मी मोठा झालो..... संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला.. "गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय! "थांब जरा," मी म्हणालो. आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं, "या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही... जी मुलं शेतात काम करतात, गुरं सांभाळायला जातात, त्यांनी आपल्या पालकांना सांगायचं, 'या वर्षी आम्हाला काम सांगायचं नाही, आम्ही फक्त अभ्यास करणार,' दहावीचा कोणताही विद्यार्थी आम्हाला इकडे-तिकडे भटकताना दिसला, तर त्याचं काही खरं नाही, कळलं! "हो" सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडले. भटकणाऱ्या मुलांचं सर काय करणार, हे न सांगितल्यान जरा जास्त काळजी वाटत होती. सरांचं सुद्धा बरोबर होतं, बरीच वर्ष गावात फक्त सातवी पर्यंत शाळा. सातवी नंतर बारा किलोमीटर दूर असलेल्या गावात जावं लागायचं, त्यामुळे सातवी नंतर बऱ्याच मुलांची...