◾जिवन मंञ :- सुख कशात आहे...
आज सकाळी वाचलं की, म्हणे पैशाने सुख मिळते. आता ही गोष्ट खरी असली की जर रडायचं असेल तर ते मर्सिडीजच्या स्टेअरिंग वर डॊकं ठेऊन रडावं, रस्त्यावर कुठेतरी कोपऱ्यात किंवा आपल्या घरातल्या फाटक्या उशीवर डोकं ठेऊन रडण्यात काय फायदा?
तर म्हणून मला वाटतं सुखाची परिभाषा अशी असावी.
सुख, समाधान, आणि आनंद या तीन गोष्टीं आणि दुःख ही चौथी गोष्ट! या गोष्टींच्या आसपास आपलं आयुष्य फिरत असतं. तसं म्हटलं तर सुख, आनंद आणि समाधान हे तिन्ही शब्द एकसारख्याच अर्थाचे वाटतात – पण तसे नाही. एखाद्या गोष्टी मध्ये सुख जरी असले तरीही त्यात समाधान असेलच असे नाही. किंवा एखादी आनंद देणारी गोष्ट सुख देईलच असे नाही. सुख आणि आनंद हा क्षणिक असतो, पण समाधान हे तसे नसते.
एक गोष्ट बघा, समजा तुम्ही रेल्वे स्टेशन मध्ये प्लॅटफॉर्म वर उभे आहात. समोरून दोन गाड्या अगदी इतक्या गच्च भरलेल्या होत्या की तुम्हाला आत शिरायला मिळाले नाही. मग तुमच्या मनात विचार येतो, की जर आत शिरायला मिळालं, तरीही पुरेसे आहे.
तुम्हाला तिसऱ्या रेल्वेत आत शिरायला मिळतं. तुम्ही दोन सिटच्या मधे जाउन उभे रहाता. पुढला मनातला विचार – जर जागा मिळाली तर? अगदी चौथी सीट जरी मिळाली तरीही हरकत नाही. तुमचं नशीब आज अगदी जोरावर असतं, समोरच्या सिटवरचा माणूस उठून जातो आणि तुम्हाला जागा मिळते आणि तुम्ही बसता, आनंद वाटतो तेवढ्यापुरता, पण शेजारचा माणूस साला किती जाड आहे, किती गर्दी होतेय नां?? असे विचार सुरु होतात. म्हणजे इथेही तुम्ही सुखी नसता, फक्त तेवढ्यापुरता आनंद असतो. तुमच्या मनात विचार असतो, की जर विंडॊ सिट मिळाली तर?? काय आश्चर्य, पुढल्याच स्टेशनला माणूस उठून उभा रहातो, आणि ती सिट तुम्हाला मिळते. मस्त पैकी हवा खात आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पहात तुम्ही प्रवास करत असता, आणि तुमचं लक्ष शेजारच्या रस्त्यावरून जाणाऱ्या कारकडे जाते तुमच्या मनात विचार येतो, ” सालं, काय हे आयुष्य, रोज धक्के खात प्रवास करायचा – त्यापेक्षा एखादी मस्त पैकी एसी कार असती तर?
”थोडक्यात या मटेरिअलिस्टीक गोष्टी तुम्हाला क्षणभर आनंद अवश्य देतील पण सुख आणि समाधान??
आयुष्यभर आपण एखाद्या सुखासाठी धडपडत असतो, पण ते मिळाल्यावर, अरे यात तर काही विशेष सुख नाही, कशाला आपण या गोष्टीसाठी इतका अट्टाहास केला होता? हा असा अनुभव आपल्याला बरेचदा आला असेल.
शिक्षण, पैसा, सुंदर बायको/मैत्रीण, शरीरयष्टी सलमान खान सारखी या पैकी कशामधे सुख आहे असे तुम्हाला वाटते?
विचार करा – वरची कुठलीही एक गोष्ट तुम्हाला सुखी ठेऊ शकेल ?.
मानवी स्वभावानुसार या सगळ्या गोष्टी एकत्र मिळाल्या तरच तुम्ही आनंदात राहू शकाल..
सुखी म्हणत नाही मी किंवा समाधानी पण नाही..
सुख म्हणजे नेमकं काय? पैसा??
पैसा म्हणजे सुख देईलच असे वाटत नाही. तसं म्हटलं तर आज इतक्या मोठ्या इस्टेटीचा मालक असलेला टाटा खरंच सुखी म्हणता येईल? त्याला पण अपत्य नाही याचं दुःख असेलच. या वयात एकटेपणाचा अभिशाप भोगण्यात कितीही पैसा असेल तरीही काय सुख?
ज्याला सगळं काही अगदी घरबसल्या आयतं मिळतं तो किती सुखी आहे असं नेहेमीच वाटत असतं आपल्याला, नाही का?
जन्मल्यापासून तोंडात सोन्याचा चमचा असलेला संजय दत्त पण नंतर वैफल्याने ग्रासल्या जाऊन ड्रग्जच्या आहारी जातो आणि नंतर टेररिस्ट अॅक्टीव्हीट्ज मधे ओढला जातो. हे असे का व्हावे? त्याला काय कमी होतं? सगळी मटेरिअलिस्टीक सुखं हात जोडून समोर उभी होती. पैसा, अडका, बापाचं नाव तरीही तो अशा भानगडीत पडलाच.
पैसा, वडिलोपार्जित असला तरी तो तुम्हाला सुख देऊ शकत नाही – कारण तो पैसा मिळवण्यासाठी तुम्ही हातभार लावलेला नसतो/ प्रयत्न केलेला नसतो.
एक प्रसिद्ध म्हण आहे – पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही.
पैसा मिळवण्यासाठी काही कष्ट करावे लागले नाही तर पैसा कमावण्यातले सुख कसे काय अनुभवास येईल?
जो पैसा मिळालेला असतो, त्यावर कुठलेही नियंत्रण नसते, त्यासाठी काहीच कष्ट केलेले नसते, त्यामुळेच असेल की त्यात काही फारसं सुख वाटत नाही.
स्वतःच्या पैशाने विकत घेतलेली सेकंडहॅंड स्कुटर चालवताना ईतरांच्या पैशातून घेतलेल्या नवीन कारपेक्षा नक्कीच जास्त आनंद होइल.
सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल असं वाटत नाही का?
टिव्ही वर एक कार्यक्रम बायको नेहमी पहायची. भांडा सौख्य बरे नावाचा. त्या कार्यक्रमात एक सासू मुलाच्या लग्नात २२ वर्षापूर्वी पायघड्या घातल्या नाहीत म्हणून सुनेला बोलताना दिसली. सगळं लग्न व्यवस्थित केलं, मान पान वगैरे सगळं केलं, फक्त पायघड्या घातल्या नाही म्हणून हे इतक्या वर्षानंतर पण ती सासू मुलाच्या लग्नातले आनंदाचे क्षण लक्षात ठेऊ शकली नाही, तर तिच्या लक्षात राहिल्या न घातलेल्या पायघड्या! छान झालेला स्वयंपाक, इतरांनी केलेले किती सुंदर आहे हो सून म्हणून केलेले कौतुक, आलेल्या सगळ्या लोकांनी केलेलं सुंदर अरेंजमेंट्सचं कौतुक वगैरे…. सगळं काही त्या सासूबाई विसरल्या होत्या.
म्हणून वाटतं की सुख ही एक मानसिक अवस्था आहे.
, अनील अंबानीच्या घरी काम करणारा नोकर (स्वयंपाकी) अंबानी कुटुंबीयांसाठी जे अन्न शिजवतात तेच खात असतात, त्याच अंतालियामधे रहातात, पण ते अंबानी इतके सुखी असतील का? अर्थात नाही. कारण त्या आयुष्यावर त्यांचे नियंत्रण नसते – त्यांचे आयुष्य हे आश्रिताचे असते. स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचे असलेले नियंत्रण सुख देईल!
आयुष्यात आपण सगळ्यांकडून काही ना काही तरी अपेक्षा करत असतो.
ही माझी बायको, तिने असे असे वागले पाहिजे,
ही माझी मुलगी तिने असे असे वागले पाहिजे.
असे काही ठोकताळॆ आपल्या मनात तयार असतात. आपण स्वतःला रींगमास्टरच्या भूमिकेत ठेवतो आणि सगळ्यांनी कसे वागावे ह्याचे मनातल्या मनात आराखडे बांधत असतो. आपल्या अपेक्षेपेक्षा कोणी वेगळं वागला, की आपली चिडचिड होते.
अपेक्षापूर्ती हीच खरे सुख देते, मग ती अगदी लहान गोष्टीतली – जसे सकाळी बायकोने तो न मागता सॉक्सची पेअर हातात द्यावी ( कारण नेहमी एक सारखे दोन सॉक्स तुम्हाला कधीच सापडत नाहीत) अशी अपेक्षा असली तरीही!
अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का? म्हणजे मला असं म्हणायचं आहे, की जर तुमचा रिव्ह्यु झाला आणि तुमची अपेक्षा आहे की मला साधारण २० टक्के पगार वाढ मिळावी, तुम्हाला मिळते १८ टक्के, आणि मग दोन टक्के अपेक्षेपेक्षा कमी, की तुम्हाला सुख मिळणार नाही.
कुठलीही गोष्ट करताना आधी जर समस्या काय येतील याचा विचार केला तर आधीपासूनच त्यावर काय उपाय करायचा हे ठरवता येऊ शकते. जेंव्हा एखादा प्रॉब्लेम येतो, तेंव्हा तुम्ही तो आला तर काय करायचं याचा विचार आधीच केलेला असतो. त्यामुळे तुमची अपेक्षा आणि प्राप्ती मधलं अंतर नक्कीच कमी होऊन नंतर होणारा मानसिक त्रास वाचतो.
सेल्फ एस्टीम नावाचा एक प्रकार आहे, की जिला कधीही कोणाच्याही वागण्याने धक्का बसु शकतो. आपण जर सेल्फ एस्टीमचा बाऊ केला नाही तर त्या कारणाने दुःखी होण्याचे काहीच कारण शिल्लक राहू शकत नाही.
जर फळाची चिंता न करता नुसते कर्म करत राहिलो तर? विद्यार्थ्याने फक्त अभ्यास करत राहिला आणि किती मार्क मिळायचे ते मिळॊत असं म्हणून त्याने फक्त कर्म केले तर त्याला मिळणारे मार्क्स आणि त्यातून मिळणारा आनंद हा नक्कीच जास्त असेल. इथेच समजा त्याने काही ध्येय डोळ्यापुढे ठेवले आणि त्या ध्येय प्राप्तीपेक्षा कमी मार्क्स मिळाले तर त्याला इतकं वर्षभर केलेल्या कर्माचा आनंद उपभोगता येणार नाही. खरं की नाही?
कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेशू कदाचन हा श्लोक खूप आवडतो.
शेवटी स्वर्गाचा नरक आणि नरकाचा स्वर्ग बनवण्याची क्षमता आपल्या मनात असते. तुमच्या मनाला सुख ओळखता आलं पाहिजे.
म्हणजे लक्षात येत नाही??
समजा तुमच्या घरात चोर आला आणि त्याने दोन सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. पण इतर बरंच सोनं जे दुसऱ्या ठिकाणी ठेवलं होतं ते काही नेलं नाही. तेंव्हा गेलेल्या सोन्याबद्दल दुःख करायचे की चोरीला न गेलेल्या सोन्याबद्दल आनंद मानायचा?
असे प्रसंग अनेकदा येतात, तुमची अपेक्षा असते ९७ टक्के मार्क मिळायची, पण मिळतात ९४ टक्के.. मग त्याचं सुख मानायचं की दुःख?
एखाद्या काटेरी जंगलातून जाणाऱ्या पाउल वाटेने जातांना ती वाट आहे यात सुख मानायचे की आजूबाजूला किती काटे आहेत याचे दुःख करायचे??
असे अनेक प्रश्न आहेत, की ज्यांची उत्तरं आपणच शोधायची आहेत आणि ठरवायची आहेत.
सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता. पण ते नाठाळ सुख तुमच्यापुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे. नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल. तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिज आणि त्यासाठी तुमचे मन खरं तर तुम्ही ट्रेन करायला हवे.
इंग्रजी मधे एक म्हण आहे, ऑपोर्च्युनीटी नॉक्स युवर डोअर, बट यु शूड आयडेंटीफाय अॅंड ओपन द डोअर”
शरीराचा सगळ्यात जड आणि हलका अवयव कुठला ? असा प्रश्न विचारला तर उत्तर एकच असू शकते, ते म्हणजे सगळ्यात जड अवयव डोकं, आणि हलका अवयव म्हणजे कान. कुठलीही गोष्ट ऐकली की त्यावर फारसा शहानिशा न करता विश्वास ठेवतो आपण.
सुखी रहाण्याचा एक मुळ मंत्र या दोन्ही अवयवांचा व्यवस्थित केलेला वापर. जर हे तुम्ही करू शकलात तर आयुष्यात बऱ्याच गोष्टींमधे सुख-आनंद शोधू शकाल. हा विषय खरं तर खूप मोठा आहे, ह्याची व्याप्ती पण इतकी मोठी आहे, की, ती शब्दात मांडता येणे शक्य नाही.
”जगी सर्व सुखी असा कोण आहे,
विचारी मना, तूच शोधून पाहे”
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा