बाप कुठेच नसतो | संजय धनगव्हाळ | कविता
( संजय धनगव्हाळ )
******************
वरवर कठोर दिसणारा बाप
आतून खूप हळवा असतो
सर्वांची काळजी घेणारा
बाप मात्र
कोणालाच कळत नसतो
बाप घराचा आधार होवून जगतो
सर्वांना सांभाळून एकत्र ठेवतो
खरतर बापाशिवाय घर
पुर्ण होत नाही
बापाच्या वेदना मात्र
कोणी समजून घेत नाही
घरात पाऊल टाकताच
आई आई करायचं
दिसली नाही की
बापाला विचारायच
बाप घरात असतानाही
आईचाच गजर सुरू असतो
पोटतिडकीने वाट
बघणारा बाप मात्र
कोणालाच दिसत नसतो
बाप कसाही असला तरी
काहीच कमी पडु देत नाही
लेकरंबाळांना लाचारीने
कुठेही झुकू देत नाही
काहीझाल तरी
आईलाच विचारत असतात
देण्या घेण्यासाठी मात्र
बापाला पुढे करतात
घरात बाप नसल्यावर
विचारणा कधी होत नाही
कुठे गेलेत बाबा अस
कोणी म्हणतही नाही
ईथेतिथे आईचाच
पुढाकार असतो
कुटुंबासाठी राबणारा
बाप मात्र कुठेच नसतो
आईच्या नावे खूप गाणी
कविता असतात
बापासाठी मात्र शब्द
सुचत नसतात
इतिहासाच्या पाणावर
आईचे मातृत्व लिहले असते
बापाच्या कर्तृत्वाचं पान
कोरेच दिसते
बाप सर्वांसाठी असतो
पण बापासाठी कोणीच नसतो
बाप आपल्यातून जातो
तेव्हा बाप कळतो
बापाशिवाय कपाळाचा
कुंकूही शोभून दिसत नसतो
संजय धनगव्हाळ
९४२२८९२६१८
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा