खडकर किंवा तर्खड हे त्या काळातील मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि समाजसुधारक. त्यांच्यावर बंगालमधील केशवचंद्र सेन यांचा प्रभाव होता. त्यांच्या कार्याने प्रेरित होऊन तर्खडकरांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. या स्थापनेच्या वेळी त्यांचा उद्देश होता, तो म्हणजे समाजातील जातीभेद दूर करणे, मुलींना शिक्षणासाठी उत्तेजन देणे, बालविवाह रोखणे आणि विधवा पुनर्विवाहास उत्तेजन देणे. तर्खड कुटुंबीय हे उच्चशिक्षित होते. देशविदेशातील अनेक विद्वान आणि थोर व्यक्तींशी त्यांचा संबंध होता. टागोरांना जेव्हा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवायचे ठरले तेव्हा त्यांना मुंबईत राहत असलेल्या या तर्खडकर कुटुंबात पाठवण्यात आले. त्यांना इकडे पाठवण्यात त्यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ यांची प्रमुख भूमिका होती. कारण सत्येंद्रनाथ आणि आत्माराम तर्खडकर यांचे संबंध. इंग्लंडला जाण्यापूर्वी इंग्रजी बोलणे आणि तेथील रीतिरिवाज शिकण्यासाठी या तर्खड कुटुंबात राहण्याचा त्यांना उपयोग होईल असे सत्येंद्रनाथांना वाटले.
आणि रवींद्रनाथ मुंबईला या तर्खड कुटुंबात दाखल झाले. आत्माराम पांडुरंग यांची दुसरी मुलगी अन्नपूर्णा उर्फ अना ही त्या वेळी नुकतीच इंग्लंडमधून परतली होती. तिचे वय साधारण वीस वर्षांचे. आणि रवींद्रनाथ हा तरुण बंगाली तरुण अवघा १७ वर्षांचा. अना त्यांना इंग्रजी आणि इंग्रजी शिष्टाचार शिकवू लागली. हा देखणा तरुण बंगाली मुलगा तिला आवडला. आणि नकळत ती त्यांच्या प्रेमात पडली. रवींद्रांवर पण तिच्या प्रेमाने जादू केली होती. रवींद्रनाथांनी तिचे नाव नलिनी ठेवले. आणि नलिनी ही त्यांची काव्यप्रेरणा ठरली. त्यांच्या अनेक कविता तिच्यावरच्या प्रेमातून स्फूर्ती घेऊन जन्माला आल्या आहेत. पुढे दोन महिन्यांनी टागोर इंग्लंडमध्ये गेले.
पण त्यांची आणि नलिनीची ही प्रेमकहाणी फुलली नाही. नलिनी उर्फ अनाने नंतर बडोदा येथील कॉलेजमध्ये व्हाईस प्रिन्सिपॉल असलेले हॅराल्ड लिट्लहेड यांच्याशी विवाह केला. आणि पुढे ते दोघे इंग्लंडमधील एडिंबर्ग येथे स्थायिक झाले. पण आजारामुळे अना जास्त काळ जगली नाही. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. असे म्हणतात की आत्माराम पांडुरंग म्हणजे तिच्या वडिलांच्या मनात तिचा विवाह रवींद्रनाथांशी करून द्यावा असे होते. पण रवींद्रनाथांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ याना त्या दोघातील वयाचे अंतर मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी हा प्रस्ताव नाकारला.
पण जरी अनाशी विवाह होऊ शकला नाही तरी तिने म्हणजेच नलिनीने टागोरांचे भावविश्व शेवटपर्यंत व्यापले होते. तिची स्मृती त्यांच्या मनात शेवटपर्यंत जागृत होती. त्या दोघांच्या एकमेकांवरील असलेल्या प्रेमातून रवींद्रनाथांच्या अनेक अक्षर कवितांचा जन्म झाला आहे.
पुढे रवींद्रनाथ इंग्लंडला गेल्यावर स्कॉट कुटुंबात राहिले. स्कॉट पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली असे हे चौकोनी कुटुंब होते. स्कॉट कुटुंब अतिशय प्रेमळ होते. स्कॉटबाईंनी टागोरांना खूप जीव लावला. त्यांच्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. भारतीय स्त्रीचेच आपल्या ुकुटुंबावर, पतीवर प्रेम असते हा रवींद्रनाथांचा गैरसमज या कुटुंबात राहिल्याने दूर झाला. आई, मग ती भारतीय असो वा पाश्चिमात्य, तिचे आपल्या मुलांवर सारखेच प्रेम असते या विश्वभावनेचा प्रत्यय त्यांना या कुटुंबात राहिल्याने आला. टागोरांच्या पुढील आयुष्यात त्यांच्यामधील संगीतकारात जो भारतीय आणि पाश्चात्य संगीताचा संगम दिसतो त्याचे मूळ ते या कुटुंबात राहिले होते इथे आहे. स्कॉट यांच्या दोन्ही मुली संगीतात प्रवीण होत्या. त्यांनी रवींद्रनाथांना पाश्चात्य संगीत शिकवले.
ते असे या कुटुंबात रमले असतानाच, त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडून भारतात परत येण्याबद्दल सांगितले गेले. या वेळी रवींद्रनाथांना निरोप देताना स्कॉट बाईंना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्यावेळी त्या म्हणाल्या, ' एवढा जीव लावून लगेच जायचे होते, तर आलासच कशाला ?' या प्रसंगातून रवींद्रनाथांना स्त्री हृदयातील प्रेमाची, वात्सल्याची अनुभूती आली. आणि एका परीने त्यांचे भावविश्व संपन्न होण्यास मदत झाली.
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा