वाढदिवस ...
— वाढदिवस —
वाढदिवस म्हणजे आयुष्याचा वाढलेला दिवस किंवा जितके दिवस आयुष्य लाभलं आहे त्या दिवसात झालेली वाढ!
प्रामुख्याने तीन वाढदिवस साजरे केले जातात - १. व्यक्तीचा, २. व्यक्तीच्या लग्नाचा, ३. संस्थेचा! हल्ली तर कसलेही वाढदिवस साजरे केले जातात. पहिली नजरभेट, पहिल्यांदा फिरायला जाणं, मागणी घालणं, एकमेकांच्या आई-वडिलांना भेटणं, इतकंच नव्हे तर पहिल्या ब्रेकअपचाही वाढदिवस साजरा केला जातो.
वाढदिवस हा वैयक्तिक आणि अगदी घरगुती असा आनंदाचा क्षण आहे. वाढदिवस का आणि कसा साजरा करावा? व्यक्तीची जोपर्यंत शारीरिक/बौद्धिक वाढ होत असते तोपर्यंत वाढदिवस साजरा करावा. हे साजरेपण अत्यंत साधं असावं. त्या व्यक्तीसाठी नवे कपडे किंवा काही उपयुक्त वस्तू म्हणजे वाचनीय पुस्तके, बौद्धिक खेळ भेट म्हणून घ्यावे. त्या व्यक्तीने सकाळी लवकर उठावं. तिचं आन्हिक उरकल्यावर सूर्योदयाच्या वेळी आई/आजी/ताईने औक्षण करावं आणि सूर्यासारखे तेजस्वी-प्रकाशमान जीवन लाभो, निरोगी-उदंड आयुष्य लाभो असे शुभाशिर्वाद देऊन भेटवस्तू द्यावी, त्या व्यक्तीच्या आवडीचा स्वयंपाक करावा जेणेकरुन त्या व्यक्तीचा संपूर्ण दिवस आनंदी असेल. यासाठी सर्व दुनियेला आमंत्रण करुन बोलावण्याची काहीच आवश्यकता नाही. ज्यांना त्या व्यक्तीविषयी विशेष आपुलकी/प्रेम असेल ते स्वतःहून प्रेमाने शुभाशिर्वाद देण्यासाठी येतीलच.
लग्नाचा वाढदिवस हा पति-पत्नींचा विशेष दिवस असतो. वर्षभर गृहस्थाश्रमातील कर्तव्ये पार पाडता पाडता मेटाकुटीला आलेल्या या पति-पत्नींना हा दिवस त्यांच्या मनासारखा जगू द्यावा. हा दिवस त्या दोघांचा आहे हा विचार करावा. त्यांना त्यांच्या आठवणीत रमायचं असेल, भविष्याची काही आखणी करायची असेल असा विचार करुन त्यांना शुभेच्छा द्याव्या, मोठ्यांनी मोठ्या मनाने त्यांच्या संसारास शुभाशिर्वाद द्यावे.
संस्थेचा वाढदिवस करताना त्या संस्थेच्या कार्यासंबंधी विचार करावा. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यात काय सुधारणा कराव्या, कोणते नवे उपक्रम हाताळावे याविषयी विचारविनिमय करावा. ज्यांना संस्थेविषयी विशेष आपुलकी आहे, ज्यांनी संस्थेसाठी विशेष सहकार्य केले आहे अशा व्यक्तींना सन्मानाने बोलावून त्यांच्या सहकार्याची जाणीव असल्याचे दर्शवावे.
आजकाल मात्र वाढदिवसाची व्याख्या पूर्ण बदलली आहे. अत्यंत हिणकस रुप आलं आहे. भेटवस्तू घेणं आणि देणं असं व्यावहारिक रुप आलं आहे. टोप्या घालणं, चित्रविचित्र मास्क लावणं, शिट्ट्या-पिपाण्या वाजवणं असं जत्रेचं स्वरुप आलं आहे. आदल्या रात्रीचे बारा वाजून गेले की फोन/मेसेज यायला सुरुवात होते. खरं म्हणजे सूर्योदयाने दिवसाची सुरुवात होते, त्यामुळे वाढदिवस किंवा बर्थडे या शब्दातील दिवस किंवा डे म्हणजे काय हे लक्षात घेऊन तरी शुभेच्छा द्याव्या की नाही? संध्याकाळी कसले दिवस मावळताना किंवा मावळल्यावर रात्री हे वाढदिवस साजरे करता? सगळ्या दुनियेला आमंत्रण करतात. कशाला? तू वाढलास यात तुझं काय कतृत्व? आई-वडिलांनी केलेल्या संस्कारात वाढ करुन ते निदर्शनास आणून द्यावे तर हा किंवा हल्ली ही सुद्धा बियरपार्टी करुन नाचण्यात आनंद मानतात आणि आईवडिलांना मान खाली घालायला लावतात. केक कापणं (मुळात केक हा आपला पदार्थ नसताना केक का आणावा?), तो तोंडाला फासणं ही जणू आजची नवी संस्कृतीच झाली आहे. काही जण त्यातही धेडगुजरीपणा करुन मूर्खपणाचा नवा नमुना सादर करतात. औक्षण करत असता 'हॅपी बर्थडे टू यू' अशा इंग्रजीत शुभेच्छा देतात आणि केक कापताना संस्कृतमधे शुभेच्छा देतात. अशांची कीव करावीशी वाटते. मेणबत्त्या फुंकणं, विझवणं ही आपली संस्कृती नाही. विझवून अंधःकार पसरविण्याऐवजी प्रज्वलीत करणं, प्रकाशमान करणं ही आपली संस्कृती आहे. आपण औक्षण करुन त्या ज्योतीप्रमाणे तेजस्वी होण्याचे आशीर्वाद देत असतो. पण हे मात्र आपल्या समाधानासाठी औक्षण करुन घेतात आणि दुसरीकडे सुरी चालवतात. आति केक नाही तर फळावर सुरी चालवतात. अरे, पण यादिवशी नमस्कारासाठी हात जोडावेत का हातात सुरी धरावी?
मला तर वाटतं, जन्माला आल्यापासून ते अठराव्या वयापर्यंत वाढदिवस घरातच, फार फार तर मित्रमैत्रिणींना बोलावून साजरे करावेत. पण तेव्हाही त्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ करुन ते सगळ्यांना द्यावे. भेटवस्तू फक्त मोठ्यांनीच पण उपयुक्ततेचा विचार करुन आशीर्वाद म्हणून द्याव्या.
पुढील वाढदिवसाचे आयुष्यातील महत्वाचे टप्पे म्हणजे ५०-६०-७५-८० हे साजरे करावे. पण यामागील भावना पूर्ण वेगळ्या असाव्या. कारण आता हे वाढदिवस नसतात तर ते घटदिवस असतात. अशावेळी त्या व्यक्तीच्या आपुलकीच्या माणसांनी त्या व्यक्तीला आपल्या भेटीचा आनंद देऊन त्यांच्या मनात विश्र्वास निर्माण करायचि असतो की, "काळजी करु नका, आम्ही कायम तुमच्या सुखदुःखात सहभागी असणार आहोत, तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही." अशा वाढदिवसांना भेटवस्तूंची नाही, भेटीची अपेक्षा असते. लाॅकडाऊनच्या काळात या वयोगटातल्या व्यक्तींच्या मुलांनी एक नवी प्रथा सुरु केली आहे. मुलं त्या व्यक्तीच्या जवळच्या व्यक्तींकडून त्या व्यक्तीविषयी काही आठवणी/संदेश/शुभेच्छा यांचे व्हिडिओ मागवतात आणि त्याचं सुंदर सादरीकरण करतात.
व्हाॅट्सअपवर तर वाढदिवसांना ऊतच आलेला असतो. ग्रुपमधे असलेल्या व्यक्तीचा, तिच्या जोडीदाराचा, त्या जोडीचा, त्यांच्या मुलांचा कोणाचाही वाढदिवस रोज साजरा होत असतो. एकाने शुभेच्छा द्यायला सुरुवात केली की उरलेले सभासद कधी मनापासून, कधी भीडेखातर तर कधी, जणू हे आपलं कर्तव्य आहे असं समजून शुभेच्छा देत असतात. व्हाॅट्सअपवर शुभेच्छा देताना संपूर्ण ग्रुपतर्फे एकत्रितपणे शुभेच्छा दिल्या तर त्या योग्य नाही का? नाहीतर ग्रुपमधे ५० सभासद असतील तर तितकेच मेसेज/फुले आणि निम्मे तरी केक असतातच. मग ती व्यक्तीही नांवानिशी आभार मानत असते.
लग्नाच्या वाढदिवसाचंही स्वरुप तसंच असतं. नवीन लग्न झालं असेल तर ठीक आहे. पण या सगळ्या शुभेच्छा अनेकवेळा एक कर्तव्य म्हणून असतात, भीडेखातर असतात. पटतं ना?
आजचे वाढदिवस बघून खरंच कीव करावीशी वाटते, कधी कळणार ह्यांना 'वाढदिवस' या शब्दाचा अर्थ??? वाढ होणार्या दिवसातही सर्वार्थाने घट निर्माण करणारी ही पिढी! पिढीच कशाला? हल्ली लहानांचं बघून मोठेही चेकाळल्यासारखे वागतात. सगळ्यांनाच हात जोडून विनंती करावीशी वाटते की ज्याच्यामुळे आपल्याला हा जन्म लाभला आहे त्याला, ज्यांनी जन्म दिला त्या मातापित्यांना, गुरुजनांना विनम्रतेने नमस्कार करुन त्यांचे शुभाशिर्वाद घेऊन अत्यंत निरोगी, उज्वल आणि प्रकाशमान जीवन घडवा.
🙏🏼🙏🏼
सौ. मधुवंती फडके.
****************
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा