◾भक्तीगीत :- एकतारी संगे एकरूप झालो
मनाचिये वारी पंढरीची
सफल जीवनाचे रहस्य सांगणारी
🌹⚜️🌸🚩🛕🚩🌸⚜️🌹
*देवाचिये द्वारी उभा क्षणभरी*
*तेणें मुक्ती चारी साधियेल्या*
*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा*
*पुण्याची गणना कोण करी*
मुक्ती म्हणजे आनंद. "न लगे मुक्ती धनसंपदा.. संत संग देई सदा" असं तुकोबा म्हणतात. संत भक्तीचा उपाय हा नामस्मरण सांगतात. पंढरी वारीमध्ये संत सहवास लाभतो तो नामस्मरणाने. त्याने सुखोपभोगी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी दृष्टी लाभते.
माऊली म्हणतात.. देवाच्या दारात क्षणभर जरी उभे राहिले तरी सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता या चारही मुक्तीचा लाभ होतो.
मुक्ती म्हणजे खरा आनंद. सलोकता म्हणजे ही जगताची सृष्टी भगवंताची आहे, त्याचे सानिध्य मला आहे. समीपता म्हणजे तो सदैव माझ्याच सोबत आहे. सरुपता म्हणजे मी त्याचाच अंश आहे. सायुज्यता म्हणजे तो आणि मी वेगळे नाहीच. हा मुक्तीचा अर्थ पटतो आणि मग सर्वदूर.. प्रत्येकामध्ये विठ्ठलच दिसतो.. इतरांशी वागणूक बदलते. या आनंदासाठी विठ्ठल भक्तीत रमून त्या अगणीत पुण्याने जीवन आनंदी होते.
मनाचिये वारीत ज्ञानोबा, तुकोबांसह सर्वच संत मंडळींच्या दिंडी.. पालखीं पंढरपूर ची वाटचाल करताहेत. या मनाचिये वारीतील सहभागी वारकऱ्यांचे भाव विश्व भक्तीने अत्यंत श्रीमंत. समृद्ध आहे. भजन.. कीर्तन अखंड हरिनामाचा गजर आणि त्रिकाळ हरिपाठ सुरु आहे.
जे लोक भक्ती मार्गाला लागतात ते खोट्या अशाश्वत प्रतिष्ठेच्या कल्पनांत अडकत नाहीत. ते शाश्वत सुखाचा शोध घेतात. त्यांच्या गरजा मर्यादित असतात, ते मान-अपमानाच्या पलिकडे जगतात. सर्व भौतिक सुखापासून विरक्त होतात, कारण त्यांची तार.. मन हे थेट विठ्ठलाशी जुळलेली असते. विठ्ठलाचा टिळा लावुन, टाळ वाजवुन विठ्ठलाची भजने म्हणत ब्रह्मानंद मिळवतात. त्यांच्या गरजाही मर्यादित असतात. हवे तरी काय जगतांना.. विठ्ठलाने पोटाला भाकरी, झोपडीची सावली द्यावी. एवढेच पुरे.. बाकी मोहच नाही कशाचा.
पुर्व जन्म संचिताने.. पुण्याईने जो तो आपले सुख या जन्मी प्राप्त करतो, हेही त्यांना ठाउक आहे. त्यामुळेच ना कुणाशी स्पर्धा ना आकस. खरे भक्त या संसार सुखाकडे विरक्त वृत्तीने बघतात आणि त्या विठ्ठलाकडेही स्वतःसाठी काहीच मागणे नसते. विठुराया जसा ठेवेल त्यात आनंद मानतात. या वृत्तीनेच हृदयीची तार त्या विठ्ठलाशी जुळते, त्यालाच हे भक्त सफल जीवन मानतात. त्यामुळेच या संतुष्ट भक्तांना आत्मशांती लाभते.
🌺🚩🛕🔆👣🔆🛕🚩🌺
*_एकतारी संगे एकरूप झालो_*
*_आम्ही विठलाच्या भजनांत न्हालो_*
*_गळा माळ शोभे आत्मरूप शांती_*
*_भक्तिभाव दोन्ही ,धरू टाळ हाती_*
*_टिळा विरक्तीचा कपाळास ल्यालो_*
*_भूक भाकरीची छाया झोपडीची_*
*_निवाऱ्यास घ्यावी उब गोधडीची_*
*_माया मोह सारे उगाळुन प्यालो_*
*_पूर्व पुण्य त्याचे मिळे सुख त्याला_*
*_कुणी राव होई कुणी रंक झाला_*
*_मागने न काही मागण्यास आलो_*
🌻🌸🛕🔆🌺🔆🛕🌸🌻
गीत : जगदीश खेबूडकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : सुधीर फडके
चित्रपट : बाजीरावाचा बेटा (१९७१)
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा