मी मोठा झालो....
मी मोठा झालो.....
संध्याकाळी शाळेतून आल्यावर, हात-पाय धूऊन चहा पीत होतो, तेवढ्यात संज्या निरोप घेऊन आला..
"गुरं बाहेर काढताहेत, तुला बोलावलंय!
"थांब जरा," मी म्हणालो.
आईला संज्यासाठी चहा आणायला सांगून, जावं कि, न जावं, या विचारात बुडून गेलो. शाळेचा गृहपाठ करायचा होता. तिकडं गेलो तर बराच उशीर होणार. माझं दहावीचं वर्ष, शाळेच्या पहिल्याच दिवशी सरांनी भलं मोठं भाषण दिलेलं,
"या वर्षी तुम्ही दहावीला आहात, लक्षात ठेवा. खेळ बंद... दांड्या मारायच्या नाही... जी मुलं शेतात काम करतात, गुरं सांभाळायला जातात, त्यांनी आपल्या पालकांना सांगायचं, 'या वर्षी आम्हाला काम सांगायचं नाही, आम्ही फक्त अभ्यास करणार,' दहावीचा कोणताही विद्यार्थी आम्हाला इकडे-तिकडे भटकताना दिसला, तर त्याचं काही खरं नाही, कळलं!
"हो" सगळे विद्यार्थी एका सुरात ओरडले. भटकणाऱ्या मुलांचं सर काय करणार, हे न सांगितल्यान जरा जास्त काळजी वाटत होती.
सरांचं सुद्धा बरोबर होतं, बरीच वर्ष गावात फक्त सातवी पर्यंत शाळा. सातवी नंतर बारा किलोमीटर दूर असलेल्या गावात जावं लागायचं, त्यामुळे सातवी नंतर बऱ्याच मुलांची शाळा सुटायची. दोन वर्षांपूर्वी आठवी, नंतर नववी आणि या वर्षी दहावी, आमची पहिली तुकडी. दहावीचा निकाल कसा लागतो यावर शाळेचं आणि शिक्षकांचं भवितव्य, आणि या साऱ्याचा भार आम्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर. आमचं आयुष्य म्हणजे नांगराला धरलेल्या बैलासारखं झालेलं, जरा इकडे तिकडे झालं, कि बसली पाठीत काठी. निकाल चांगला लागावा म्हणून, सगळ्या शिक्षकांनी आमच्यावर बारीक नजर ठेवलेली. तरीसुद्धा आम्ही खेकडे पकडायला, पोहायला जातच होतो. पण पावसाळा संपून क्रिकेटचा हंगाम सुरु झाला. आमच्या वाडीतील मी, मंग्या, मोहन सोडून सगळी मुलं सकाळ-संध्याकाळ क्रिकेट खेळू लागली,आणि आम्ही तिघं मनातल्या मनात झुरू लागलो.
" येतोस ना?" आपला चहा संपवीत संज्या म्हणाला.
मी गृहपाठाचा विषय डोक्यातून काढून, संज्या सोबत निघालो.
पावसाळा संपला कि गुरांना बाहेर काढावं लागायचं. बाहेर काढणं म्हणजे, वाड्यातून कावणात बांधण्या अगोदर दहा-बारा दिवस गुरं मोकळ्या जागेत बांधायची. गावातील कितीतरी कुटुंब वर्षानुवर्षे जुन्या एकाच केंबळारू घरात राहतात. पण गुरांसाठी पावसाळ्यात वाडा आणि उन्हाळ्यात कावन असे दोन गोठे, आठवीत असताना सारखं मला वाटायचं, एकदातरी पाटील सरांना केंबळचा अर्थ विचारून भंडावून सोडावं, मला पक्की खात्री होती त्यांना या शब्दाचा अर्थ सांगताच आला नसता. आमच्या गावाकडील बऱ्याच शब्दांचे अर्थ त्यांना कळत नसत. नाहीतर ते सुद्धा आम्हाला इंग्रजीचे नको नको ते शब्द विचारून हैराण करायचे. पण मी त्यांना कधीच त्या शब्दाचा अर्थ विचारला नाही, नाहीतर "आधी गृहपाठ दाखव" म्हणून मलाच शिक्षा केली असती.
जेव्हा पाटील सरांना समजलं, "आमच्याकडं गुरांच्या गोठ्याला वाडा म्हणतात," तेव्हा तर ते उडालेच," लेकांनो, आमच्याकडं पाटलाचा वाडा असतो, आणि तुम्ही गुरांना वाड्यात बांधता, कमाल आहे तुमची." खरं सांगायचं तर तेव्हा माझी छाती पैलवाना सारखी फुगली, पण त्यांच्याकडचा वाडा आमच्या खोताच्या घरापेक्षाही मोठा असतो हे कळलं, आणि सगळी हवा निघून गेली.
गुरांना बाहेर काढणं हा आम्हा मुलांना एखाद्या सणांपेक्षाही मोठा उत्सव वाटायचा. दहा-बारा दिवस वाडीतील सगळी गुरं एकत्र ओसाड असलेल्या जागेत बांधायची. गावात अधून मधून बिबट्याची स्वारी यायची. उन्हाळ्यात गुरं उनाड, रानात चरायला गेलेल्या गुरांची बिबट्या शिकार करायचा. या सहा महिन्यात बिबट्या दहा-पंधरा गुरं तरी मारायचा. उघडयावर बांधलेल्या गुरांवर बिबट्यानं येऊन झडप घालू नये, म्हणून राखण करावी लागायची. रात्री गुरांची राखण करण्यासाठी प्रत्येक जण तात्पुरता मांडव घालायचा. मांडव घालण्यासाठी लागणाऱ्या खांब्या पासून,कामट्या, टाले तोडून आणण्या पर्यंत सगळ्या गोष्टीत आम्हा मुलांचा सहभाग असायचा. रात्री जेवण झालं कि राखणेला जायचं, प्रत्येकाच्या मांडवात गॅस बत्ती, कंदील लागायचा. मांडावा समोर परसा पेटवला जायचा. पेटलेल्या शेकोटी भोवती अंग शेकत, झोप येईपर्यंत म्हाताऱ्या माणसांच्या आठवणी ऐकत बसायचं. आमच्याकडं गुरं नसल्यानं, आई मला पाठवायला का-कू करायची, पण मी ऐकायचो नाही. उघड्यावर आभाळाकडं बघत झोपायला मला खूप आवडायचं.
गुरांना असं बाहेर का बांधतात? हा भला मोठा प्रश्न बरेच दिवस डोक्यात घुमत होता. नंतर कळलं पावसाळ्यात गुरांवर गोचीड होतो. त्यांना तसंच कावणात बांधलं तर तो वाढत जातो, म्हणून दहा-बारा दिवस रोज जागा बदलत बाहेर बांधलं तर रात्रीचा गोचीड खाली उतरतो, दुसऱ्या दिवशी जागा बदलल्यानं पुन्हा चढत नाही. असे दहा-बारा दिवस उलटल्यावर गुरांना पाण्यात घेऊन जायाचं.
पाण्यात न्यायचं म्हणजे, आमच्या नदीत असणाऱ्या भल्या मोठ्या डोहात त्यांना दोन-तीन तास उभी करायची. तशी हि नदी आमची स्वतःची नव्हती, आमच्या गावाची सीमा आणि पलीकडच्या गावाची सीमा म्हणजे नदी. तशी ती दोन्ही गावाची नदी होती, पण आम्ही तिला आमची नदी म्हणायचो. या नदीचा आम्हा मुलांना काही फायदा नव्हता. एकतर ती घरापासून दीड-दोन किलोमीटर दूर, नदीत असणारे डोह खूप खोल, जिथे डोह नव्हते तिथं गुडघाभर सुद्धा पाणी नसायचं. डोहात उतरायला भीती वाटायची, तसं आम्हा सगळ्या मुलांना पोहायला यायचं, पण नदीत मगर आहे म्हणून मोठ्या माणसांनी वावडी उठवलेली. आम्ही मुलं मगरीला घाबरण्यातली नव्हतो, आम्हाला माहीत होतं, मगरीपेक्षाही आम्ही वेगानं धावू शकतो. पण डोहात उतरलो आणि लपून बसलेल्या मगरीनं येऊन पकडलं तर! म्हणून जरा भीती वाटायची. पण ज्या दिवशी गुरं पाण्यात घेऊन जात, त्या दिवशी आम्ही मनसोक्त पोहून घ्यायचो.
गुरांना पाण्यात नेल्यावर तीन-चार तास तरी त्यांना पाण्यात उभं करून ठेवायचं, त्यामुळॆ उरला-सुराला गोचीड सुद्धा मासे खाऊन टाकायचे. गुरं पाण्यात असेपर्यंत आम्ही पोहत राहायचो. कधी-कधी एखादा म्हातारा हटकायचा,
"पोरांनो बाहेर पडा, नायतर सर्दी होईल,"
तेव्हा मुलामध्ये असणारा टारगट मुलगा म्हणणार,
"आधी तुमच्या गुरांना बाहेर काढा, नायतर त्यांना पण सर्दी होईल,"
बाकीची सगळी मुलं खी-खी करून हसायची. एखादा चांगल्या स्वभावाचा म्हातारा असेल तर, तो सुद्धा आमच्या सोबत मस्करी करायचा, परंतु कुणी खडूस म्हातारा असेल तर,काटी घेऊन बाहेर काढायचा. त्या वेळेस आमच्या फजेतीवर पाण्यातून माना वर करून उभी असलेली गुरं आमच्याकडं पाहून गालातल्या गालात हसत आहेत असं वाटायचं. थोडा वेळ उन्हं अंगावर घेऊन आम्ही पुन्हा डोहात उतरायचो.
गुरं पाण्यातून आणल्यावर सर्व गुराखी पोस्त करायचे, पोस्त म्हणजे पार्टी. पोस्तासाठी प्रत्येक जण घरातून तांदूळ आणायचा, वर्गणी काढून खीर बनवण्यासाठी लागणारं इतर साहित्य आणायचं, रात्री गॅस बत्तीच्या उजेडात भल्यामोठ्या भांड्यात खीर बनवायची. शेकोटी भोवती बसून खिरीवर ताव मारायचा. एवढा एक दिवस रात्री घराबाहेर जेवता यायचं. तो दिवस आम्ही मुलं कधीच चुकवायचो नाही.
नववी पर्यंत नियमित आम्ही यामध्ये सहभागी होत आलेलो, पण दहावीला असल्यानं हे सगळं करता येणार नव्हतं. पण आम्ही तिघांनी ठरवून टाकलं, काही झालं तरी गुरं पाण्यात नेणार तेव्हा जायचं म्हणजे जायचं. कारण दहावी नंतर पास झालो तरी, नापास झालो तरी गाव सुटणार होता, त्यानंतर या गोष्टी कधीच करता येणार नव्हत्या. गुरं बाहेर काढायला सुरवात झाल्यापासून अंधार पडला कि लपून आम्ही तिघं तिकडं जात होतो.
बघता बघता दिवस उलटून गेले. दुसऱ्या दिवशी गुरं पाण्यात नेणार, शाळेत काय सांगायचं हा प्रश्न कायम होता. संध्याकाळी शाळेतून आल्यावर उद्या काय कारण सांगायचं यावर आम्ही चर्चा केली.
मोहन म्हणाला, "गेल्या महिन्यात आमच्या दादाची सासू वारली,"
"मग आता कुणाला मारायचं." मंग्यानं प्रश्न केला.
"आपण सरांना सांगूया, आज गावातून निरोप आला, म्हातारी वारली म्हणून," मोहन म्हणाला.
"पण, सर तुला सुट्टी देतील," मंग्यानं परत प्रश्न टाकला.
"असं करू,आपण तिघं सकाळी सरांकडे जाऊन सुट्टी मागू, पुढचं पुढं बघू," मी म्हणालो.
सकाळी सरांकडं सुट्टी मागायचं ठरवून आम्ही घरी परतलो.
सकाळी लवकर उठून, सकाळचे सर्व विधी आटपून आम्ही सरांकडं निघालो. सरांच्या घराजवळ पोहचलो, तर ते उघडेबंब, नुसता कमरेला टॉवेल गुंडाळून पनळीवर पाणी भरत होते. सकाळ सकाळ हि मंडळी इकडे कुठं? म्हणून सरांना झालेलं आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आम्ही चेहऱ्यावर दुःखाचे भाव आणून ठरवलेलं कारण सांगितलं.
"अरे-अरे वाईट झालं, हे बघा, आज शाळेत आला नाहीत तरी चालेल," सरांच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं. आमच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या, पण आम्ही चेहऱ्यावरचं दुःख अजिबात पुसू दिलं नाही. माघारी वळून वाडीकडं धाव घेतली. आल्या आल्या शाळेत जाणाऱ्या सगळ्या मुलांना ‘सरांनी विचारलं तर काय सांगायचं' समजावलं. त्यामध्ये मोहनचे दोन भाऊ सुद्धा होते. मोहनच्या नात्यातील घटना असून ते दोघं शाळेत जाणार, मी आणि मंग्या मात्र सुट्टी घेणार होतो. पण तो विचार करायला आमच्याकडं वेळ नव्हता, ज्यांची गुरं होती, ते सगळे पुढं निघून गेलेले. आम्ही घरातून भाकर घेतली आणि धावतच नदीच्या रस्त्याला लागलो.
पऱ्या ओलांडून कातळावर आलो. कातळावरचं गवत आता सुकायला लागलेलं. कातळावर मोठी झाडं कमीच, नुसती झुडपं, त्यामुळे दूरवर असलेला माणूस सुद्धा सहज दिसायचा. नजर पोहचेपर्यंत गुरं घेऊन निघालेली माणसं दिसत नव्हती. ते खूप पुढं निघून गेले असणार. आता धावत जाऊन काही उपयोग नव्हता. उगाचच दमायला झालं असतं. नाहीतरी दुपार शिवाय ते परतणार नव्हते.
नदीवर पोहचलो तर, डोहात गुरं माना वर करून आमचीच वाट पाहत, " अरे, हे कुठं राहिले होते," असा मनातल्या मनात विचार करत असल्यासारखी. वरच्या बाजूला लहान मुलं पोहत होती. डोहाजवळ पोहचल्या पोहोचल्या बरोबर आणलेली भाजी-भाकर दगडावर ठेवून शर्ट काढून तिघांनी डोहात उड्या टाकल्या.
पोहत असताना डोक्यात एकच विचार घोळत होता. पुढच्या वर्षी आपण इथं नसणार, कदाचित परत कधीच या डोहात पोहायला येणार नाही, त्यामुळे अभ्यास सांभाळून जी मजा कायरायची ती याच वर्षी. आम्ही तिघांनी मनसोक्त पोहून घेतलं. सोबत आणलेली भाजी-भाकर खाऊन घराकडं निघालो.
येताना चेष्ठा मस्करी विसरून गेलो. एकतर दमलो होतो आणि परतताना चढणीचा रस्ता, त्यात उन्ह. कुणीच कुणाशी बोलत नव्हतं. घरी आलो तेव्हा मधल्या सुट्टीत मुलं जेवायला आलेली. त्यांच्याजवळ चौकशी केली. पण सरांनी आमच्याबद्दल कुणालाच विचारलं नव्हतं.
घराकडं आल्यावर सारखं वाटत होतं, आपण एवढ्या लवकर मोठं व्हायला नको होतं. आजपर्यंत आपण मोठे झालोय हा विचार कधीच मनात आला नव्हता. आज मात्र पहिल्यांदा मोठं झाल्याचा साक्षात्कार झाला.
दीपक पवार
सुनील इनामदार
______________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा