◾विशेष लेख :- आई
रस्ता ओलांडतांना माझा लहानगा हात घट्ट पकडून ठेवणारी आई आजही माझा हात तस्साच घट्ट पकडते, कारण बदललेल्या जगाच्या झगमगाटाने, गोंगाटाने ती बावचळून गेलेली असते !
पेन्शनच्या बुकात सही करायला मी आईला बँकेत घेऊन जातो, इथे इथे सही कर म्हणून सांगतो.... आई फक्त माझ्या डोळ्यात विश्वासाने बघते अन खुणेवर सही करते........ कधीकाळी मी सुद्धा अस्साच विश्वास टाकलेला असतो तिच्यावर लहान असतांना !
आईच्या मोतीबिंदूची शस्त्रक्रिया होते, मी तिला हाताने घास भरवतो...... तेंव्हा मला आठवतात तिचे चिऊ-काऊचे घास अन.. मौंजीच्या दिवशी आम्ही केलेले अखेरचे एकत्र भोजनही...... !!
ज्यांच्याबरोबर अल्लड वयात अनोळखी जगात पाउल ठेवले, ज्यांच्या भोवती आयुष्याचे भावनाविश्व विणले,त्या माझ्या वडिलांच्या पश्चात माझी आई असते आंतून एकटी, देवघरातल्या नंदादीपाच्या जोडवातीकडे कोरड्या नजरेने एकटक बघणारी....
कधीकाळी झालेल्या चुकांसाठी शिक्षा म्हणून पाया पडायला लावलेला मी आपणहून आईला वाकून नमस्कार करतो मला भासतात वडिलांची पदकमले... ते सुद्धा सुखावलेले असतात अंतःकरणातून, आईच्या मुखातून मला आशीर्वाद देतात..... !
जगाच्या दृष्टीने कुठेतरी विसंगत होत चाललेली माझी आई माझ्यासाठी मात्र अधिकाधिक सुसंगत होत असते.
पण सगळेच हिशोब काही चुकते होत नसतात अश्या तऱ्हेने, ऋण राहणार असतेच मागे अपरंपार प्रेमाचे, वात्सल्याचे....
ओलावलेल्या माझ्या डोळ्याच्या कडा बेमालूमपणे लपवत मी आईकडे बघतो..... आईची नजर मात्र पैलतीरी हरवलेली असते !!
मातृदेवो भव !!
🌀🌀🌀🌀🌀🏵️🌀🌀🌀🌀🌀
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा