तर, हे असे आहे ...
तर, हे असे आहे ..
कष्ट करुन रापलेल्या सर्वसामान्य माणसांना आपली पोरं राजकारणात जावीत असं मूळीच वाटत नाही. त्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, शिक्षक, पोलिस, किमान शिपाई असलं काहीतरी झालं पाहिजे असं त्यांना वाटतं. यातलं काही नाही झालं तर सचोटीने एखादा धंदा, चांगली शेती, मेहनतीचं का असेना पण जादा झंजट नसलेलं काम केलं पाहिजे असं या अनुभवाचे चटके सोसलेल्यांना वाटतं. तसं आता कुठलही क्षेत्र सचोटीचं राहिलेलं नाही पण आपल्या आयुष्याचा, संसाराचा गाडा चालवताना अनंत तडजोडी कराव्या लागणाऱ्या, कधी-कधी चुकीची, अनैतिक वाटणारी कामं कराव्या लागणाऱ्या माणसांनाही आपल्या पोरांना त्यांच्या आयुष्यात अशा तडजोडी, अशी चुकीची कामं करावी लागण्याचे प्रसंग येवू नयेत असे मनापासून वाटत असते. कित्येक माणसं आयुष्याच्या संघर्षात मार्ग भरकटून व्यसनी होतात. आपण चुकीचे वागत आहोत हे त्यांना कळत असते. पण वळत नसते. व्यसनापेक्षा जास्त पश्चात्तापाचे वीष त्यांना खात असते. अशाही माणसांना आपल्या पोरांनी आपण ज्या वाटेने जात आहोत, ती वाट धरु नये असे मनापासून वाटत असते.राबणारी ही माणसं अशी पापभिरु असतात, हळवी असतात. त्यांच्या कष्टावरच या दुनियेचा गाडा चालतो. पण ते कधी सत्तेतला, संपत्तीतला त्यांचा वाटा मागत नाहीत. व्यवस्थेशी लढत नाहीत. त्यांचे जेमतेम अस्तित्व व्यवस्था मान्य करते, राशन-पाण्याची सोय असते तोपर्यंत हे असेच असते. व्यवस्था अन्यायी आहे, राज्यकर्ते चोर आहेत वगैरे ज्ञान त्यांना त्यांच्या अनुभवविश्वाने दिलेले असते. त्यासाठी त्यांना राज्यशास्त्र वाचावे लागत नाही. या शोषणाला त्यांची मूक संमती असते. ती यासाठी असते की आधीच संघर्षमय असलेल्या त्यांच्या जगण्यात त्यांना अधिकचा आटापिटा नको असतो, अधिकचे झोले खायचे नसतात. चार पैसे मिळतील या आशेने राज्यकर्त्यांच्या मागे हिंडणारे टवाळ टाळके सोडले तर ही कष्टकरी जमात नेत्यांचे गुणावगुण ओळखून असते. एकंदर व्यवस्थेचीच समज या माणसांना अधिकची असते, कारण व्यवस्थेच्या चांगल्या-वाईट अशा सगळ्या बाजू ही माणसं जाणून असतात. त्यांचं शोषण करणारी व्यवस्था निव्वळ पुस्तकज्ञान पाजळून बदलणार नाही याची पुरेपूर जाण या माणसांना असते. ही माणसं खऱ्या अर्थाने 'प्रॅक्टिकल' असतात. उगीच भाबडी आशा बाळगून कशाच्याही नादी लागत नाहीत. पण यांना व्यवस्थेतले दोष दिसत नाहीत असेही नसते. आपल्याला सत्तेत, संपत्तीत वाटा मिळाला नाही याची सल ही माणसं चावडीवर चकाट्या मारताना नेत्यांना शिव्यांच्या लाखोल्या वाहून काढतात. शेवटी 'तळं राखेल तो पाणी पिणारच .. ' असं म्हणत स्वत:चेच समाधानही करुन घेतात.
अशी ही शांत, सहनशील, समजदार माणसं जेव्हा व्यवस्थेचा माज चढत जावून त्यांच्या नाकातोंडात पाणी जावू लागते तेव्हा भयंकर विद्रोही वगैरे होतात. जेव्हा अस्तित्वच गमावण्याची वेळ येते तेव्हा स्वत:साठी, स्वत:च्या पुढच्या पिढ्यांसाठी ही माणसं लढायला सज्ज होतात. राज्यकर्त्यांची मनमानी मुकाट सहन करणारी हीच माणसं राज्यसत्ताच उलटवून टाकतात. जूलमी राजसत्ता उलथवून टाकून नवी भूमी तयार करण्यासाठीच्या आजवरच्या सगळ्या लढायांत याच माणसांनी आपल्या रक्ताचे सिंचन केलेले आहे. या माणसांना इतिहासात नावा-गावानिशी स्थान नसते. पण सगळ्या जगाचा इतिहास हा अशा माणसांचा इतिहास आहे.
ही माणसं ना साहित्यिक असतात, ना कवी, ना नाटककार, ना चित्रकार, ना शास्त्रज्ञ! पण जगातल्या सगळ्या साहित्यकृती, सगळ्या कला याच माणसांमूळे अवतरतात. ही माणसं नावानीशी, गावानीशी अशी व्यक्तिश: कुठेच ओळखीची नसतात. मानव जातीच्या विकिपीडियात या माणसांचं पेजच नसतं. पण तरीही माणसाच्या आजवरच्या सगळ्या लढायांत अन चढायांत ही माणसं अग्रस्थानी आहेत.
तर, या माणसांचं हे असं आहे. या सर्वहारा वर्गाचं हे असं आहे. आपल्या आजवरच्या जगण्याचं, इतिहासाचं हे असं आहे. हा इतिहास, ही पार्श्वभूमी न समजूम घेता, या राबणाऱ्यांच्या जगाला कवडीमोल समजून त्यांना उद्ध्वस्त करु पाहणाऱ्या व सत्तेच्या अमरत्वाचा पट्टाच आपल्याला मिळाला आहे अशी समज करुन घेणाऱ्यांना या माणसांची ओळख असावी लागते. नाहीतर हीच माणसं तो अमरत्वाचा पट्टा सत्ताधाऱ्यांच्या मानेवर उगारतात. सरंजामांचा वध करुन लोकशाही वसवू पाहणारी ही माणसं आहेत. तर, यांचं हे असं आहे.
© ॲड. शीतल चव्हाण
(मो. 9921657346)
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा