शहाण्या माणसांचा क्लास’ “अरे, पण गरज काय आहे याची?” हे वाक्य ज्यांना योग्यवेळी, योग्य ठिकाणी, योग्य गोष्टीविषयी आणि योग्य व्यक्तीशी बोलताना वापरता येतं ना, ती माणसं शहाणी असतात. जपून वागतात, जपून जगतात आणि जगताना इतरांनाही जपतात. ऊठसूठ हाॅटेलात जाऊन खाणार नाहीत, सतत बाहेरून पार्सल मागवणार नाहीत, सारखी खरेदीही करणार नाहीत. रेल्वे स्टेशन किंवा एसटी स्टॅन्डवर पहाटे साडेचार किंवा पाच वाजता एकटे उतरले तर अर्धा तास तिथंच थांबतील. भल्या पहाटे जाऊन घरच्यांच्या साखरझोपेचा विचका करणार नाहीत आणि दुप्पट-तिप्पट पैसेही खर्च करणार नाहीत. अर्धा तास थांबतील, बसेस सुरू झाल्या की शांतपणे घरी पोचतील. सकाळचा पहिला चहा घरीच घेतील, सात वाजता आलेला वर्तमानपत्राचा ताजा अंक वाचतील. अर्धा तास वाचवण्यासाठी जिवाचा आटापिटा करून तिप्पट पैसे खर्च करणार नाहीत. पण कुटुंब असेल, लहान बाळ असेल तर असं वागणार नाहीत. रिक्षा करतील, थोडीफार घासाघीस करतील, आणि घरी जातील. हे जगण्यातलं व्यावहारिक शहाणपण पिढ्यानपिढ्या रक्तात मुरलेला एक वर्ग आपल्या समाजात आहे. अनेकजण त्यांना मिडलक्लास म्हणतात, पण माझ्या लेखी ती खरी शहाणी माणसं...