व्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी
*१. वेळ -*
👉तुम्ही व्यवसायाला पुरेसा वेळ देऊ शकत असाल तरच व्यवसाय सुरु करा. इतरांवर विसंबून राहून तुम्ही व्यवसाय करू शकत नाही. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक असते. व्यवस्यासाठी वेळ देणे म्हणजे २४ तास व्यवसायाच्या ठिकाणी बसून राहणे नव्हे. तर त्याचे कामकाज योग्य पद्धतीने चालत आहे कि नाही याकडे सतत लक्ष देणे आवश्यक असते. एकपेक्षा जास्त व्यवसाय असतील तर तुम्हले वेळेचे योग्य नियोजन करावेच लागते. प्रत्येक व्यवसाय त्याच्या १००% क्षमतेने चालावा यासाठी त्याला आवश्यक तो वेळ द्यावाच लागेल.
*२. एकाच ठिकाणी १८ तास आणि कोणत्याही प्रकारचे, काम करण्याची तयारी -*
👉एकाच ठिकाणी दिवसातील १८ तासांपेक्षाही जास्त वेळ काम करण्याची तयारी हवी. व्यवसायात काही वेळेस अशा घटना घडतात कि तुम्हाला त्यासाठी तहान भूक विसरून तासंतास काम करत राहावे लागते. कित्येक वेळा एखादी मोठी ऑर्डर असते, किंवा कामकाजात एखादी अडचण येते अशावेळी तुम्हाला तहान भूक विसरून तुमचे काम करावे लागते. अगदी दहा पंधरा अठरा तास सुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी काम करत राहण्याची वेळ येऊ शकते. यासाठी तुमची मानसिक शारीरिक तयारी असणे आवश्यक असते. ९ ते ५ काम करण्याचा हक्क फक्त कामगारांना आहे मालकाला नाही. मालक हा २४ x ७ त्याच्या व्यवसायासाठी कर्मचारी असतो.
👉यासोबतच तुम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचे काम करावे लागू शकते. अचानक एखादा कर्मचारी काम सोडून गेला तर तुम्ही तुमचे काम ठप्प करू शकत नाही. व्यवसाय करत असताना अगदी लेबर सारखे काम करण्याची तयारी सुद्धा असली पाहिजे.
*३. ग्रहण क्षमता, संवाद कौशल्य -*
👉तुमच्यात उत्तम ग्रहण क्षमता असणे आवश्यक आहे. कमी बोलणे आणि जास्त ऐकणे हे उत्कृष्ट संवाद कौशल्याचे गमक आहे. समोरच्याच्या मनाचा ठाव घेणे आणि त्याच्याशी चर्चा करणे हे कसाब तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. ते नसेल तर तुम्हाला ते विकसित करावे लागेल. यासाठी चांगली निरीक्षण शक्ती आवश्यक आहे. ग्राहकांशी चांगला संवाद प्रस्थापित करणारा व्यवसायिक कधीही अपयशी ठरत नाही.
*४. रागावर नियंत्रण -*
👉यशस्वी व्यवसायासाठी तुमचे स्वतःच्या रागावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. राग तुमच्या प्रगतीसाठी अतिशय घातक असतो. राग तुम्हाला कळसापासून पायाशी कधी आणतो ते तुम्हालाही कळत नाही, आणि कळेपर्यंत वेळ निघूनही गेलेली असते. रागाच्या भरात नेहमीच व्यवसायाला धोका उत्पन्न होतील असे निर्णय घेतले जातात. कितीही राग आला तरी त्याचे पर्यवसान समोरच्याचे मन दुखावण्यात होणार नाही याची काळजी घ्यावी. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. रागाच्या भरात कोणताही निर्णय न घेणे आवश्यक आहे. व्यवसायाच्या बाबतीत कोणताही निर्णय थंड डोक्याने घ्यावा लागतो. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असणे आवश्यक आहे.
*५. आळस नसावा -*
👉हा नियम कधीकधी माझ्याकडूनही मोडला जातो, आणि याची मलाही वेळोवेळी जबर किंमत चुकवावी लागलेली आहे. आळस हा आपला खूप मोठा शत्रू आहे. एकवेळ इतर बाबतीत निभावून नेणं शक्य आहे पण आळसाच्या बाबतीत कसलीही माफी नसते. आळस हा नेहमीच तुम्हाला काळाच्या मागे नेतो. व्यवसायात कोणत्याही कामासाठी आळस नसावा. कंटाळा आला म्हणून एखादे काम पुढे ढकलणे हे व्यवसायाला ओहोटी लावते.
*६. नुकसानीची मानसिकता -*
👉व्यवसायात नुकसान होणार हि काळ्या दगडावरची रेघ असते. व्यवसायात पदार्पण करतानाच तुम्ही नुकसान होणार या टर्म्स & कंडिशन ला अप्रत्यक्षपणे सहमती दर्शवली असते. त्यामुळे नुकसान झाले म्हणून खचून जाऊ नये. नुकसानाला खंबीरपणे सामोरे जाण्याची तयारी हवी. नुकसान हा व्यवसायाचा भाग आहे. नुकसान नाही असा व्यवसाय नाही आणि असा व्यवसायिकाही नाही.
👉खरं तर ज्याला आपण नुकसान म्हणतो मी त्याला गुंतवणूक समजतो. हि गुंतवणूक तुम्हाला अनुभवसिद्ध करण्यासाठी, भविष्यातील मोठ्या संकटांना खंबीरपणे तोंड देण्यासाठी सक्षम करण्यासाठी आवश्यक असते.
*७. आत्मविश्वास, सकारात्मकता -*
👉यशस्वी व्यवसायासाठी आत्मविश्वास, सकारात्मक विचार आवश्यक असतो. कोणत्याही बाबीत नकारात्मकता तुम्हाला स्पर्धेमधे पिछाडीवर नेते. व्यवसाय सुरु करण्यापूर्वी तो यशस्वी होईल कि नाही हा विचार तुमच्या मनात येत असेल तर तुम्ही अजूनही व्यवसायासाठी तयार नहित हे लक्षात घ्या. काही काळ थांबा आणि ज्यावेळी तुमची हि मानसिकता संपेल त्याचवेळी व्यवसायात पाऊल ठेवा. प्रत्येक बाबतीत नकारात्मक विचार करणारे आपल्यासोबतच आपल्या सहकाऱ्यांनाही नकारात्मक करत असतात. यांची प्रगती होणे अशक्य असते. स्वतःवर विश्वास खूप आवश्यक आहे.
*८. न्यूनगंड -*
👉न्यूनगंड हे व्यवसायातील अपयशाचे खूप मोठे कारण आहे. कोणत्याही गोष्टींमधे स्वतःला कमी समजने हे तुम्हाला तुमच्या सर्वोत्तम कार्यापासून परावृत्त करते. न्यूनगंडापासून वेळीच लांब जाणे व्यवसायासाठी आवश्यक असते.
*९. संयम -*
👉संयमासारखा हिरा शोधूनही सापडणार नाही. संयम बाळगण्यासाठी सुद्धा खूप संयम लागतो. संयम असेल तर तुम्ही कठिणातील कठिन प्रश्न मार्गी लावु शकता. परिस्थीती कशीही असली तरिही कोणत्याही परिस्थितीत संयम न गमावणारा यशस्वी होतोच. स्वतःवर संयम ठेवण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे, पण प्रयत्नांती आपण त्यावर विजय मिळवू शकतो. मला स्वतःला यासाठी कित्येक वर्षे लागलेली आहेत. व्यवसायात पहिल्या सहा महिन्यातच धीर सोडणारे आपल्याकडे कमी नाहीत, अशांसाठी तर संयम खूप आवश्यक आहे. कारण व्यवसायात पुढचा रस्ता सहा महिन्यांनी नाही तर किमान दोन वर्षांनी स्पष्ट होत असतो. संयमी व्यक्तीची आणखी एक खासियत असते ती म्हणजे हे लोक इतरांपेक्षा नेहमीच वेगळे वाटत. स्वतःवर ताबा ठेवण्यासाठी तुम्हाला मानसिक दृष्ट्या खूप खंबीर असणे आवश्यक असते, हि खंबीर वृत्ती अशा लोकांच्या चेहऱ्यावर प्रखरतेज निर्माण करते. यशस्वी लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज असते, ते याच आत्मविश्वासातून, संयमी मानसिकतेतून आलेले असते.
*१०. स्व प्रतिमा -*
👉तुमच्या वैयक्तीक प्रतिमेचा तुमच्या व्यवसायावर परिणाम होत असतो, त्यामुळे तुमची समाजातील प्रतिमा कधीही बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसाय आणि वयक्तिक आयुष्य या वेगवेगळ्या बाबी आहेत हा बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या व्यवसायाचे पहिले ब्रँड अँबेसेडर असता. तुमची समाजातील चांगली प्रतिमा तुमच्या व्यवसायाला सुद्धा उत्कर्ष मिळवून देते. स्वप्रतिमेला काचेच्या वस्तूप्रमाणे जपा.
👉एक चांगला उद्योजक / व्यवसायिक होण्यासाठी या किमान बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. स्वतःमधे आवश्यक ते परिवर्तन करून स्वतःला व्यवसाय योग्य बनवणे आवश्यक आहे. यात आपण कुणीही १००% परफेक्ट नाही. मीसुद्धा नाही. मीसुद्धा सतत माझ्यात परिवर्तन करायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याचा चांगला परिणाम माझ्या कामावर नक्कीच दिसतो. पण या गोष्टी आपल्याला व्यवसायिक आयुष्यात सतत जाणवतात. यातील कमतरता आपल्याला कित्येक ठिकाणी माघार घ्यायला भाग पडते. ,म्हणून या महत्वाच्या १० गोष्टींना आपण नियम समजूनच चालले पाहिजे आणि या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
विश्वास ठेवा; यश तुमचेच असेल.
व्यवसाय साक्षर व्हा...
उद्योजक व्हा...
समृद्ध व्हा.
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा