◾व्यवसाय मंञ :- मला अमेरिकेत शिक्षण घ्यायचे आहे म्हणून काम करतोय सर...
गोव्याला जाताना वाटेत एक छोटं झोपडीवजा कॅन्टीन दिसलं, म्हणून चहा घेण्यासाठी थांबलो.
साधारणपणे विशीच्या वयाचा एक मुलगा ते कॅन्टीन सांभाळत होता. शेणानं सारवलेली जमीन, झोपडीच्या बाहेर ठिपक्यांची रांगोळी, झोपडीत ज्ञानेश्वर महाराजांचा चांगला फोटो होता. त्याला ताजा फुलांचा हार घातलेला होता.
बाहेरून दिसणारी झोपडी आतून मात्र चांगली स्वच्छ होती. कळकटपणा कुठेही दिसत नव्हता.
कामगारही नव्हते.
खाण्याचे जिन्नस नव्हते, फक्त चहा आणि कॉफीच होती.
शुभ्र पांढरी बंडी आणि पायजमा अशा स्वच्छ पोशाखात तो मुलगा काम करत होता. सेल्फ सर्व्हिस होती.
बिड्या-सिगारेट्स चा वास नव्हता, पान तंबाखूच्या पिचकाऱ्या नव्हत्या. चहाचे कप स्वच्छ होते आणि दर्जाही चांगला होता.
पिण्याच्या पाण्याची सोय वेगळी होती.
साधेपणा आणि दारिद्र्य या दोन्ही गोष्टी पूर्ण वेगवेगळ्या आहेत. साधेपणाचाही एक वेगळा डौल असतो, रुबाब असतो. बाहेरून चांगली दिसणारी आणि आत गेल्यावर भ्रमाचा भोपळा फोडणारी अनेक हॉटेल्स असतातच. पण काही ठिकाणं आणि तिथली माणसं मनात घर करतात.
मी चहा घेऊन निघालो आणि जाताना मात्र त्या मुलानं मला एक अनपेक्षित आश्चर्याचा धक्का दिला. त्यानं मला हाक मारली, मी थांबलो. तो मुलगा म्हणाला, " सर, तुम्ही मघाशी ज्या कोर्स विषयी चर्चा करत होतात, तो कोर्स अमेरिकन युनिव्हर्सिटी मध्ये आहे." मला खूप आश्चर्य वाटलं, हे वेगळं सांगायला नकोच.
रस्त्यावरच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या मुलाला परदेशी विद्यापीठाविषयी इतकी अचूक माहिती कशी काय ? असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविकच आहे.
मी त्याला विचारलं, "पण तुला कसं काय माहीत?" तो म्हणाला," सर, मला तिथं जाऊन शिकायचं आहे, म्हणूनच मी हे काम करतोय."
"वडील शेती करतात, आई घरचा गोठा सांभाळते, मोठ्या बहिणीचं लग्न झालं आहे. मी चहा कॅन्टीन चालवतो. मी बीएससी झालोय सर."
"अरे, पण मग हे काम का करतोस? दुसरं काही तरी चांगलं काम करायचंस ना.."
"सर, साडे तीन रुपये प्रोडक्शन कॉस्ट टाकून साडे अकरा रुपये नफा मिळवतोय मी प्रत्येक कपामागं.
घरचं दूध आहे, ही जागाही आमची स्वतःची आहे. शिक्षणाच्या एकूण खर्चापैकी ४०% रक्कम तरी मिळवली पाहिजे, नाहीतर बँकेचं कर्ज मिळणार नाही. म्हणून मी हे काम सुरू केलं. रोजची अडीच-तीन हजाराची कमाई होते. पुढच्या वर्षी एन्ट्रन्स देणार आहे मी. तोवर पैसे जमा होतीलच. एकदा एन्ट्रन्स मध्ये चांगला स्कोअर झाला की बँक कशाला नाही म्हणेल?"
"अरे, पण लोक काय म्हणतील, याचा विचार नाही केलास का तू?"
"सर,लोक बोलतील, पण मला पैसे देणार आहेत का ते? मी प्रॅक्टिकली विचार केला सर. मी स्वतःच्याच जीवावर पैसा उभा करणार आणि शिकणार."
त्यानं मला कॅन्टीनचं काऊंटर आतून दाखवलं. पाहतो तर पुस्तकंच पुस्तकं. त्यात ज्ञानेश्वरी देखील दिसली.
वेळ मिळेल तसा अभ्यास करणारा आणि स्वतःच्या कमाईवरच परदेशी जाऊन शिक्षण घेण्याचा निर्णय घेतलेला तो मुलगा खरोखरच हुशार, समजूतदार आणि कर्तव्यात श्रेष्ठ आहे.
त्यानं परिस्थिती बरोबरच स्वतःला सुद्धा स्वीकारलं आहे, पण ध्येयाच्या दिशेने करायचा प्रवास सोडला नाही.
अडचणींमध्येदेखील संधी शोधणारा तो मुलगा खरा हाडाचा विद्यार्थी आहे. स्वतःच्या जबाबदाऱ्या तो उत्तम प्रकारे पार पाडतो आहे. त्याच्या समोरच्या कोणत्याही कामाला तो कमीपणाचं मानत नाही, हे सर्वांनीच घेण्यासारखं आहे.
आजच्या विद्यार्थीच काय पण पालकांमध्येही हा गुण फारसा आढळून येत नाही. असे संस्कार करून आपल्या मुलाला घडवणाऱ्या त्या आईवडिलांचं आणि त्याच्या शिक्षकांचं मला कौतुक वाटलं आणि अभिमानही वाटला.
मुलांच्या खोलीत स्वतंत्र एसी, स्वतंत्र टीव्ही, आठवड्याला भक्कम पॉकेटमनी, वायफाय, महागडे स्मार्टफोन्स देणारे पालक मुलांना जगण्याची दृष्टी का बरं देत नाहीत ?
स्वतःची कर्तव्यं आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव का करून देऊ शकत नाहीत ? असा प्रश्न मला नेहमीच पडतो.
आठवड्यातून एकदा तरी महागड्या हॉटेल मध्ये सहकुटुंब जेवायला जाणारी अनेक कुटुंबं मी पाहतो, तेव्हा पैशाच्या नादी लागून जगण्यातला साधेपणाच संपत चाललाय का ?, असं वाटल्यावाचून राहत नाही.
लाडावून ठेवलेली आणि प्रमाणाबाहेर सुखवस्तू झालेली तरुण पिढी खरोखरच देशाच्या विकासासाठी बेचैन असेल का हो ?
समाजातली अनागोंदी परिस्थिती बदलण्याचा ध्यास त्यांच्या मनात असेल का?
अत्यंत बुद्धिमान आणि त्याच्यापेक्षा कांकणभर जास्तच सुखासीन, उपभोगवादी, स्वार्थी आणि अर्थातच बेजबाबदार विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
समंजस, चौकस, डोळस,अभ्यासू, प्रगल्भ,प्रयोगशील, नीतिमान, संतुलित विचार करणारा असा विद्यार्थी शाळा-कॉलेजांना हवा असेल तर तो आधी कुटुंबांमधून घडला पाहिजे.
आईवडीलांनो, तुमची जबाबदारी फार मोठी आहे.
📺🔷📺🔷📺🔷📺🔷📺
➖➖➖➖➖➖🔴➖➖➖➖➖➖
दररोज प्रेरणादायक माहिती वाचण्यासाठी खालील Whatsapp समुहा मध्ये सहभागी व्हा
-{ आणि लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }-
📱आवडल्यास नक्की शेअर करा📱
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा