कविता : तिला विचारलं नाही..


_______________
🍁 तिला विचारलं नाही..🍁
ज्या क्षणी पाहिले तिला...
होकार गृहीतच धरला...!
मी तुला आवडलो का...?
तिला विचारलंच नाही...!!

सप्तपदी चालतांना...
घुटमळली पाऊले तिची...!
हुरहुर कसली होती...?
तिला विचारलंच नाही...!!

माप ओलांडतांना उंबरठ्याचं... 
मी आलो सहज आत...!
तुलाही यावंस वाटतंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

झाली पहिली भेट...
किती आतुर होतो मी...!
ओढ तुलाही आहे का...?
तिला विचारलंच नाही...!!

वंशाला दिवाच हवा...
सांगून मोकळा झालो...!
पण आई व्हायचंय का...?
तिला विचारलंच नाही...!!

संगोपन करतांना मुलांचं...
कसरत होत होती तिची...!
गरज माझीही लागेल का...?
तिला विचारलंच नाही...!!

आयुष्यभर दिली साथ...
झाली सुख दु:खाची सोबती...!
कधी मन तिचं दुःखलं का...?
तिला विचारलंच नाही...!!

न मागताच तिच्याकडून...
घेतलं मी सारं काही...!
तुलाही काही हवं का...?
तिला विचारलंच नाही...!!

खरंच किती स्वार्थी झालो...
गृहीतच धरलं मत तिचं...!
तिचं मन काय म्हणतं...?
तिला विचारलंच नाही...!!

🍁सर्व महिलांना समर्पित 🍁


टिप : -{ लेख कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा }- सदर लेख आवडल्यास नक्की शेअर करा ✅

टिप्पण्या

सर्वाधिक वाचलेल्या पोस्ट

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट