◾बोधकथा :- गुरू कासव...
एका शहराच्या नदीकिनारी एक म्हातारा एकटाच झोपडी बांधून राहत असे. जवळपासच्या शेतामधून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत असे. त्याने आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या होत्या.
त्याने एक कासव पाळले होते, त्याच्याशी त्याचा चांगलाच स्नेह होता. शेतावरून घरी आल्यावर जेव्हा तो स्वत:साठी भाकरी बनवायला घेई,तेव्हा कासवासाठी तो चणे भिजवत असे. कासवाविषयी म्हाताऱ्याचे असे प्रेम पाहून आसपासचे लोक त्याची खिल्ली उडवत. पण म्हाताऱ्याला त्याचे वाईट वाटत नसे.
एक दिवस म्हाताऱ्याचा एक परिचित भेटण्यास आला. काही वेळ म्हाताऱ्याशी गप्पा केल्यावर कासवाला पाहून तो त्याला म्हणाला, ‘ हा कसला घाणेरडा प्राणी घरात पाळला आहे ? बाहेर नेऊन टाक त्याला.’
ते ऐकून म्हाताऱ्याला खूप वाईट वाटले, तो म्हणाला,‘ तुम्ही असे म्हणून माझ्या गुरूचा अपमान करत आहात.’
हे ऐकून परिचित आश्चर्याने म्हणाला,
‘हा कसा काय गुरू बुवा?’
म्हातारा त्याला समजावत म्हणाला, ‘हे पाहा, जराशी कसलीशी चाहूल लागली तर हे कासव आपले अवयव आखडून घेते. याच्या प्रत्येक वेळी असे करण्यामधून मला शिकता येते की, जगामध्ये पसरलेल्या कसल्याही दुर्वृत्ती तुम्हाला ग्रासू लागतात तेव्हा या कासवाप्रमाणे आपण आपले विचार व कृती विवेकाने संकोचल्या गेल्या पाहिजेत आणि दुष्ट प्रवृत्तींपासून परावृत्त झाले पाहिजे. अशी एवढी मोठी शिकवण यापासून मिळत आहे तर हा माझा गुरू नाही का ?’
🔅 तात्पर्य :-
सकारात्मक दृष्टिकोनाने अशा प्रेरणा घेतल्या तर आयुष्य सुखी बनवता येऊ शकते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा