◾लघु कथा :- अनुभव श्रीमंतीचा …
आजीने तिच्या गुरुंच्या समाधी दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि दोन दिवसांनी आम्ही तिला घेऊन श्री क्षेत्र गोंदवले इथे निघालो. आजीचा तिच्या गुरूंवर आभाळाएवढा विश्वास आणि श्रद्धा.मी आणि सौ दोघेही तसे देव देव न करणाऱ्यातले. केवळ आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो.गाडीत बसल्या पासून आजीच्या हातातल्या जपमाळेचे मणी सरकू लागले होते. काही वेळा मला ह्या बाबतीत आजीची चेष्टा करायची लहर येई. “ आजी, तुझी गुरु माउली तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का ?” मी गमतीने विचारलं. सौ चे डोळे मोठे झाले आणि मी गप्प. आजीने डोळे मिटले आणि म्हणाली “ मिळेल ना दर्शन. माझी श्रद्धा आहे, तुलाही अनुभव येईल.”
कुठलंसं गाव मागे पडलं होतं. श्री क्षेत्र गुरु स्थान अजून 18-20 किलोमीटर दूर होतं. दुपारची वेळ . रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादं वाहन जात होतं… बाकी शांतता आणि उन्हाच्या झळा. अचानक मला पुढे एक माणूस उभा दिसला. धनगराचा वेष आणि बरोबर दोन भरलेली पोती. त्या माणसाने हात करून थांबायला सांगितलं. मी थांबलो. “ मालक … अहो एवढी दोन पोती जरा गोंदवल्यात पोचवाल कां ? कधी पासून यष्टीची वाट बगतुया. गाडीचा पत्याचं न्हाई बगा.” मी गाडीच्या बाहेर आलो, मागची डिकी उघडली आणि ती दोन पोती आत ठेवली. त्या धनगराने मला नमस्कार केला आणि तो मागे फिरून चालू लागला. मी डिकी बंद करून मागे बघितलं. तो माणूस कुठल्या दिशेला गेला हे मला समजलंच नाही. त्या पोत्यांत तांदूळ आणि वांगी होती.
आम्ही मुक्कामी पोचलो. सौ, आजीला घेऊन समाधी मंदिरात दर्शनाला गेली. मी त्या संस्थानाच्या ऑफिस मध्ये जाऊन वाटेत भेटलेल्या माणसाने दिलेल्या गोणीबद्दल सांगितलं. तो समोर बसलेला माणूस आश्चर्याने माझ्याकडे पहात राहिला. बाजूलाच बसलेला कोठी घराचा व्यवस्थापक ताड्कन उभा राहिला. म्हणाला “ आपल्या महाराजांनी आज लाज राखली. सर्व भक्तांच्या रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ पुरेसा नव्हता आणि भाजीही सगळी संपली होती. भाऊ… अहो तुमच्या बरोबर माउलींनी धान्य पाठवलं बरं कां.. त्या धनगराच्या रूपात प्रत्यक्ष महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं. धन्य आहात हो तुम्ही.” माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि आजीचे बोल आठवले. मला अनुभव आला होता. एक श्रीमंत समृद्ध अनुभव… मी आजीला आणि सौ ला झाला प्रकार सांगितला. आजी प्रसन्न हसली.
दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा समाधी दर्शन घेऊन परत निघालो. काल घडलेला प्रसंग .. मिळालेली अनुभूती सगळंच विलक्षण होतं. घरी आलो. डिकीत ठेवलेल्या बॅगा काढायला म्हणून डिकी उघडली … समोर त्या पोत्यातून सांडलेले पसाभर तांदूळ आणि दोन वांगी दिसली. गुरूंचा प्रसाद मिळाला होता … यात्रेची सांगता झाली होती. मिळालेला अनुभव श्रीमंत होता.
केवळ आजीच्या गुरुंवरील नितांत श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आम्ही दोघे श्रीमंत अनुभवाचे साक्षीदार झालो होतो...
______________________________
असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी व ऐकण्यासाठी आमचे YouTube चैनल सबस्क्राईब करा
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp व Teligram समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
धन्यवाद
ह्या पैकी काय वाचायचे आहे ❓
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा