◾बोधकथा :- झाकली मुठ सव्वा लाखाची
एकदा एका राजाच्या घरी, धार्मिक कार्य करण्यासाठी एक भटजी जातात. धार्मिक कार्य पार पडल्यावर दक्षिणा म्हणून राजा त्यांना काही रुपये देऊ करतात. ती दक्षिणा, आपल्या मुठीत घेऊन तो ब्राम्हण राजदरबारातून बाहेर पडतो.
गावातील सर्व लोकांना माहित असतं, कि राजाच्या घरी आज काहीतरी पूजा अर्चना आहे. आणि, ते भटजी जसे मुख्य गावात येतात. तशी त्यांच्यापाशी लोकांची एकच झुंबड उडते. आणि एक कुतूहल म्हणून सगळी लोकं त्यांना विचारणा करतात.
राजाने, दक्षिणा म्हणून तुम्हाला काय दिलं आहे..?
भटजी महाचतुर असतात, ते म्हणतात.. मी तुम्हाला ते असं सांगणार नाही. तुम्हीच ते ओळखा. आणि या ओळखा ओळखीच्या खेळाचं कधी एकदा पैजेत रुपांतर होतं. हे कोणालाच समजत नाही.
एक व्यक्ती म्हणतो.. तुमच्या मुठीत झाकलेली जी काही वस्तू असेल. ती मी दहा हजार रुपयात विकत घ्यायला तयार आहे. तर दुसरा व्यक्ती, लगेच वीस हजाराची बोली लावतो. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा..असं करता करता ती बोली वाढतच जाते.
आणि बघता बघता हि बोली अगदी एक लाखावर येऊन पोहोचते. आता बाकी सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. कि त्या झाकल्या मुठीत नेमकं काय असेल..?
बाहेर चालू असलेला प्रकार पाहून, खुद्द प्रधानजी सुद्धा त्या गर्दीत सामील होतात. आणि घडला प्रकार पाहून अचंबित होतात. आणि हि हकीकत महाराजांना कळवतात. शेवटी महाराज सुद्धा चिंताग्रस्त होतात. आणि त्याठिकाणी येऊन, ब्राम्हणाला स्वतःच दिलेल्या दक्षिणेची सव्वा लाखाची बोली लावतात. आणि, त्या ब्राम्हणाच्या हातातील ती दक्षिणा गुपचूप आपल्या मुठीत घेऊन निघून जातात.
शेवटी लोकांना सुद्धा वाटतं. कि राजाने ब्राम्हणाला चुकून नक्कीच काहीतरी मौल्यवान भेट वस्तू दिली असणार आहे. त्यामुळेच तर धावत पळत येऊन त्यांनी हि बोली लावली असावी.
तर विषय असा असतो.. राजाने भटजीला फक्त *" सव्वा रुपया "* दक्षिणा दिलेली असते. झाकली मुठ उघडली, तर राजाच्या नावाने लोकांनी छी थू केली असती. आपला राजा येवढा कंजूस कसा..?
त्यामुळे रयतेसामोर आपली आब जाऊ नये. म्हणून राजाला हि बोली लावणं भाग पडलेलं असतं. शेवटी काय आहे, नदीचं मूळ आणि साधुचं कुळ कधी शोधू नये. या उक्तीप्रमाणेच, झाकली मुठ कधी उघडून पाहू नये. आणि कोणाला दाखवू हि नये.
🔅 तात्पर्य 🔅
झाकली मुठ हि,
नेहमी सव्वा लाखाचीच " असते... !!
____________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा