पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय | Marathi Audio book | audio story
पर्यावरण वाचवण्यासाठी उपाय
वाहनांचे वाढते प्रदूषण हा आपल्या वातावरणाला खूप मोठा धोका आहे. सध्याच्या आधुनिक युगात आपण आजूबाजूला पाहतो की वाहनांची संख्याही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे जे काही प्रदूषण होते ते कमी करायचे असेल तर ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर लोकांनी जास्त प्रमाणात केला पाहिजे असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे. सध्या बॅटरीवर चालणारी वाहने बाजारात येत आहेत त्यांचाही वापर मोठ्या प्रमाणात झाला तर वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचे प्रमाण कमी होईल, वातावरण स्वच्छ व शुद्ध होण्यास नक्कीच मदत होईल..
आपणास जर भाजीपाला, फळे, दूध, किराणामाल इत्यादी खरेदी करण्यासाठी जावयाचे असेल व अंतर कमी असेल तर आपण वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. सर्वांनी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी आठवड्यातून एक दिवस तरी वाहना ऐवजी सायकलचा वापर केला पाहिजे. गेल्या काही वर्षापासून मी याची स्वतःला सवय लावून घेतलेली आहे. याप्रमाणे आपण याचा आपल्या दैनंदिन जीवनात अंमल केला तर आपल्याला तीन प्रकारे फायदा मिळेल.पहिला फायदा हा की सायकलचा वापर केल्यामुळे आपले शरीर तंदुरुस्त राहील, दुसरा फायदा म्हणजे हवेतील प्रदूषण कमी करण्यास मदत होईल व तिसरा फायदा म्हणजे आपण वाहनासाठी जे काही इंधन वापरतो त्या इंधनाची आपण बचत करू शकू.मला इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो. सरकार इंधनासाठी डॉलरमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात खर्च करते.जर आपण सर्वांनी यावर गंभीरपणे विचार करून आठवड्यातून किमान एक दिवस तरी आपल्या दैनंदिन कामकाजासाठी सायकलचा वापर केला तर सरकारचा इंधनावरील परकीय चलनाचा खर्च काही प्रमाणात कमी होईल. त्यामुळे आपल्याला आपण देशासाठी काहीतरी केल्याचे समाधान वाटेल व ही एक प्रकारची देशसेवाच आहे असे मला वाटते.
प्लास्टिकची उत्पादने आणि पॉलिथिन पिशव्यांचा वापर आपण सर्वांनी पूर्णपणे टाळला पाहिजे.आपणा सर्वांना माहीत आहे की प्लास्टिकची उत्पादने, पॉलिथिन पिशव्या या हजारो वर्षे नष्ट होत नाहीत व त्यामुळे वातावरणातील संतुलन बिघडते, वातावरण प्रदूषित होते. काही ठिकाणी कचरा व पॉलीथीन पिशव्यांमुळे गटारे तुंबतात व गटारातील पाणी बाहेर येते व त्यामुळे प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरते व त्यामुळे लोक आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. पॉलिथिन पिशव्या मुकी जनावरे नकळतपणे खातात व त्यामुळे नंतर त्यांच्या प्रकृतीला खूपच त्रास होतो.आपण सर्व जण जेव्हा घरातून काही खरेदी करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा सर्वांनी न चुकता एखादी कापडी पिशवी आपल्याबरोबर ठेवली तर आपण जी काही भाजी,किराणामाल इत्यादी खरेदी करतो तो त्यात व्यवस्थित बसतो व आपणाला पॉलिथिन पिशवीची गरजच भासत नाही. कापडी पिशवी जर घाण झाली तर आपण ती वेळोवेळी स्वच्छ धुऊन त्याचा पुनवापर करू शकतो. मी स्वतः हे बरेच वर्षांपासून करतो आहे.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत साधे बदल करू शकतो.वापरात नसताना आपल्या घरातील दिवे,पंखे, कुलर इत्यादी बंद करून वीज वाचवायला हवी.अनेक वर्षापासून मी याचा अवलंब चालू केलेला आहे.त्यायोगे मी विजेची बचत करत आहे व माझे विजेचे बिलही काही प्रमाणात कमी झाले आहे. मला इथे अजून एक मुद्दा नमूद करावासा वाटतो की आपल्या घरामध्ये जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रमाणात नैसर्गिक सूर्यप्रकाश व वारा यांचा उपयोग करून घ्यावा.आपण जेव्हा तज्ञ वास्तुविशारद यांजकडून घराचा नकाशा बनवून घेतो त्याच वेळी आपल्या घरामध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाश व वाऱ्याचा स्त्रोत कसा जास्त उपलब्ध होईल याकडे कटाक्षेने लक्ष दिले पाहिजे असे मला वाटते. माझे असे अत्यंत स्पष्ट मत आहे की आपण ज्या घरात राहतो त्या घरांमध्ये दिवसा तरी लाईट, पंखे इत्यादीचा वापर कमीत कमी केला पाहिजे. अशाप्रकारे आपण विजेची खूप मोठ्या प्रमाणात बचत करू शकतो.
मी जेव्हा दैनंदिन कामकाजासाठी कुठल्याही खाजगी, सरकारी, निमसरकारी सार्वजनिक कार्यालयात जातो, तेव्हा माझ्या निरीक्षणात असे आले आहे की बऱ्याच कार्यालयांमध्ये गरज नसताना सुद्धा पंखे,लाईट, कूलर, एसी इत्यादी उपकरणे बिनधास्तपणे चालू असतात.यासाठी आपण रोज शेकडो युनिट वीज अक्षरशा वाया घालवत आहोत असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे व त्यामध्ये कुणालाही काहीही गैर किंवा वावगे वाटत नाही याचे मला खूप आश्चर्य वाटते.आपण सर्वांनी जर शांतपणे विचार केला कि अशाप्रकारे आपण किती मोठ्या प्रमाणात विजेचा गैरवापर करत आहोत व हे पूर्णपणे चुकीचे आहे,हे आपल्याला ,समजून उमजून आले तर गरज नसताना विजेची उपकरणे आपण पूर्णपणे बंद ठेवली तर खूप मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकेल.
आजकाल बाजारामध्ये एलईडी बल्ब सहजपणे उपलब्ध आहेत.त्याचा आपण सर्वांनी आपल्या राहत्या घरात, कार्यालयात जर पूर्णपणे वापर केला तर विजेचा वापर कमी होईल. फ्रिज, एसी, कुलर इत्यादी विजेवर चालणारी उपकरणे खरेदी करण्यापूर्वी आपण त्यामध्ये त्यांना काही ठराविक मानांकन आहेत का हे तपासून घ्यावे व अशा प्रकारची उत्पादने चांगल्या प्रतिष्ठित कंपनीची विकत घ्यावीत.अशा प्रकारची उपकरणे ही विजेचा वापर कमी करतात व त्यामुळे आपले विजेचे बिल सुद्धा खूप काही प्रमाणात कमी होण्यास नक्कीच मदत होईल.
वास्तुविशारद यांनी घराचे बिल्डिंगचे,सार्वजनिक वास्तूंचे, मॉल,सिनेमागृह इत्यादी कोणत्याही प्रकारच्या वास्तूचे नियोजन करताना त्यामध्ये जर नैसर्गिक सूर्यप्रकाश व वारा येण्यासाठी मुबलक प्रमाणात सोय केली तर दिवसा घरात किंवा कार्यालयात लाईट व पंखा लावण्याची गरजच पडणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल.
महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांनी रस्त्यावर जे काही दिवे असतात ते दिवे जर सौर ऊर्जेवर कार्यान्वित केले तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होईल व त्याचबरोबर शासकीय कार्यालयांना मोठ्या प्रमाणात विजेचे जे बिल येते ते बिल खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल व यामधून तत्सम शासकीय कार्यालयांचा जो काही पैसा वाचेल किंवा बचत होईल त्याचा त्यांना दुसऱ्या विकास कामासाठी वापर करता येईल.या सर्व उपायांनी आपण विजेचा वापर नक्कीच मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो. विजेचा वापर कमी करणे म्हणजे एक प्रकारे विज निर्माण करण्यासारखेच आहे असे मला वाटते.
आजकाल बऱ्याच घरात पाणी गरम करण्यासाठी गिझरचा वापर करतात.ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी पाणी गरम करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर केला तर बऱ्याच मोठ्या प्रमाणात वीज वाचू शकेल.
नळाचे किंवा हातपंपाचे पाणी पूर्णपणे शुद्ध नसते,अशा प्रकारच्या पाण्याचे प्राशन केल्यामुळे लोकांना बऱ्याच व्याधींना तोंड द्यावे लागते. त्त्यापासून स्वतःचे व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी आजकाल बऱ्याच घरात, सार्वजनिक,शासकीय, निमशासकीय कार्यालयात, मॉलमध्ये,सिनेमा हॉल इत्यादी ठिकाणी पाणी शुद्ध करण्याचे यंत्र बसवून घेतात.पाणी शुद्ध करण्याच्या यंत्रामधून जेवढे पाणी शुद्ध होते त्याच्या साधारणपणे अंदाजे तीस टक्के एवढे पाणी यंत्रामधून बाहेर पडते. ते पाणी पिण्यासाठी योग्य नसते.परंतु ते पाणी आपण दुसऱ्या कामासाठी जसे की बागेमध्ये झाडांना पाणी घालण्यासाठी, भांडी घासण्यासाठी,कपडे धुण्यासाठी, फरशी स्वच्छ करण्यासाठी त्याचा वापर करू शकतो.सर्वांनी या गोष्टीवर अंमल करून ते पाणी वाया न घालवता त्या पाण्याचा पुनर्वापर केला तर आपण नक्कीच काही प्रमाणात पाण्याची बचत करू शकतो.
काही लोक आपले वाहन धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी पाण्याचा नळ खूप वेळ चालू ठेवतात त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते.ओल्या कापडाचा उपयोग करून सुद्धा वाहन स्वच्छ करता येते. यावर सर्व लोकांनी अत्यंत गांभीर्याने विचार करून त्याप्रमाणे कृती केली तर नक्कीच काही प्रमाणात आपण पाण्याची बचत करू शकू.
पाणी आपल्याला नैसर्गिकपाणे उपलब्ध होते, त्यामुळे मला अत्यंत खेदाने असे म्हणावयाचे आहे की पाण्याची खरी किंमत अजूनही लोकांना कळून, उमजून, समजून आलेली नाही. अजूनही कुठल्याही प्रयोगशाळेत पाणी तयार करता आलेले नाही. पाण्याचा वापर आपण सर्वांनी अत्यंत काटकसरीने, विचार करून, जबाबदारपणे, काळजीपूर्वक केला पाहिजे. पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत योग्य रीतीने उपयोगात आणला पाहिजे व ही काळाची गरज आहे असे माझे अत्यंत स्पष्ट मत आहे. माझ्या असे वाचनात आले आहे की आपण जर पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर तिसरे महायुद्ध हे पाण्यासाठी होईल. त्यामुळे आपण सर्वांनी यावर अत्यंत गांभीर्याने विचार करुन पाण्याचा वापर काटकसरीने काळजीपूर्वक करावा असे मला वाटते.
काही लोकांना दाढी करताना बेसिनचा नळ दाढी पूर्ण होईपर्यंत चालू ठेवण्याची सवय असते.हे पूर्णतः चुकीचे आहे असे मला वाटते त्यामुळे नकळत आपण काही लीटर पाणी वाया घालवतो.यावर अशा व्यक्ती म्हणू शकतात की मी एकट्याने जर दाढी करताना नळ बंद केला तर त्यामुळे असे किती पाणी वाचणार आहे ? पण मी त्या सर्व लोकांना अत्यंत नम्रपणे सांगू शकतो की आपल्या सारख्या सर्व लोकांनी जर यावर गंभीरपणे विचार केला व दाढी करताना जर नळ पूर्ण वेळ बंद ठेवून एखाद्या मग मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये रेझर धुतला तर आपण सर्व मिळून बर्याचशा प्रमाणात पाण्याची बचत करू शकतो. हे मी माझ्या कॉलेज जीवनापासून अमलात आणलेले आहे.
मानवी जीवनात वृक्षांचे फार मोठे नाव महत्त्व आहे. ते हवेतील कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन बाहेर सोडतात.ऑक्सिजन हा मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय मनुष्य जगूच शकत नाही.वृक्षापासून आपणाला कागद,औषधे आणि इतरही बरीच सामुग्री मिळते,.वृक्ष जमिनीची धूप दूर करण्यास मदत करतात, प्रदूषण कमी करण्यामध्ये वृक्ष खूप मोठी भूमिका बजावतात. या सर्व गोष्टींमुळे वृक्षारोपण करून वृक्षांचे योग्य प्रकारे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
तलावाचे पाणी व नदीचे पाणी वापरून लोक आंघोळ करणे ,कपडे धुणे,जनावरांना आंघोळ घालणे, गाड्या स्वच्छ करणे इत्यादी कामे करतात. तसेच नदीच्या व तलावाच्या पाण्यामध्ये बरेच ठिकाणी कारखान्यातील सांडपाणी,अनेक प्रकारचे रंग, रसायने इत्यादी सोडलेली असतात त्यामुळे ते पाणी पिण्यासाठी योग्य न राहता दूषित बनते.अशा प्रकारे मनुष्य स्वतःच स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कमी करून घेत आहे.अशुद्ध पाणी पिल्यामुळे मानवाला अनेक प्रकारचे आजार जडतात. लोकांनी या विषयावर गांभीर्याने विचार करून हे सर्व पूर्णपणे बंद केले पाहिजे जेणेकरून त्यांना मुबलक प्रमाणात पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होईल व त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नक्कीच मदत होईल असे माझे स्पष्ट मत आहे.
आपण विज बिल, महानगरपालिकेचा कर, भ्रमणध्वनीचे बिल ,टेलिफोन बिल,पाणीपट्टी,पॉलिसीचे हप्ते, बँकेचे हप्ते इत्यादी देण्यासाठी, लोकांबरोबर पैशाची देवाण घेवाण करताना व इतरही बरेच ठिकाणी अजूनही धनादेशाचा वापर करतो.आपणास जेवढ्या प्रमाणात शक्य असेल तेवढ्या प्रमाणात ऑनलाइन पेमेंट केले तर प्रत्येक ठिकाणी आपण जो धनादेश वापरतो तो धनादेश कागदा पासून बनवलेला असतो व कागद वृक्षापासून तयार होतो त्यासाठी वृक्ष कापून त्यावर प्रक्रिया केली जाते.आपण सर्वांनी जर असा ठाम निर्धार केला की मी शक्य होईल तेवढे ऑनलाईन पेमेंट करेन.तसे केल्याने आपण नक्कीच वृक्षतोड काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो.
कोणताही कागद आपण दोन्ही बाजूने पूर्णपणे लिहूनच वापरला पाहिजे.मी बरेच ठिकाणी असे बघतो की लोक कागदावर एकाच बाजूने लिहितात व दुसरी बाजू मोकळी सोडून कागद तसाच टाकून देतात ते पूर्णपणे चुकीचे आहे.कागदाची निर्मिती करण्यासाठी वृक्षतोड करावी लागते हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.काही गोष्टी आपण कागदावर लिहून किंवा टिपून न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या भ्रमणध्वनी मध्ये सुद्धा व्यवस्थित साठवून ठेवू शकतो व जेव्हा पाहिजे तेव्हा त्याचा आपण सहजपणे वापर करू शकतो.यावर जर सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे अंमल केला तर आपण नक्कीच काही प्रमाणात का होईना कागदांचा वापर कमी करू शकतो व त्याद्वारे आपण वृक्ष संवर्धनास मदतही करू शकतो असे माझे अत्यंत प्रांजळ मत आहे.
लेखक : श्री. आनंद रुद्रप्पा हूलगेरी
1, पर्ल रेसिडन्स, मीरा नगर,
जुळे सोलापूर,
सोलापूर.
पिन -- 413008
भ्रमणध्वनी ---
9175087388* *8208306246
____________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा