घरटे उडते वादळात, बिळात वारुळात पाणी शिरते,
कोणती मुंगी, कोणते पाखरू, म्हणून आत्महत्या करते
प्रतिकूल परिस्थितीत, वाघ लाचारीने जगात नाही.
आणि शिकार मिळाली नाही म्हणून, कोणतं अनुदान मागत नाही.
घरकुलासाठी मुंगी करते का अर्ज?
स्वतःच उभारते वारुळ, कोण देतो गृह कर्ज?
हात नाहीत सुगरणीला, फक्त चोच घेऊन जगते,
स्वतःच विणते घरटे छान, कोणते पॅकेज मागते.
कुणीही नाही पाठी, तरी तक्रार नाही ओठी.
निवेदन घेऊन चिमणी, फिरते का कोणत्या योजनेसाठी?
घर धन्याच्या संरक्षणाला धावून येतो कुत्रा.
आणि लाईफ इन्शुरन्स काढलस का? असं विचारत नाही मित्रा.
राब राब राबून बैल कमावून धन देतात.
सांगा बरं कोणाकडून ते निवृत्ती वेतन घेतात?
अरे कुणब्याची जात आपली, आपणही हे शिकलं पाहिजे.
पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे.
कोण करतो सांगा त्यांना, पुरस्काराने सन्मानित?
मोर पसरतो पिसारा अन कोकीळ गाते मधुर गीत.
मधमाशीची दृष्टी ठेवा फुलांची कमी नाही.
आणि मधाच्या पोळ्यासाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा