◾कविता :- धनी माझा धोरणी ...
.... धनी माझा धोरणी ....
कुरी पुजते धनी मी ,आज नक्षत्र रोहिणी
मशागत झाली आहे,चला करू पेरणी
धनी माझा धोरणी ग, धनी माझा धोरणी !!धु !!
नांगरलेल्या शेतात ,कुळवट झाली भारी
कष्ट केले आसं की ,उठे मातीवरती दोरी
बांध फुटल धनी आणि ,बंद होतील सारणी
धनी माझा धोरणी ग, धनी माझा धोरणी !! 1 !!
धुळवाफ पेरणीला ,कुरी तुम्ही चालवा
सर्जा राज्या थांबतील ,हात तुम्ही हालवा
मातीत रूजतील बी ,मग चालवा ती फणी
धनी माझा धोरणी ग ,धनी माझा धोरणी !! 2 !!
पहिलाच पाऊस झाला,भिजले मी चिंब
मातीत मुजतील मोती ,उगवतील कोंब
उगवलेल्या अंकुराने , रान दिसे शोभुनी
धनी माझा धोरणी ग,धनी माझा धोरणी !! 3 !!
चला दोघं करू काम , पीकवायची शेती
हातामध्ये मळुया माती, पिकवायचे मोती
धान्याची पाडु रास , परसातल्या अंगणी
धनी माझा धोरणी ग,धनी माझा धोरणी !! 4 !!
ढगांच्या मोसमांचा ,अंदाज तुम्ही बांधला
शिवारात कणसांचा ,बांधलासा बंगला
घर भरलं धान्यान ,कुटुंब गेले रंगुनी
धनी माझा धोरणी ग ,धनी माझा धोरणी !!5 !!
गीतकार
संतराम पाटील
केनवडे ता.कागल जि .कोल्हापूर
9096769554, 9420339554
_________________________________________
टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा