◾बोधकथा :- बोलणारी गुहा ... | bodhkatha | yashacha mantra
एका जंगलात अनेक प्राणी राहत होते. जंगलाला लागून एक अर्धगोलाकृती डोंगर होता. या अर्धगोलाकृती डोंगरातून एक ओढा वाहत होता. ओढयाला बाराही महिने स्वच्छ नितळ पाणी असायचे. ओढ्याकाठी मोठमोठी झाडं वाढली होती. झाडांच्या थंडगार सावलीत आजूबाजूचे प्राणी जमायचे. थंडगार पाणी पिऊन आपापल्या मार्गाने चालू लागायचे.
या जंगलात एक सिंह होता. सिंह म्हातारा झाला होता. म्हातारपणामुळे त्याला जास्त फिरणं व्हायचं नाही. शिकारीचा पाठलाग करणं जमायचं नाही. त्यामुळे सिंहाची उपासमार होऊ लागली. खूप प्रयत्न करूनही छोटी मोठी शिकार मिळायची. ही शिकार करताना सिंहाची पुरती दमछाक व्हायची. पून्हा नवीन शिकार करायला त्राणच उरायचे नाही.
आशा परिस्थीतीत करणार काय ?
एकेकाळचा जंगलाचा राजा, आता एकवेळच्या खाण्यासाठी झुंजत होता. रखडत होता. ज्या इवल्याशा प्राण्याकडं लक्षही दिलं नसतं, असे प्राणी खाऊन कसा तरी जगत होता.
असाच एके दिवशी हा म्हातारा सिंह शिकारीसाठी फिरत होता. त्याला खूप भूक लागली होती. भूकेनं व्याकुळ झाल्यामुळं त्याच्यानं चालणंही होत नव्हतं ; परंतु न चालुन करणार काय ?
तसाच तो फिरत फिरत अर्धगोलाकृती डोंगराच्या पायथ्याशी आला. सिंहाला डोंगरात एक गुहा दिसली. काळोखी तोंडाची गुहा बघून सिंहाला बरं वाटलं. नक्कीच या गुहेत काही प्राणी राहत असतील. सिंह मनाशी म्हणत गुहे समोरच्या गर्द झुडपात लपून बसला.
गुहेत जाणारा प्राणी परत आला की, एका झडपेत खलास करायचं. सिंह बसल्या जागी मनातल्या मनात योजना आखू लागला.
खूप वेळपर्यंत सिंहाने डोळ्यात तेल घालून येणाऱ्या पाहुण्यांची वाट पाहिली ; परंतू कोणीही आलं नाही की बाहेर गेलं नाही. सिंहाने मग विचार केला. गुहेतले प्राणी जंगलात गेले असतील. बाहेर झुडपात राहण्यापेक्षा गुहेतच दबा धरून बसावं.जसा प्राणी परत येईल तसं आतल्या आतच काम फत्ते करता येईल. हा विचार करून सिंह उठला.एके ठिकाणी बसून बसून कंटाळाही आला होता.
सिंह गुहेत शिरला. सर्वत्र काळोख होता. गुहेच्या दाराच्या डाव्या बाजूला कोपऱ्यात एक भगदाड होतं. त्या भगदाडात सिंह आरामात बसला. येणाऱ्या प्राण्यांची वाट पाहू लागला.
त्या गुहेत एक कोल्हा राहत होता. बाहेर जंगलात फिरायला गेलेला कोल्हा गुहेकडं परत आला. गुहेसमोर बारीक माती होती. मातीत कोणातरी मोठ्या प्राण्याच्या पायाचे ठसे हुशार कोल्ह्याला चटकन दिसले.
' हे पायाचे ठसे कोणत्या तरी मोठ्या आणि खतरनाक प्राण्याचे आहेत.' कोल्हा मनाशी म्हणाला.
अशा परिस्थितीत गुहेत एकदम प्रवेश करणं धोक्याचं आहे. कोल्ह्याने समजून घेतलं.
कोल्हा धूर्त होता. हुशार होता, तसाच शहाणा ही होता.
" गुहा, अगं ए गुहा." कोल्ह्यानं मोठ्यानं आवाज दिला.
सगळीकडे चिडीचूप
कोल्हयानं पून्हा हाक मारली,
" हे माझ्या गुहे , तू आज अशी गप्प का ? तुला आज झालं आहे तरी काय ? तू मेली तर नाही ना ! "
" दररोज मी परतीच्या वेळी तू माझं स्वागत करतेस. मग आज झालं काय ? जर तू मला उत्तर दिलं नाहीस, तर मी दुसऱ्या गुहेत जाईन."
सिंहानं कोल्ह्याचं सगळ बोलणं
ऐकलं. सिंहानं विचार केला, " खरंच ही गुहा कोल्ह्याचं स्वागत करत असेल. आज मी इथं असल्यामुळे ती घाबरली असेल. आपण प्रतिसाद दिला नाही तर तो निघून जाईल."
" ये मित्रा ये, मी तुझ्या स्वागतासाठी वाट बघत आहे.''
सिंह आपल्या भसाड्या आवाजात म्हणाला.
सिंहाचा आवाज ऐकताच , हुशार कोल्ह्यानं टुणकून उडी मारली.आतल्या संकटाची त्याला कल्पना आली. सिंह बाहेर येण्यापूर्वीच कोल्हा पसार झाला.
तात्पर्य : - हुशारीने किंवा युक्तीने संकटाला तोंड देता येते.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🟩🟩🔶🔶🔶🔶🟩🟩
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा